ढिंग टांग : दुआओं में याद रखना...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुआओं में याद रखना...!
ढिंग टांग : दुआओं में याद रखना...!

ढिंग टांग : दुआओं में याद रखना...!

वझीरे आजम-ए-हिंदोस्तां जनाब मोडी यांना पडोसी इमरान खानचा आखरी सलाम. मी यकायक मकान सोडून जात आहे, याबद्दल मुआफी चाहतो. आपण पडोसी! शरीफ पडोसीप्रमाणे चाबी-ए-गरीबखाना, तुमच्याकडेच देऊन जावे असे वाटत होते. लेकिन घरमालकाने मना केले. सबब मकानची चाबी ताल्यातच अडकवून ठेवून अर्ध्या रात्री दार लोटून लपत छपत निकल पडलो. अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबान पे स्वाद रखना...

स्वादावरुन याद आले! जनाब, गेले तीन साल आणि आठ माह आपण पडोसी राहिलो आहो! कधी तुमच्याकडचा ढोकळा आमच्या गरीबखान्यात आला नाही की आमच्याकडला शीरकुर्मा तुमच्या घरी पोचला नाही. ना तुमच्याकडला उंधीयु या दिशेला आला, ना आमच्या मुदपाक खान्यातली (व्हेज) बिर्यानी तुमच्याकडे आली. ना इथला लस्सी-ए-गिलास तुमच्याकडे आला, ना तुमच्याकडली वाटी-ए-विरजण आमच्याकडे आले. यह कौनसा मजहब-ए-पडोस? (पक्षी : शेजारधर्म!) जाने दो. (पक्षी : असो!) सच सांगतो, केवळ मकान मालकाची मर्जी सांभाळण्यासाठी मी आपल्याला नावे ठेवत होतो. ‘मि. मोडी हमारे दुश्मन है’ असे बेवजहा ओरडत होतो. तुमच्या घराचे कुंपण खराब करत होतो. मगर ऐतबार ठेवा, मी तुमचा सौफीसदी (पक्षी : शतप्रतिशत) मुरीद आहे. हलांकि (पक्षी : किंबहुना) तुमच्याकडे बघूनच मी तेहरीके इन्साफ ही पार्टी शुरु केली, आणि अवामचे दिल जिंकले.

बहोत देखे है सूरमा-ओ-सितारे-ए-आसमां गर्दिश में, चमकता है बुलंदी पर सिर्फ एकही बंदा मोडी!

...असा शेरही मी पढला होता. कसा वाटला? प्लीज कळवा! हिंदोस्तांचा बाशिंदा असतो, तर मला एव्हाना तुमच्या मुल्कात पुरस्कारबिरस्कार मिळाले असते. है के नहीं? मगर यह हो न सका...

निकलना खुल्द से आदम का सुनते आए थे लेकिन, बहुत बेआबरु होकर, तिरी कूचे से हम निकले!

...हा शेर माझा नाही, मिर्झा गालिब यांचा आहे. दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी हा शेर पढला नसता तर बरे झाले असते, असे आता वाटते आहे. क्यों की, यह अल्फाज माझ्यासाठीच त्यांनी पढले असावेत, अशा रीतीने हिंदुस्थानी मीडिया ते वापरत आहे. ‘बडी बेआबरु होकर इमरान पीएम हाऊस से निकले!’ अशी ब्रेकिंग न्यूज त्यांनी चालवली आहे. यह सरासर नाइन्साफी है, जनाब! तहरीक-ए आदम ऐतमाद (पक्षी : अविश्वास ठराव) मध्ये आधी रात को अपोझिशनवालों ने डाव साधला, आणि मला मकान सोडून जावे लागले.

‘आखरी बॉलतक मैं यह मॅच खेलूंगा’ असे मी म्हटले होते. आखरी बॉल टाकणार होतो, पण तेवढ्यात कळले की आपली बॅटिंगची साइड असल्याने बॉलिंग करताच येणार नाही. आखरी बॉल कसा टाकणार? सबब, तहरीके आदम ऐतमाद (पक्षी : अर्थ वरच्या कंसात...) मी हरलो!

अर्ज किया है-

हाथ को कुछ काम, या राह साफसुथरी मिलें

दिल करता है के आयपीएल की कामेंटरी मिलें

...मतलब ध्यानी आला ना? बीसीसीआयकडे माझ्यासाठी शब्द टाकाल का? कळावे.

आपला मुरीद. इमरान खान.

ता. क. : कपिल शर्माच्या शोमध्ये माझा दोस्त नवजोत सिद्धू पुन्हा खटपट करत आहे, असे कळले. तिथे काम झाले तरी चालेल!

Web Title: British Nandi Writes Pakistan Pm Imran Khan Last Salute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top