गोवा : एक व्यसन! (ढिंग टांग!)

-ब्रिटिश नंदी
बुधवार, 15 मार्च 2017

"ह्या प्यांटीवर आनि शरटावर एक प्लाष्टिकचा टमरेलसुद्धा भेटनार नाही' असं तिनं तोंडावर सांगून वर "पायपुसनं म्हनून वाप्रुन टाक, ताई' असा फुकट सल्ला दिला होता...

सुटीचा दिवस असला तरी माणसं जरा म्हणून स्वस्थ बसू देत नाहीत. सकाळी आंघोळबिंघोळ करून जरा पेपर वाचत पडावं असं म्हटलं. (नुसतं म्हटलं!) तर कुटुंबानं भूत पाहिल्यासारखं बघितलं.

आता सुटीच्या दिवशी माणूस आंघोळ करीत नाही का? पण काय बोलणार? म्हटलं, "अहो, पेपर कुठाय आजचा?' तर कुटुंबानं पुन्हा भूत बघितल्यासारखं पाहिलं. (वरील वाक्‍यरचना लक्षात घ्या... आधी पाहिल्यासारखं बघितलं, नंतर बघितल्यासारखं पाहिलं. फरक असतो. असो.) आंघोळीचा मूडच गेला. आता एकदा आंघोळीचा मूड गेला, की मग बराच काळ लागता लागत नाही, हे तुम्हीही कबूल कराल. "मित्र घरी आले तर प्रॉब्लेम होईल', असं पुटपुटत ठेवणीतले कपडे काढले, चढवले आणि घराबाहेर पडलो झालं! नाक्‍यावर आमचं टोळकं वाट बघत किंवा पाहत असणारच ना!! एरवी आम्हाला बघून मित्रांची बऱ्यापैकी पांगापांग होते. जो तावडीत सापडतो, त्यालाच आम्ही हातउसने पैसे मागतो. जाऊ दे. बाकी आमचे ठेवणीतले कपडे खरोखरीच "ठेवणी'तले होते. बोहारणीने रिजेक्‍ट केलेला माल होता तो.

"ह्या प्यांटीवर आनि शरटावर एक प्लाष्टिकचा टमरेलसुद्धा भेटनार नाही' असं तिनं तोंडावर सांगून वर "पायपुसनं म्हनून वाप्रुन टाक, ताई' असा फुकट सल्ला दिला होता... तर हे कपडे घालून घराबाहेर आलो, तर येणारेजाणारे भूत बघितल्यासारखे बघत होते. (वाक्‍यरचना बघा हं!) म्हटलं, तेज:पुंज माणसाकडे लोक बघणारच किंवा पाहणारच.

...नाक्‍यावर पोचलो, तर पानाच्या दुकानाशी आमचं टोळकं उभंच होतं. पूर्ण रंगलेलं. आम्हाला बघून त्यांची पांगापांग झाली नाही. कारण धुळवडीला कोण क्‍याश घेऊन फिरतो? आम्ही नाक्‍यावरच्या पानवाल्याला नेहमीच्या सुरात फर्मावलं- "एक गोवा दे बे!'' ही आमची नेहमीची ऑर्डर. पण धुळवडीच्या दिवशी मात्र एवढ्याशा ऑर्डरीवरून बव्हाल झाला...

""इकई पुडिया थी, इन्हे दे दी!,'' पानवाल्या भय्याने एका माणसाकडे बोट दाखवून सांगितलं आणि दोन्ही हात वर केलेन! शी:!! घाणेरडा! परप्रांतीय कुठला!! त्यानं दाखवलेला माणूस मात्र नखशिखांत काळ्या रंगात न्हायलेला होता.

""अरे सुधींद्रजी कुलकर्णी, तुम्ही इकडे कुठे?'' आम्ही त्या माणसास म्हणालो. काळ्या रंगात न्हायले तरी ओळख पटायची थोडीच राहते? पण सुधींद्र कुलकर्णी पुस्तकाची पाने खायचे सोडून खायच्या पानाकडे कधी वळले बरं?

""अबे, तो सुधींद्र नै बे...,'' पानवाल्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका ऐसपैस तांबड्या रंगानं सुनावलं, ""कोणालेही सुधींद्र म्हणून देतो का बे? भैताडच्चै!!'' पण आम्ही गप्प बसलो. काळा रंग फासूनही मनमुराद हसणारा मनुष्य पाहिला की आमचं हे नेहमी असं होतं.

""ऍक, कितें रे...अहो, मी सुधींद्र नाही, हांव मनोहर पर्रीकार!,'' कृष्णरंगात बुडालेल्या त्या गृहस्थानं शेवटी ओळख दिली. हु:!! मनोहर म्हणे!!

""गोव्याशिवाय मला चालत नाही!!'' आम्ही हट्टानं म्हणालो. पानवाल्या भय्याचंही हे चुकलंच. वास्तविक आम्ही नेहमीची गिऱ्हाइकं. पण नेहमीच्या गिऱ्हाइकाला सोडून दुसऱ्याच्याच समोर चुन्याची दांडी धरणारे हे लोक...परप्रांतीय कुठले!!

""गोव्याशिवाय मलाही चालत नाही हो!'' काळ्या रंगातला तो मनुष्य अजीजीने म्हणाला.

डोळ्यांदेखत गोव्याची पुडी दुसऱ्याच्या खिशात जाताना बघत राहाणं (पुन्हा वाक्‍यरचना बघा हं!) किती यातनामय असतं, हे ज्याचं जळतं त्यालाच क़ळतं. वर्षानुवर्ष आम्ही व्यसनं करतोय. कधी कुणापुढे हात पसरला नाही की मनधरणी केली नाही. आता हे व्यसन केल्यानं आप बीमार... बहुत बीमार हो सकते है, हे आम्हाला ठाऊक आहे. पण काय करणार? व्यसन ते व्यसन. हो की नाही?
""आमचा गोवा, आमका जाय!,'' मनोहरबाब ठामपणाने म्हणाले. मग शेवटी आम्ही अनिच्छेनं का होईना...गोवा त्यांना देऊन टाकला. तर त्यांनीही आमच्याकडे भूत बघितल्यासारखं पाहिलं! असो. द्येव त्यांचे बरे करो!!

Web Title: dhing tang article

टॅग्स