ढिंग टांग : जागावाटप!

maharashtra political
maharashtra political

चंदुदादा कोल्हापूरकर : (ऐसपैसपणे) या, या! तुमचीच वाट पाहात होतो!

सुभाषाजी देसाई : (सर्द होत) अहो, आमच्याच घरात आमचं स्वागत कसं करता?

गिरीशभाऊ महाजन : (वाद न वाढवण्याच्या प्रयत्नात) तुमचं आणि आमचं काही वेगळं आहे का?.. शिवाय आमचे मोदीजी म्हणतात वसुधैव कुटुंबकम! म्हंजे अवघं विश्‍व हे एकच कुटुंब आहे!!

चंदुदादा : (चष्मा पुसत) चहा घेणार? की थंड मागवू?

सुभाषाजी देसाई : (आणखी सर्द होत) यजमान मी आहे की तुम्ही? माझ्याच घरात तुम्ही का चहा मागवताय?

गिरीशभाऊ : (रदबदली करत) आपण इथं आलोय वेगळ्या कामाला! चहासाठी पुन्हा येऊ कधीतरी!

चंदुदादा : (गंभीर आवाजात) महायुतीच्या जागावाटपाची प्राथमिक बोलणी करण्यासाठी आपण इथं जमलो आहोत! युती होणारच आहे! पण जागावाटप करावं लागणार!!

गिरीशभाऊ : (उतावीळपणे) देवच बोलला!! 

सुभाषाजी देसाई : (रुमालाची घडी करत) सगळंच आधी ठरलंय! असं भेटायचं असंही आधीच ठरलंय! निम्मेनिम जागा आणि मुख्यमंत्री आमचा अशी समसमान वाटणी आधीच झाली आहे! आता त्यात चर्चा करण्यासारखं काय आहे?

चंदुदादा : (दचकून अंग काढत) मुख्यमंत्री तुमचा? असं कधी ठरलंय?

सुभाषाजी : (समजूत घालत) तुमचे अध्यक्ष मोटाभाई मागल्या खेपेला ‘मातोश्री’वर आले होते, तेव्हा त्यांनी सगळं कबूल केलेलं आहे! माननीय फडणवीससाहेबांनीही कबूल केलेलं आहे! इन फॅक्‍ट, ‘तुम्ही म्हणत असाल तर यापुढे मी शेपूची भाजीही आवडीने खाईन’, असा शब्द त्यांनी दिला होता!

गिरीशभाऊ : (अविश्‍वासानं) छे छे! असं कुठं होतंय का? शेपूची भाजी कोण आवडीनं खाईल? ह्या:!!

चंदुदादा : (चष्मा पुसत) लोकसभेच्या युतीच्या वेळी जी काही बोलणी झाली होती, ती आता कालबाह्य झाली! आता परिस्थिती बदलली आहे! पोरगं शिकत असतं, तेव्हा त्याच्या कटिंगचे पैसे बाप देत असतो! कमावत्या मुलाला बाप कशापायी दाढीचे पैसे देईल? तसंच आहे हे!!

सुभाषाजी : (वैतागून) काहीही भंकस उपमा देऊ नका! 

चंदुदादा : (सावरुन घेत) उपमा चुकली! पण भावना समजून घ्या!!

सुभाषाजी : (जमेल तितक्‍या कठोरपणे) आम्ही निम्म्या जागा घेणार म्हंजे घेणार! त्या घेतल्या नाहीत तर मला ‘मातोश्री’च्या अंगणात घेणार नाही कुणी!!

गिरीशभाऊ : (दिलासा देत) तुमच्या हायकमांडला आम्ही पटवतो हो बरोबर! ते माझ्याकडे लागलं! मी एक्‍सपर्ट आहे त्यात!! काय दादासाहेब?

चंदुदादा : (नापसंतीने) मीही एक्‍सपर्टच आहे की!!

सुभाषाजी : (सावधपणाने) मुळात आपण चर्चा करण्यात काही अर्थ नाही! चहा पिऊ थोडा थोडा आणि घरी जाऊ!

चंदुदादा : (चटकन) अहो, पण हे तुमचंच घर आहे! तुम्ही कुठे जाणार?

सुभाषाजी : (चिंतेत पडत) अरेच्चा, हो की!

गिरीशभाऊ : (इशारों इशारों में करत) अहो, हे आपलंच घर आहे, त्यांचं कुठं आहे? उगीच मघापास्नं ऐकतोय, तुमचं घर, तुमचं घर! आपली बैठक त्रयस्थ ठिकाणी घेण्याचंही ठरलं होतं ना?

चंदुदादा :  (उजेड पडत) अरेच्चा हो की! हे आपलंच घर आहे!!

सुभाषाजी : (गोंधळून) मी नेमका कुठं आलोय?

गिरीशभाऊ : (फायनल प्रपोजल देत) हे बघा, आम्ही १६०, तुम्ही ११० आणि इतर मित्रपक्षांना १८...विषय संपला!

चंदुदादा : (अनुमोदन देत) चोक्‍कस!

सुभाषाजी : (मान हलवत) बोलने में क्‍या जाता है? काय होणार हे आधीच आपलं ठरलंय! हो ना? चला तर मग...जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com