ढिंग टांग : मनोज्ञा अमावास्येचे व्रत!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 31 जुलै 2019

दीप अमावास्येचे महत्त्व कोणास ठाऊक नाही? ह्या दिवशी आषाढ संपून श्रावणमासी मनीमानसी हर्ष होऊन चोहीकडे हिर्वळ दाटावी, असे वेधुं लागतात. श्रावण हा तर व्रतवैकल्याचा महिना.

महिनाअखेर आणि गटारी अमावास्या एकत्र येणे हा एक मोठा दैवदुर्विलास आहे. महिनाअखेरीस खिश्‍यात खडखडाट राहात असून, उधारी मिळणे अवघड झालेले असते. महिन्याच्या सतरा तारखेपासून (पुढील) पगाराच्या वायद्यावर दैनंदिन खर्च चालत असल्याने ऐन महिनाअखेरीस दुष्काळात तेरावा महिना घेऊन दीप ऊर्फ गटारी अमावास्या येत्ये. दीप अमावास्येचे हे व्रतच खडतर आणि फलदायी आहे. सुविख्यात खलनायक श्री. रा. रा. अजित ह्यांच्या भाषेत सांगावयाचे तर ‘इसे लिक्‍विड आक्‍सिजनके चेंबर में बंद कर दो... आक्‍सिजन इसे मरने नहीं देगा और लिक्‍विड इसे जीने नहीं देगा!’ असा हा जीवनमरणाचा संगम आहे.

दीप अमावास्येचे महत्त्व कोणास ठाऊक नाही? ह्या दिवशी आषाढ संपून श्रावणमासी मनीमानसी हर्ष होऊन चोहीकडे हिर्वळ दाटावी, असे वेधुं लागतात. श्रावण हा तर व्रतवैकल्याचा महिना. ती व्रतेंदेखील अतिशय खडतर अशी असतात. त्यासाठी मनाची पूर्वतयारी करावी लागते. क्रिकेट लढतींच्या मालिकेआधी दोनेक सराव सामने खेळावे लागतात, तद्वतच दीप अमावास्येचे व्रत ही एक प्रॅक्‍टिस म्याच आहे. दीप अमावास्येचे व्रत हे एक मनोहर व्रत आहे. मनोनिग्रह, मनोनिर्धारण आणि मनोन्नयनाची ही एक कसोटीच असते. म्हणून त्याला काहीजणे ‘मनोज्ञा अमावस्या’ असेही म्हणतात. सामान्यजन त्यास गटारी अमावास्या असे संबोधतात.

गटाराचा आणि ह्या व्रताचा फार जवळचा संबंध आहे. गटार हा एरवी घाण वाहून नेणारा मलिन प्रवाह असे मानले जाते. परंतु गटार ही लोकगंगा आहे. जनलोकांच्या तमोगुणांचा मैला वाहोन नेणारी ती लोकवाहिनीच... अशा पुण्यप्रवाहात लीन होणे, हे मोठे पवित्र कार्य आहे. गटारी अमावास्येला ते लीन होणे लीलया साधते!!

अमावस ऊर्फ गटारीचे व्रत कसे करावे?
आदले दिशीपासून स्नान करू नये. आपल्या नेहमीच्या मटणवाल्यास आगाऊ ऑर्डर नोंदवावी. (सोबत पाव किलो खिमाही सांगून ठेवावा.) फक्‍त गटारीस थोडेसे चिकन खाणारी एक फार मोठी प्रजा असते. एरवी ही प्रजा पडवळ, गिलके, गड्डाकोबी, फुग्या मिरच्या अशा हरित भाज्यांवर पुष्टिलेली असते. गटारीस मात्र चिक्‍कार बडबड करून ही मंडळी मुर्गी, कोंबडीवडे, खिमा कटलेट अशी मोठमोठी नावे बेधडक उच्चारतात. अशा मंडळींनी ह्या दिवशी प्रात:काळी (काळी पिशवी घरातून नेऊन) ब्रायलर (बोनलेस) कोंबडी आणून ठेवावी. (सोबत तीन अंडीही!) तळलेली चणाडाळ, मूंग डाळ, टुकडा चकली विथ शेजवान चटणी (ह्या पदार्थाचा शोध लावणारांस कडकडून भेटायची इच्छा आहे. असो!) आदी चविष्ट व्यंजने ह्या सणाच्या दिवशी अधिक सुंदर लागतात. पूर्वीच्या काळी चकली दिवाळीच्या दिवसात खमंग लागत असे. आता हा पदार्थ ‘बार’माही झाला आहे. चकलीसोबत दही खावे पण ते घरी!! बाहेर हा पदार्थ चटणीसोबतच उत्तम लागतो. असो.

दीप अमावास्येच्या दिवशी गोरज मुहूर्तावर व्रत मांडावे. इष्टमित्रांसमवेत समबुद्धीने ‘बसून’ यथासांग व्रत पार पाडावे. हे व्रत रात्रभर करावे. त्यासाठी मनोनिग्रह आणि मनोनिर्धारण आवश्‍यक असते. ते साधले की मनाचे उन्नयन अर्थात मनोन्नयन आपापत: साधते... सकाळी उठून आपापल्या घरी जावे!!

दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी स्वत:चे डोके धरून ‘आले-लिंबू’ चोखत शांतपणे बसलेले असताना ‘आले का दिवे लावून? आले का शुद्धीत?’ आदी प्रश्‍न कानावर आदळताक्षणी व्रताची सांगता होते. मुमुक्षुंस मोक्ष मिळतो. इति.

तळटीप : महिनाअखेरीस घाबरूं नये! उधारी ही गटारीची सख्खी बहीण आहे, हे ध्यानी ठेवावे!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang article Gatari Amavasya