‘युती’ची अटळ वाट! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे.

२०१९ चा संग्राम आला जवळ
बाजी मारणार शिवसेनेचा बाण...
अन्‌ भाजपचंच कमळ..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी केले, तेव्हाच आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हातात हात घालून लढवणार, याचे संकेत मिळाले होते. फडणवीस यांना ही किंचित कवी बनण्याची संधी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सरकारचे गोडवे गात, विरोधकांना ‘उघडा डोळे, बघा नीट!’ असा टोला लगावत मिळवून दिली होती! त्यापाठोपाठ सोमवारी झालेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, त्यांच्या अयोध्या दौऱ्याचे मुक्‍तकंठाने कौतुक केले होते, तर मराठा आरक्षणाचा कायदा केल्याबद्दल उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळली होती! हे सारे कमी झाले म्हणून की काय, मेळावा संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारी ताफा सोडून उद्धव यांच्या मोटारीतून प्रवास केला आणि याच दोन्ही नेत्यांनी उभ्या केलेल्या दुराव्याच्या दरीवर पडदा पडला! कितीही गर्जना करीत असली, तरी शिवसेना शक्‍तिमान भाजपविरोधात टोकाचे पाऊल उचलेल काय, याबाबत सर्वांच्याच मनात शंका होतीच.

शिवसेनेशी असलेली युती भाजपने २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तोडली, तेव्हा उद्धव यांनी कडवी लढत देत ६३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर विरोधी बाकांवर शिवसेनेने जेमतेम एक महिना काढला आणि ते एके दिवशी उठून थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले, तेव्हाच शिवसेनेला सत्तेपासून दूर राहता येणे अशक्‍य असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर उद्धव यांनी एकीकडे मंत्रिपदेही उपभोगायची आणि त्याच वेळी विरोधी पक्षाची भूमिकाही पार पाडायची, असा ‘डबल रोल’ सुरू केला. पुढे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने या दोन पक्षांमधील तणाव वाढत गेला आणि मुंबई महापालिका निवडणुकीत फडणवीस यांनी ‘वाघाच्या मुखात घालूनी हात, मोजती दात...’ अशी आपली जात असल्याचे ठणकावून सांगितले आणि त्याची परिणती ‘आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल!’ अशी घोषणा उद्धव यांनी करण्यात झाली. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’चा उंबरठाही झिजवला, तरीही शिवसेना नमायला तयार नव्हती. मात्र, एकीकडे भाजपवर आपले ‘बाण’ सोडतानाच, शिवसेनेने भाजपविरोधात ठाम भूमिका घेण्याच्या अनेक संधी गमावल्या होत्या. लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारविरोधात आलेल्या अविश्‍वास ठरावाच्या दिवशी शिवसेना खासदारांनी मैदानातून पळ काढला आणि पुढे राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर थेट भाजपला पाठिंबाच जाहीर करून शिवसेना मोकळी झाली. तेव्हाच खरे तर उद्धव रोजच्या रोज भाजपवर सोडत असलेले बाण, हे ‘रामबाण’ नसून निव्वळ ‘कागदी बाण’ आहेत, हे जनतेला कळून चुकले होते.
एकीकडे मोदी सरकारच्या घसरत चाललेल्या लोकप्रियतेमुळे भाजपची उडालेली त्रेधातिरपीट आणि सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेना फुटण्याच्या भीतीचे त्रांगडे, अशी ही बिकट वाट या दोन पक्षांना अखेर युतीच्या अपरिहार्य वाटेवर घेऊन चालली आहे. उद्धव यांनी थेट अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रारंभी त्यांनी मोदी यांना शरयू तीरावरून थेट मोदी यांना ललकारण्याची भाषा केली होती. मात्र, प्रत्यक्षात सरकार राममंदिरासाठी अध्यादेश काढणार असेल, तर त्यास संसदेत पाठिंबा देण्याची भाषा त्यांनी अयोध्येत केली. त्याच दिवशी या दुराव्याचे आता स्नेहबंधनात रूपांतर होणार, याची साक्ष पटली होती. आता शिवसैनिकांना मात्र एकच आशा असणार आणि ती म्हणजे लोकसभेसाठी होऊ घातलेली युती विधानसभेच्या वेळीही कायम राहील, असा वायदा उद्धव यांनी आपल्या मोटारीत येऊन बसलेल्या फडणवीसांकडून करून घेतला असणार! शिवाय, विधानसभेच्या जागावाटपातही आपला वाटा भक्‍कम असणार, याची ग्वाहीही उद्धव यांना हवी असणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच शिवसेनेला आपला चौफेर उधळणारा घोडा राजकीय बुद्धिबळाच्या पटावर दोन घरे मागे घ्यावा लागला, हे तर उघड आहेच; शिवाय स्वबळावर लढल्यास शिवसेनेत फूट पडायची टांगती तलवारही उद्धव यांच्यावर लटकत होती. त्याच वेळी विरोधकांच्या देशभरातील संभाव्य आघाडीमुळे फडणवीस यांना उद्धव यांच्याशी किमान चार गोड शब्द बोलणे भाग पडले, हेही तितकेच खरे. मोटारीतील प्रेमालापानंतर २४ तासांतच उद्धव यांनी दुष्काळाच्या प्रश्‍नावरून सरकारला धारेवर धरले. याचाच अर्थ निवडणुका जाहीर होईपर्यंत ही नूरा कुस्ती सुरूच राहील, असे दिसते.

Web Title: congress ncp alliance and editorial