ढिंग टांग : रेनकोट, रेनकोट...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Nandi writes about politics uddhav thackeray rahul gandhi bharat jodo yatra

ढिंग टांग : रेनकोट, रेनकोट...!

मा. पक्षप्रमुख उधोजीसाहेब यांसी कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा. सदरील पत्र जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथून एका कंटेनरमध्ये बसून लिहीत आहे. माननीय राहुलजींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सामील होण्यासाठी मी जम्मूला आलो आहे. (क्याजुअल लीवचा अर्ज आधीच तुमच्याकडे दिला होता. रजा मंजूर करावी, ही विनंती!)

मी इथे पोचल्यावर माझ्या नावाचा जयजयकार झाला. मला राहण्यासाठी एक कंटेनर (पक्षी : खोलीच्या आकाराचा खोका) देण्यात आला आहे. कंटेनरमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. झोपायला पलंगदेखील आहे. मुंबईला परत आल्यावर उरणच्या बंदरात जाऊन सेकंड हँड कंटेनर कितीला मिळतो, याची चौकशी करणार आहे. दोन-तीन (आपणही) घ्यावेत असे वाटते!

‘भारत जोडो’ यात्रेत ठरल्याप्रमाणे सामील झालो. मा. राहुलजी माझी वाटच पाहात होते. मी येईपर्यंत ते कंटेनरमध्ये बसून होते, असे एका (काँग्रेस) कार्यकर्त्याने सांगितले. राहुलजींना मानले पाहिजे! कन्याकुमारीपासून त्यांनी चालायला सुरवात केली, आता श्रीनगर दिसू लागले आहे.

मी कठुआला पोचलो तेव्हा हवा ढगाळ होती. थंडी मी म्हणत होती. (मीही मी म्हणत होतोच. असो.) तापमान चार-साडेचार अंशावर घसरले होते. राहुलजींनी माझे स्वागत केले. मी त्यांना कडकडून मिठीच मारली. ते काही बोलले नाहीत. मी दिलखुलासपणे त्यांना विचारले. ‘‘मूड बरा नाही का?’’ तर ते म्हणाले, ‘‘बराय की! मी हसतोय!!’’ त्यांच्या दाढीमुळे त्यांचे हास्य (आणि ती सुप्रसिद्ध खळी) लोप पावली आहे, याचे वैषम्य वाटले.

‘‘हमारे भाई उधोजीसाहब क्यूं नहीं आये?’’ असे त्यांनी मायेने विचारले. ‘तेच येणार होते, पण ‘महाराष्ट्र जोडो’ यात्रेच्या जुळवाजुळवीत ते सध्या जरा बिझी आहेत,’ असे मी त्यांना सांगून टाकले आहे. (तुम्हाला फोन आलाच, तर तुम्हीही हेच उत्तर द्यावे. अन्यथा मी खोट्यात पडेन! थँक्यू!!) ‘महाराष्ट्र जोडो’ यात्रेची आयडिया मुळीच वाईट नाही! महाराष्ट्रातही नफरतीची थंडी पडू लागली आहे. हे थांबवण्यासाठी काहीतरी करायलाच हवे.

मी रोज सकाळी तुमची पत्रकार परिषद (टीव्हीवर) बघून झाली की चालायला सुरवात करतो, असे राहुलजींनी मला सांगितले. मी लाजलो! आपल्यामुळे कुणाला चालण्याचा हुरुप येत असेल, याची मला कल्पनाच नव्हती. थंडीमुळे मी कुडकुडत होतो. राहुलजींना थंडी वाजत नाही, याचे मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘खरं सांगायचं तर मला उकडतंय! कारण मी सत्याचा स्वेटर घालतो!’’

साहेब, आपणही सत्याचे स्वेटर होलसेलमध्ये घेऊन ठेवायला हवेत, असे वाटते. महाराष्ट्रात त्याची फार गरज आहे. सत्याचे स्वेटर, सत्याचे मफलर आणि कानटोप्या यांची ऑर्डर आत्ताच देऊन ठेवावी, असे वाटते.

राहुलजींसोबत चार पावले टाकली तेवढ्यात भुरभूर पाऊस सुरु झाला. थंडी आणखीनच वाढली. मी आडोसा शोधू लागलो. पण राहुलजी म्हणाले, ‘‘रुकनेका नहीं! आप रेनकोट पहन लो! ‘भारत जोडो’ यात्रा में रेनकोट अलाऊड है...!’’ त्यांनी उदार मनाने त्यांचा रेनकोट काढून मला दिला. रेनकोट घातल्यानंतर मला ना थंडी वाजली, ना पाऊस लागला!

राहुलजींसोबत चार पावले टाकल्यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली. ते माझ्या प्रेमात पडले आहेत, आणि मी त्यांच्या!! शेवटी तर ते म्हणाले की, ‘‘आप हमारी पार्टी क्यों नहीं ज्वाइन करते?’’ मी फक्त हसलो! बाकी सर्व क्षेम (पाय दुखताहेत!) भेटीअंती बोलूच. आपला कडवट मावळा. संजयाजी.

ता. क. : रेनकोट परत करण्याचे विसरलो! (‘मातोश्री’वर) आणून जमा करतो! थँक्यू.