पाळणाघर की यातनाघर? (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी मुंबईत खारघर येथे पाळणाघरात दहा महिन्यांच्या चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत?

नवी मुंबईत खारघर येथे पाळणाघरात दहा महिन्यांच्या चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत?

लहानग्या बाळाला काही तासांपुरते पाळणाघरात ठेवायचे आणि रोजीरोटीसाठी रवाना व्हायचे, हे आता शहरी जीवनाचे एक अटळ भागधेय होऊन बसले आहे. मुंबई-पुणे किंवा नागपूरसारख्या बेसुमार वाढीच्या शहरांमध्ये नोकरी- व्यवसाय करणारी जोडपी शेकड्याने आढळतील. शिकून सवरून नव्या उमेदींनिशी आणि स्वप्नांनिशी नवपरिणीत जोडप्यांनी संसाराची सुरवात केलेली असते. रोजची धावपळ विनातक्रार करत, हजार तडजोडी करत चुकतमाकत आपल्या आकांक्षांना फुलवत राहायचे, करिअर, संसार किंवा दोन्ही साधण्यासाठी अनेक नकोश्‍या घटकांकडे डोळेझाक करत जगत राहायचे, हा शहरीधर्म झाला आहे. या जोडप्यांनी कदाचित नुकतीच संसाराची घडी बसवायला प्रारंभ केलेला असतो. त्या नवख्या प्रयत्नांमध्येच कुठेतरी पाळणाघर नावाची एक अपरिहार्यता येते. लहान बाळांना पाळणाघरात ठेवणे, हा नाइलाज असतो. त्यासाठी अपराधगंड बाळगण्याची कुणालाही गरज नाही. नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनीच मुलांना पाळणाघरात ठेवावे, असेही नाही. आपले पोर चार मुलांमध्ये रमले, खेळले तर त्याच्याच वाढीसाठी ते पोषक ठरेल, असाही एक विचार त्यामागे असतो. त्यात तथ्यदेखील आहेच. ही मूर्तिमंत निरागसता निगुतीने सांभाळणारी अनेक पाळणाघरे भरभरून वाहताना दिसतात, ते काही उगीच नाही; परंतु अशाच काही पाळणाघरांमध्ये सैतानाची अदृश्‍य पावले वावरत असतात, याची दरकार आपल्याला नसते. नवी मुंबईत खारघर येथे तीन दिवसांपूर्वी घडलेला प्रकार हे याचेच द्योतक मानावे लागेल. दहा महिन्यांच्या एका चिमुरडीला तेथील सेविकेने केलेली अमानुष मारहाण ही फक्‍त मारहाण म्हणून सोडून देता येणार नाही. ती एक भयानक विकृती आहे. त्या पाळणाघरात "सीसीटीव्ही'ची सुविधा होती, म्हणून त्या सेविकेचा अमानुष अत्याचार त्यामुळे उघड तरी होऊ शकला. पाळणाघरातून मुलीला आणायला गेलेल्या त्या असहाय आईला जेव्हा आपली मुलगी जवळपास बेशुद्ध आणि जखमी आढळली, तेव्हा तिला धक्‍का बसणे साहजिकच होते. तथापि, दुपारी साडेचार वाजता पोलिस ठाण्यात गेलेल्या त्या आईची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत वेळ वाया का घालवला, हे मात्र अनाकलनीय आहे. तसा त्या आईचाच आरोप आहे. पुढील कारवाई यथावकाश होईलच; पण या विकृतीच्या पायबंदासाठी आपण पालक म्हणून काय करणार आहोत, हा सवाल नेहमीसारखा अनुत्तरितच राहणार आहे.

स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणीच योग्य त्या सुविधांसह पाळणाघर अनिवार्य असावे, असा रास्त आग्रह "स्त्रीमुक्‍ती संघटना' गेली कित्येक वर्षे लावून धरते आहे; पण त्या मागणीला ना कधी राज्यकर्त्यांनी भीक घातली, ना खासगी क्षेत्राने. कामाच्या ठिकाणी पाळणाघर असेल तर आई काम सांभाळून निर्धास्तपणे मूलदेखील सांभाळू शकते, यामुळे उलट तिच्या कार्यक्षमतेत वाढच होते; पण हा पाळणाघरांचा नसता खर्च कोण करणार, हा ऱ्हस्व दृष्टिकोन आजवर घात करत आला. परिणामी, जागोजाग खासगी पाळणाघरांचे पेव फुटले. तेथील संचालिका प्रशिक्षित आहे काय, तेथे अन्य सोयीसुविधा कशा आहेत, ते नोंदणीकृत आहे काय, तेथील सेविकांचे मानसिक आरोग्य बरे आहे काय, आदी प्रश्‍नांचा धांडोळा घेत बसण्याकडे पालकांचाही कल नसतो. वास्तविक पाळणाघर ही अत्यंत गांभीर्याने चालवण्याची गोष्ट आहे.

विकसित देशांमध्ये त्यासाठी कमालीचे कडक नियम आहेत. पालकांनी आपल्या हाती दिलेले लहानगे लेकरू ते येईपर्यंत यथाशक्‍ती सांभाळत राहाणे, एवढीच पाळणाघराची जबाबदारी नसते. त्याच चिमुकल्या वयात मानवी मेंदूची अफाट वेगात वाढ होत असते. भवतालामधूनच ते मूल सर्वच्यासर्व गोष्टी ग्रहण करीत असते. त्या गोष्टींचा भलाबुरा परिणाम त्यांच्यावर होत असतो. त्या सेविकेसारखी एखादी विकृत पालनकर्ती मिळाली, तर अशा लहानग्यांवर काय परिणाम होईल, हे सांगण्यास कुण्या मानसतज्ज्ञाची गरज नाही. पाळणाघराबद्दल मुलांना नेमके काय वाटते हे सांगणारा एक किस्सा पुरेसा बोलका आहे.

एक चिमुकली मुलगी आपल्या आईला विचारते की, "आई, तुझी पैशांनी भरलेली पर्स तू आपल्या पाळणाघरवाल्या मावशींकडे ठेवायला देशील का...'' या निरागस प्रश्‍नाला आई चटकन "नाही', असे उत्तर देते. या उत्तरातून जे प्रश्‍नांचे मोहोळ त्या चिमुकलीच्या मनात घोंघावत असेल, त्यांची उत्तरे कोण नि कशी देणार?

Web Title: daycare or hell?