गुत्त्यातला गुंता! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

""शूऽऽऽ...कोण म्हॅणतॅ ऑम्ही बघू नाईऽऽ...हिक! बघू की नक्‍की बघू!! ऑम्ही कधीश्‍श कोण्णावय अन्याय कहरत नाई...'' ज्यूलीच्या अंमलामुळे आम्हाला उच्चार धडसे जमले नाहीत, हे मान्य. पण भावना पिव्वर होती, हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे

""आम्ही औडत नै वाटतं!,'' "बॉबी'ने फुरंगटून विचारले, तेव्हा आम्ही थोडे कावरेबावरे झालो.
"' छे, छे, असं काही नाही. आज ही ज्यूली म्हणाली की आमची टेष्ट करा...म्हटलं आज ज्यूली तं ज्यूली...बॉबी तो अपनीच है नाऽऽ,'' आम्ही तिची प्रेमाने समजूत घातली. पण तिच्या नाकावरचा राग काही गेला नाही. महाराजा उगीच वाकून बाजूला उभा होता. एअर इंडियाच्या महाराजासारखा! इतकं वाकून त्याची कंबर कशी धरत नाही कोण जाणे!! जाऊ दे.
""साहेब, आमचंही काही वायट नाही...घेऊण बघा!'' महाराजाने पडेल आवाजात आवाहन केले खरे, पण आसपास इतक्‍या साकिया असताना त्याच्याकडे दुर्लक्ष होणे साहजिकच होते.
""हाऽऽ, पडलाय म्होटा म्हाराजा...कोन इच्यारिना तुला!'' भिंगरीनं मंद पावलं टाकत आमच्या दिशेनं येत त्यास हिणवले. महाराजाचा कणा ताठ झाला. वाट्टेल ते ऐकून घेणारा हा महाराजा नव्हे!! शेवटी शंभर नंबरी माल आहे!! ज्यूली, बॉबी, भिंगरीला तो काही लागट बोलणार, हे आम्ही ओळखले.
""...अरे, आधी तळलेली डाळ, चकली, शेव असं काही तरी आणा की राव!,'' आम्ही विषय बदलायचा प्रयत्न केला. मधुशाळेत माणसाने भांडू नये. ही भांडणाची जागाच नव्हे. इथं शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आलेली असते. मधुशाळेत यावे. आपले नेहमीचे टेबल पकडावे. पुढील काळजी घेण्यास ज्यूली, बॉबी, भिंगरी समर्थ असतातच. काय? शिवाय मेन कोर्सकडे जाण्याआधी माणसाने ष्टार्टरची काळजी केली पाहिजे, हे जीवनातले एक महत्त्वाचे सत्य आहे.
""कांदा मारके?'' भिंगरीनं विचारले.
""डब्बल...तेरे साथ कांदा होनाच!!'' आम्ही भिंगरीला म्हणालो. भिंगरीचे आणि आमचे तसे बरे जमते. ज्यूलीशीच वळख थोडी कमी पडल्याने ती सध्या वाढवत आहो!!
""साहेब, आपण आमच्याकडं बघू पण नाही ना?'' महाराजा खंतावलेल्या आवाजात म्हणाला. त्याच्या सुरात अशी काही वेदना दडली होती की आम्हाला कणव आली.
""शूऽऽऽ...कोण म्हॅणतॅ ऑम्ही बघू नाईऽऽ...हिक! बघू की नक्‍की बघू!! ऑम्ही कधीश्‍श कोण्णावय अन्याय कहरत नाई...'' ज्यूलीच्या अंमलामुळे आम्हाला उच्चार धडसे जमले नाहीत, हे मान्य. पण भावना पिव्वर होती, हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे.
""जा रे, म्हाराजा...उगा सायबांच्या काणाला लागू नगंस! दुसऱ्याच्या गिलासात मान्सानं डोळं घालू णये!!'' ज्युलीने आक्रमक पवित्रा घेतला. महाराजाच्या आगांतुक येण्याने तिची खिट्टी सटकली असणार. नेहमीचे गिऱ्हाईक असे कोणी तोडून नेले तर कसे चालायचे?
""बापाचा माल हाय का तुज्या!! आमचा माल काय कमी हाय का? उगी बाईमाणूस झालं म्हणून बोलू नगोस हां, सांगून ठेवतोय! सौजेण्य नावाची काही गोस्ट आहे की णाही?,'' महाराजाने आपली विनम्र पोज सोडून देत सात्विक संताप प्रकट केला. होय, सात्विक संतापच!
""ओ, महाराजा! नीट निघायचं आनि घरच्या शिंव्हासनावर पाय वर घिऊण बसायचं! हितं तुमचं काही काम नाही...'' बॉबीने चुटक्‍या वाजवत महाराजाला दाराबाहेर काढायची लैन चालवली.
""बायकात पुरुस लांबोडा, भाजून खातुय कोंबोडा...येडा!,'' भिंगरीनं हात नाचवीत त्याला "आहा रे' केले. महाराजाचाचा चेहरा पडला.
""साहेब, तुम्हीच आता बघा! मी काही बोलतोय का? जंटलमनसारका इज्जतीत निस्ता हुबा आहे...उगा या बाया नडिंग करतात!'' महाराजानं त्याची फिर्याद आमच्या कोर्टात मांडली.
""शूऽऽ..., भांडू नका रे, आम्ही तुमच्या सगळ्यांची थोडी थोडी घेऊ...'' आम्ही तोडगावजा दिलासा दिला. आमच्या राज्यात हरेकाला न्याय मिळतो, हॉंऽऽऽ...
बराच वेळ त्यांच्यात भांडणे चालू राहिली. आम्ही आमच्या कामात अक्षरश: बुडालो. चकल्या संपल्या, शेव संपली, चणा डाळ गडप झाली...पण तोडगा काही निघेना!!
अखेर शेजारच्या टेबलावर नुसताच सोडा पीत बसलेल्या एका भाऊसाहेबांनी तोडगा सुचवला. ते म्हणाले, ""अरे महाराजा, तुझं नाव बदलून महाराणी कर...मग बघ कशी पळशील ते!! चीअर्स!!''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article