हत्ती विरुद्ध ड्रॅगनचा संघर्ष 

धनंजय बिजले 
सोमवार, 29 जून 2020

गलवान खोऱ्यातील चिनी घुसखोरीनंतर भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.कोरोनाचा मुकाबला करीत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे दोन देश आमनेसामने उभे ठाकले आहेत

गलवान खोऱ्यातील चिनी घुसखोरीनंतर भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करीत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे दोन देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. आशियाच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच जगभरातील माध्यमांनी चीनच्या घुसखोरीचे विविध अंगाने विश्‍लेषण केले आहे. 

जगात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या "द इकॉनॉमिस्ट"ने या संघर्षाचे वर्णन करताना म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात चीनने नेहमीपेक्षा जास्त सैन्य भारताच्या सीमेजवळ आणले ती मनाशी एक योजना आखूनच. या सीमेवरील अनेक वर्षांची शांततापूर्ण "जैसे थे" स्थिती चीनने आत्ताच का बदलली हा खरा प्रश्न आहे. कोणी म्हणेल कोरोनाशी लढताना भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे चीनने ही चाल खेळली असेल. पण भारतीय टीकाकारांच्या मते भारतानेच या भागातील "जैसे थे" स्थिती आधी बदलली आहे. भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, या भागात हळूहळू पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली. तसेच पाकव्याप्त काश्‍मीर व अक्‍साई चीन ताब्यात घेण्याची भाषा भारतीय नेत्यांनी सुरू केली. त्यामुळेच चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेशी जास्त दोस्ती केल्यास त्याची किंमत मोजावी लागले, असा इशाराही चीन यातून भारताला देवू पहात आहे. सध्या जरी चीन बलवान वाटत असला तरी मार्ग शोधल्यास भारत चीनला नक्कीच वेदना देऊ शकतो. त्यामुळे सारे जग हत्ती विरुद्ध ड्रॅगनच्या या संघर्षाकडे डोळे लावून बसले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

...तर परिस्थिती हाताबाहेर  
"न्यूयॉर्क टाइम्स"ने दोन्ही देशांच्या नेतृत्वाबाबत टिपण्णी करताना म्हटले आहे की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांची प्रतिमा आपापल्या देशांत कट्टर राष्ट्रवादी नेते अशी आहे. दोन्ही नेते प्रचंड महत्त्वाकांक्षी असून त्यांना स्वतःच्या देशांत मोठी भूमिका अदा करण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक प्रश्न असले तरी उभय नेत्यांनी पोलादी प्रतिमेच्या संवर्धनावर नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे माघार घेणे त्यांच्यासाठी कठीण बनले आहे. कोरोनाच्या साथीने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. अशा काळात हा लष्करी संघर्ष अधिक चिघळल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. "गार्डियन'च्या मते दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. तेथील सरकारेही प्रखर राष्ट्रवादी म्हणून ओळखली जातात. अशा परिस्थितीत या संघर्षाचे परिणाम साऱ्या जगावर होतील. अचानक उद्भवलेल्या संघर्षाने परिस्थिती बिकट बनली आहे. 

चीनचे वागणे निराळे  
"बीबीसी'ने चीनविषयक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ञांशी बोलून केलेल्या विश्‍लेषणात म्हटले आहे की, सीमेवर सध्या अभूतपूर्व असा तणाव आहे. 3440 किलोमीटरच्या या सीमेवर गेल्या 40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर आत्ताचा संघर्ष आश्‍चर्यकारक आहे. यावेळचे चीनचे वागणेही निराळे आहे. यामागे विविध शक्‍यता आहेत. कदाचित सीमेलगत अनेक पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे चीनने ही कुरापत काढली असावी. अथवा अंतर्गत प्रश्न, आर्थिक अडचणींवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीही चीनने हा मार्ग अवलंबला असावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनी माध्यम्ये चिडीचूप  
भारतासह जगभरातील माध्यमांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सविस्तर विवेचन केले असले तरी चीनमधील माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. हे धक्कादायक आहे. चीनच्या सैन्याची जास्त जीवितहानी झाल्याने असे घडले असेल. चीनच्या "ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात भारतीय हुतात्म्यांची संख्या नमूद करताना सीमेवरील संघर्षात चीनचे किती जवान मारले गेले, याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. सीमेवरील हा प्रश्न चीनला आणखी चिघळू द्यायचा नाही. तसेच मृतांच्या संख्येची तुलना करून चीनला तो आणखी वाढवण्याची इच्छा नाही, अशी मखलाशी या दैनिकाने अग्रलेखात केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीव्हीवर फारसा उल्लेखही नाही  
चीनच्या सरकारी टीव्हीवरील सायंकाळच्या बातम्या कोट्यवधी चिनी नागरिक न चुकता पाहतात. या बातमीपत्रात सीमेवरील या घडामोडींना फारसे स्थान दिले जात नसल्याचे चित्र आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी मोठी नाराजी असून त्यांच्याविरुद्ध सध्या जनमत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले असल्याने कदाचित या बातमीला स्थान दिले गेले नसण्याची शक्‍यता असल्याचे मानले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay bijale India China conflict after Chinese incursion into Galwan Valley