ढिंग टांग : सही!

ब्रिटिश नंदी
Monday, 23 September 2019

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.
वेळ : ‘रात्रीस खेळ चाले’...नंतरची.
प्रसंग : भयंकर उत्सुकतेचा.
पात्रे : महाराष्ट्राचे तारणहार मा. उधोजीमहाराज 
         आणि सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई महाराज.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.
वेळ : ‘रात्रीस खेळ चाले’...नंतरची.
प्रसंग : भयंकर उत्सुकतेचा.
पात्रे : महाराष्ट्राचे तारणहार मा. उधोजीमहाराज 
         आणि सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई महाराज.

............................

उधोजीराजे : (बंद दाराकडे पाहून खाकरत) 
अह...अह...खक...खक!

कमळाबाई : (बंद दाराआडून करड्या आवाजात) 
कोण आहे?

उधोजीराजे : (मिशीला पीळ देत गोड हसत) 
आम्हीच आहोत! उघडता ना दार? कडी काढा कडी!!

कमळाबाई : (संशयी सुरात) आम्ही म्हंजे कोण? काही नावगाव आहे की नाही तुम्हाला?

उधोजीराजे : (उतावीळपणे) असं काय करता? आम्ही...आम्ही आहोत! कडी!! !

कमळाबाई : (फणकाऱ्याने) वाट्‌टेल त्याला दार उघडायची नाही हं मी!

उधोजीराजे : (सर्द होत) पुरे झालं आता!...कडी!!

कमळाबाई : (निक्षून सांगत) कडी निघणार नाही! उद्या सकाळी या!!

उधोजीराजे : (राग आवर मिशीला पीळ देत) कडी!!

कमळाबाई : (शांता आपटे स्टाइल) हे पहाऽऽ...माझ्या खोलीत दिवा आहे!

उधोजीराजे : (खेळकरपणे) हॅ:!! त्यात काय? आमच्याकडे पण एलइडी दिवे आहेत..!

कमळाबाई : (दुर्लक्ष करत) आमच्याकडल्या दिव्यात तेलदेखील आहे! दरवाजा उघडायचा प्रयत्न कराल, तर-

उधोजीराजे : (संयम सुटून) बाई, तुमची मनधरणी करण्यात आमची काही कुसूर झाली का? गेले काही महिने आम्ही फक्‍त आणि फक्‍त मधाळ बोलतो आहोत! मुखातून चुक्‍कूनही वावगा शब्द जाऊ दिला नाही की काडीमोडाबद्दल एक अक्षर  उच्चारले नाही! 

कमळाबाई : (फणकाऱ्याने) काही उपकार नाही केले! 

उधोजीराजे : (बळेबळे गोड बोलत) असं का बरं बोलता? कडी काढा ना!!

कमळाबाई : (नाकाला पदर लावत) आधी आमचा किती छळ केलात, ते सारा महाराष्ट्र जाणतो!! आम्ही म्हणून सगळं सहन केलं! रयतेच्या सुखासाठी साऱ्या यातना कडू घोटासारख्या गिळल्या!! (आवंढा गिळतात) गुटुक!!

उधोजीराजे : (उत्सुकतेने) काय गिळताय? 

कमळाबाई : (उसळून) हेच...हेच ते टोचून बोलणं बरं!!

उधोजीराजे : (बंद दाराच्या फटीतून डोकावून पाहात) बाईसाहेब, का आमचा अंत पाहात आहात? कडी काढा, आणि आम्हाला आत घ्या! एवढी एक सही करा, आम्ही आल्यापावली परत जाऊ! 

कमळाबाई : (जबर संशयाने) कसली सही? उद्या सकाळी या! आम्हाला आता झोप आली!!

उधोजीराजे : (अजीजीने) अहो, आपल्या प्रॉपर्टीच्या वाटपाचे काम बाकी राहिले आहे!! सारे काही फिफ्टी-फिफ्टी वाटून घेऊ असे तुम्ही सर्वांसमक्ष म्हटलं होतं! त्याचा दस्तऐवज घेऊन आलो आहे! करता ना सही?

कमळाबाई : (कुटिलपणाने) इश्‍श! एवढंच ना? कसली मेली ती वाटणी नि प्रापर्टी!! तुमचं आणि माझं का वेगळं आहे? घ्या तुम्हाला काय पाहिजे ते!!

उधोजीराजे : (आनंदाच्या उकळ्या फुटत) खरंच! आमची कमळाबाई खरोखर मोठ्या मनाची हो!! 

कमळाबाई : (बंद दाराआडूनच) आहेच मुळी! तुमच्यासारखी कद्रू नाही मी!! पण जा आता! उद्या-परवाकडे बघू सहीचं!! 

उधोजीराजे : (कृतज्ञ आवाजात) आमच्या मनात काही किल्मिष नाही, पण लोकांचा आग्रह आहे की बाईसाहेबांकडून सारे काही लेखी घ्या! जे बोललात, ते कागदावर लेखी दिलंत तर शिक्‍कामोर्तब होईल!

कमळाबाई : (जखमी सुरात) का? आमच्यावर विश्‍वास नाही का?

उधोजीराजे : (एक डेडली पॉज घेत) आमच्या विश्‍वासाचं काय घेऊन बसलात? लोकांचा विश्‍वास बसायला नको का? देताय ना सही? काढताय ना कडी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article