‘कोल्ड शॉक’पासून सांभाळा

किरणकुमार जोहरे
बुधवार, 4 जानेवारी 2017

देशात थंडीची लाट तीव्र होत असून, तापमान झपाट्याने खाली येत आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घेण्याची गरज आहे; तसेच तापमानात अचानक झालेली ही घट प्राणिमात्रांसह पिकांनाही हानिकारक आहे.
 

देशात थंडीची लाट तीव्र होत असून, तापमान झपाट्याने खाली येत आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घेण्याची गरज आहे; तसेच तापमानात अचानक झालेली ही घट प्राणिमात्रांसह पिकांनाही हानिकारक आहे.
 

हिवाळा किंवा ईशान्य मॉन्सून वाऱ्यांचा कालखंड हा डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजे थंडीचा कालखंड आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे म्हणजेच ‘थंडीची लाट’ सध्या सक्रिय आहे. थंडीच्या ऋतूत दिवसापेक्षा रात्र मोठी व आकाश निरभ्र असते. जमिनीने दिवसभरात मिळविलेली सूर्याची सर्व ऊर्जा वातावरणात परत गेल्यामुळे जमिनीचे तापमान आणखीनच घटते. देशात थंडीची लाट तीव्र होत असून, तापमान झपाट्याने खाली येत आहे. अचानक घटलेल्या या तापमानाने बागा उद्‌ध्वस्त होण्याचीही शक्‍यता आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तापमानात अचानक झालेली ही घट प्राणिमात्रांसह पिकांनाही हानिकारक आहे. तापमानात अचानक म्हणजे अत्यंत कमी वेळात दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घट होते, त्याला ‘कोल्ड शॉक’असे म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या तापमानाबाबत ‘कोल्ड शॉक’ असेच म्हणता येईल.

तापमान अचानक दहा अंशांपेक्षा जास्त अंश कमी होते, तेव्हा झाडांनाही एक प्रकारचा ‘अटॅक’ येऊ शकतो. केळी, द्राक्षे, भाजीपाल्याची पिके, रब्बी पिके अशा थंडीत मृतप्राय होऊ शकतात. माणसांमध्येही थंडीने रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ‘कोल्ड शॉक’पासून संरक्षणासाठी ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना थंडीत जाऊ देऊ नये. हिवाळा म्हणजे अनारोग्याला आमंत्रण असे समीकरण झाले आहे. त्यातून दमा आणि रक्तदाब असे विकार बळावतात. चढ-उतार होणाऱ्या तापमानामुळे ताप, सर्दी, खोकला, घसा बसणे याचे रुग्ण अधिक आढळून येतात. वातावरणातील अदला-बदलीमुळे आपले शरीर तापमानातील चढ-उताराबरोबर लगेच जुळवून घेऊ शकत नाही; त्यामुळे हिवाळ्यात आपण विविध आजारांना बळी पडतो. या काळात दुपारी चारनंतर उबदार कपडे घालावेत. शक्‍य झाल्यास हातमोजे, पायमोजे वापरावेत. सर्दी झाल्यावर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. थंड पदार्थांचे सेवन करू नये. गरम-कोमट पाणी प्यावे.

अपचनाचा त्रास टाळण्यासाठी मांसाहारासारखे जड आणि जास्त अन्नसेवन थंडीत टाळावे. हृदयरोग, संधिवात असणाऱ्या रुग्णांना अधिक त्रास होतो; त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीत धूम्रपान, मद्यपान करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे थंडीत धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. थंडीत रक्त गोठते आणि घट्ट बनते; तसेच रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळी व्यायाम करणे किंवा फिरायला जाणे अशी श्रमाची कामे टाळावीत.

‘कोल्ड शॉक’पासून संरक्षणासाठी केळीच्या खोडांना गोणपाट बांधावे. द्राक्षबागेत १०० वॉटचे दिवे लावल्याने दिव्यांच्या उष्णतेने थंडीची आणि धुक्‍याची तीव्रता कमी होऊ शकते. धुके असताना धान्याच्या कोठाराचे, शेताचे तापमान वाढविण्यासाठी हॅलोजन बल्बसारखे उष्णता देणारे बल्ब लावण्याची व्यवस्था उपयोगी ठरू शकते. द्राक्षाचे मणी किंवा फळभाज्या धुक्‍याने खराब होऊ नये म्हणून बाष्प टिपणारे टिपकागद वापरता येणे शक्‍य आहे. शेताच्या कडेला, मोकळ्या जागी शेकोटी पेटविणेही धुके कमी करण्यास उपयोगी ठरू शकते. मात्र हे उपाय करताना पिकांना आग लागणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. थंडी आणि धुक्‍यापासून रक्षणासाठी मोठे मेणकापड, पॉलिथिनची चादर अथवा ताडपत्रीचा वापर करून धान्य झाकणे शक्‍य आहे.

‘कोल्ड शॉक’पासून संरक्षणासाठी जनावरांना गोणपाटाचे पांघरूण घालावे. दुधाळ जनावरांना शक्‍यतो ज्या ठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे. जनावरांना गोठ्यात बांधावे. हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंना, खिडक्‍यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॉटचे बल्ब लावावेत किंवा रूम हिटरचा वापर करावा. योग्य काळजी घेत, कडाक्‍याच्या थंडीत गोठ्याजवळ शेकोटीही करता येऊ शकते. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे कांड, भुसा वापरून गादी तयार करावी. 

हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे, तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावरे पाणी कमी पितात. जनावरे भरपूर पाणी प्यावीत, यासाठी कोमट पाणी द्यावे. शक्‍यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे. जनावरांना थंडीच्या काळात दुपारी उन्हात धुवावे. हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात द्यावा. अशा उपाययोजना करून पाळीव जनावरांची काळजी घेता येईल.

Web Title: care to cold shock