ढिंग टांग : लोकनिष्ठेचे झेंडे!

ढिंग टांग : लोकनिष्ठेचे झेंडे!

मुलांनो, आज आपण ‘थोरांची ओळख’ या कार्यक्रमाअंतर्गत मा. अण्णासाहेब झेंडे यांचा परिचय करून घेणार आहोत. मा. अण्णासाहेब कोणाला माहीत नाहीत? सारा देश त्यांना ज्वलज्जहाल स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रकार्यास सर्वस्व वाहणारा मार्गदर्शक म्हणून ओळखतो. पक्षासाठी तर ते आधारस्तंभ आणि संकटमोचक असे दोन्हीही आहेत. मा. अण्णासाहेब आहेत, म्हणून पक्ष आहे, असेच लोक म्हणतात. त्यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे. एकवेळ प्राण त्यागीन; पण पक्ष सोडणार नाही, असे बाणेदार उद्‌गार त्यांनी मध्यंतरी एका भाषणात काढले होते. मा. अण्णासाहेब साठीचे असले तरी दिसतात अगदी तरुण. राजबिंडेच म्हणा ना!  उत्तम इस्तरीचा, स्वच्छ, पण साधाच पोशाख, हा त्यांचा वेश सर्वपरिचित आहे. त्यांच्या जाकिटाच्या खिशाला लावलेले चकाकते सोनेरी पेन सुप्रसिद्ध आहे, ते त्यांना इंग्लंडच्या राणीने भेट दिले होते असे म्हणतात. मा. अण्णासाहेबांचा जगभर आदर केला जातो.

अण्णांना बालपणापासूनच राष्ट्रकार्याची ओढ होती. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. परंतु, पू. बापूंच्या हाकेला ‘ओ’ देत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आपल्या शिक्षणाचा अक्षरशः होम केला. खडतर कारावास भोगला. देश स्वतंत्र झाल्यावर मात्र त्यांनी ‘इदं न मम’ या वृत्तीने सत्तेकडे पाठ फिरवून समाजकार्यास वाहून घेतले. देशाच्या उभारणीत योगदान देण्याच्या मिषाने त्यांनी वाळूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू जम बसवत ते बांधकाम व्यावसायिक झाले. वाळूच्या व्यवसायातील गुंडांना वठणीवर आणण्यासाठी म्हणून मा. अण्णासाहेबांनी शस्त्रही बाळगले. हळूहळू गुंडांचा नायनाट होऊन वाळू व्यवसाय बऱ्यापैकी शुद्ध झाला, याचे श्रेय मा. अण्णासाहेबांनाच जाते. व्यवसाय सांभाळूनच त्यांनी राजकारण, समाजकारण अहर्निश केले. लोककल्याणासाठी म्हणून काहीकाळ त्यांनी मंत्रिपदही भोगले; पण सत्तेत त्यांचा जीव फारसा रमला नाही. 

ईव्हीएम यंत्राबद्दल त्यांचे मत चांगले नव्हतेच. त्यात गेल्या निवडणुकीत त्यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. हा निःसंशय ईव्हीएमचा घोटाळा होता. अन्यथा मा. अण्णांसारखा सर्वप्रिय नेता पराभूत कसा होईल बरे? ईव्हीएमविरोधी लढा सुरूच राहील, असे मा. अण्णासाहेब अजुनी म्हणतात.

अण्णा जेमतेम साठ वर्षांचे असूनही सत्तर वर्षांपूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीत कसे काय, असा अत्यंत हिणकस सवाल त्यांचे विरोधक अधूनमधून करतात; पण मा. अण्णासाहेब त्यांना नुसते हसून नम्र नमस्कार करतात. मध्यंतरी वारे बदलून देशातील लोकशाही धोक्‍यात आली. मा. अण्णासाहेबांना विलक्षण दु:ख झाले. काय हे? जगातील महान लोकशाहीची ही किती विटंबना? त्यांनी आवाज उठवला. साहजिकच हुकूमशाही वृत्तीच्या (हिटलरशाही असा खरा शब्द आहे...) सत्ताधाऱ्यांनी मा. अण्णासाहेबांना गजाआड करण्याचा जणू चंगच बांधला. ‘मला गजाआड करणारा अजून पैदा व्हायचाय’ अशी डरकाळी मा. अण्णासाहेबांनी मारली. निष्कलंक चारित्र्य असलेल्या मा. अण्णासाहेबांपुढे कुठलाच आरोप आजवर कधी टिकला नाही, यापुढेही टिकणार नाही.

जनता तथा सामान्य माणूस हा मा. अण्णासाहेबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, त्यापुढे ते सत्ता वा सुखसुविधा, पैसा वा पदे, हे सारे तुच्छ मानतात. जनहितापुढे माझे जीवनच तुच्छ आहे, असे ते म्हणतात. परवाचीच गोष्ट. एक सरकारी अधिकारी त्यांच्या निवासस्थानाच्या दारावर ईडीची नोटीस चिकटवून गेला. मा. अण्णासाहेब बधले नाहीत. केवळ लोककल्याणासाठी मी सत्तेत सामील होईन, अशी अट घालून ते आजच सत्ताधारी पक्षात गेले. त्यांच्या या निर्णयाचे लोक प्रचंड स्वागत करीत आहेत. लोकनेता असावा तर असा! हो की नाही मुलांनो?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com