ढिंग टांग : मंत्रालयावर सूर्ययान

ब्रिटिश नंदी
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मंत्रालयावर सूर्ययान
स्थळ - मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक).
वेळ - गुड नाइट टाइम! प्रसंग - अत्यंत ऐतिहासिक
पात्रे - महाराष्ट्र हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि युवराज चि. विक्रमादित्य

मंत्रालयावर सूर्ययान
स्थळ - मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक).
वेळ - गुड नाइट टाइम! प्रसंग - अत्यंत ऐतिहासिक
पात्रे - महाराष्ट्र हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि युवराज चि. विक्रमादित्य
* * *
विक्रमादित्य - (वाघासारखी एण्ट्री घेत) व्हा ऽऽ ऊ!!!

उधोजीसाहेब - (प्राणांतिक दचकून) केवढा दचकलो मी!

बाप रे, बाप रे, बाप रे!! पाय अजून थरथरताहेत! असं घाबरवू नये रे एखाद्याला!

विक्रमादित्य - (फुशारकीने) नुसता वाघाचा आवाज काढला तर तुमची ही अवस्था! हाहा!!

उधोजीसाहेब - (खजील होत) मला वाटलं खराखुरा वाघ खोलीत शिरला, की काय!

विक्रमादित्य - मग, खराच वाघ आहे मी! परवा वरळीतली माझी डरकाळी तर याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात होती!

उधोजीसाहेब - (बुचकळ्यात पडत) वरळीत कुठे गेला होतास डरकाळी मारायला? दादरच्या पलीकडे जायचं टाळत जा, असं सांगितलं होतं मी तुला!

विक्रमादित्य - (हाताची घडी घालत निर्धाराने) वरळीतून मी निवडणूक लढवणार आहे! तसं मी जाहीरसुद्धा केलंय! आता माघार घेणे नाही!

उधोजीसाहेब - काय सांगतोस? केव्हा घडलं हे?

विक्रमादित्य - (मंद स्मित करत) परवा संध्याकाळी ! आठवतंय का? तुम्ही टीव्हीवर ‘होम मिनिस्टर’ बघत होता, तेव्हा मी म्हटलं, की ‘बाहेर चक्कर टाकून येऊ या का?’

उधोजीसाहेब - हो! मला कंटाळा आला होता..!

विक्रमादित्य - करेक्‍ट... मग मी आणि आई दोघेही बसने वरळीला गेलो! तिथं उमेदवारी जाहीर करून टाकली!

उधोजीसाहेब - (नापसंतीने) मला न विचारता?

विक्रमादित्य - (खांदे उडवत) आई होती ना पण!

उधोजीसाहेब - (नमते घेत) मग हरकत नाही!

विक्रमादित्य - आईला मी म्हटलं, मी तुफानी भाषण करतो, पण तू समोर बसू नकोस! काही सुचत नाही मग!

उधोजीसाहेब - (पुटपुटत) तेही खरंच म्हणा!

विक्रमादित्य - (स्टोरी सांगत) हा, मी असा जबरदस्त भाषण देत देत म्हणालो, की तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर मी वरळीतून आमदार होईन म्हणतो!!

आहे ना तुमची परमिशन? पब्लिक खुश! मला दोन-तीन तलवारी तिथल्या तिथे भेट म्हणून दिल्या! या तलवारींचं काय करायचं असतं बॅब्स?

उधोजीसाहेब - (गोंधळून) काय करायचं असतं म्हंजे? युद्ध करायचं असतं!

विक्रमादित्य - (दुर्लक्ष करत) आपले राऊतकाका म्हणाले, की ‘आमचं हे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नक्की लॅण्ड होणार! मी काय ड्रोन आहे का बॅब्स?

उधोजीसाहेब - (दुप्पट गोंधळून) कुणास ठाऊक!

विक्रमादित्य - तुम्ही हवे होता त्या कार्यक्रमाला! किती धम्माल आली माहितीयं! का नाही आलात?

उधोजीसाहेब - (पुटपुटत) उमेदवारीच्या एबी फॉर्मच्या गठ्ठ्याचं संरक्षण कोणी केलं असतं इथं? कोणाला तरी घरी थांबायला नको?

विक्रमादित्य - (अभिमानाने) आपल्या घराण्यातला निवडणूक लढवणारा मी पहिलाच असेन... हो ना?

उधोजीसाहेब - (पाठीवर थाप मारत) शाब्बास!

विक्रमादित्य - (आज्ञाधारकपणे) थॅंक्‍स बॅब्स!

उधोजीसाहेब - (अभिमानाने) तू तर माझ्याही पुढे गेलास! असाच मोठा हो! आपल्या घराण्यात निवडणुका लढवण्याची चाल नाही! तूच पहिला!! एक ना एक दिवस आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या उंच पाठीच्या खुर्चीत बसवीन, अशी माझी प्रतिज्ञाच होती!

विक्रमादित्य - (निरागसपणे) आपल्या पक्षाचा?

उधोजीसाहेब - (डोक्‍यावर टप्पल मारत) म्हणजे तूच! कळलं? जय महाराष्ट्र!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article Matoshree Heights