ढिंग टांग : आकडा!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 1 October 2019

दादू : (फोन फिरवत) ट्रिंग ट्रिंग..!
सदू : (कोरडेपणाने) बोल दादूराया!
दादू : (च्याट पडत) नुसत्या रिंगवरून ओळखतोस! कमालचै तुझी!!
सदू : (त्रयस्थपणे) उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचं काम सोडून शिळोप्याचे फोन का करतोयस?

दादू : (फोन फिरवत) ट्रिंग ट्रिंग..!

सदू : (कोरडेपणाने) बोल दादूराया!

दादू : (च्याट पडत) नुसत्या रिंगवरून ओळखतोस! कमालचै तुझी!!

सदू : (त्रयस्थपणे) उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचं काम सोडून शिळोप्याचे फोन का करतोयस?

दादू : का? तुला नाहीत वाटतं निवडणुकीची कामं?

सदू : (एक पॉज घेत) लौकरच कळेल!

दादू : (दर्पोक्‍तीयुक्‍त) आमची पहिली यादी बाहेर आलीसुद्धा!

सदू : (खवचटपणे) तुम्ही म्हणे तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्याची प्रतिज्ञा केली आहे? खरं आहे का?

दादू : (स्वाभिमानी बाण्याने) प्रतिज्ञा नव्हे, वचन दिलंय, वचन! एक ना एक दिवस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत आपला मावळा बसवून दाखवीन, असं वचन दिलंय!

सदू : (टोमणा मारत) कधी उगवणार तो दिवस?

दादू : (गोंधळून) ते अजून ठरवलेलं नाही! पण बसवीन एक दिवस!

सदू : (टोचून बोलत) वाट बघा, वाट!

दादू : (खवळून) सद्या, तोंड सांभाळून बोल! महाराष्ट्रातल्या किंगमेकरशी बोलतोयस तू!!

सदू : (विषय बदलत) झाली का तुमची युती?

दादू : ती आधीच झालीये! आमचं ठरलंय!!

सदू : (सदिच्छा व्यक्‍त करत) एकदाचं गंगेत घोडं न्हाऊ द्या, म्हंजे झालं!!

दादू : (खबर काढून घेत) तुम्ही म्हणे निवडणूक लढवणार नाही यंदा?

सदू : (कपाळाला आठी घालत) कोण म्हणतं असं?

दादू : (जीभ काढून) मतदारच म्हणतायेत!!

सदू : (संतापून) दादूराया, मोठा भाऊ आहेस म्हणून ऐकून घेतोय! दुसरं कोणी बोललं असतं तर दाखवला असता इंगा!! रणांगणापासून पळ काढणारे आम्ही नव्हंत! केवळ युद्ध जिंकायचं म्हणून शत्रूशीच हातमिळवणी करणारे फितूरही आम्ही नव्हंत! आमचं युद्ध दिल्लीतल्या मोगलांशी चालू आहे!!

दादू : (सुटकेचा निःश्‍वास सोडत) चला, म्हंजे आम्ही सुटलो!! 

सदू : (सात्त्विक संतापाने) तुम्हीही त्याच दिल्लीश्‍वरांचे पाईक! त्यांच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्रावर अन्याय करणारे तुम्हीही आमचे शत्रूच! रणांगणात बघा, तुमची काय हालत करतो ते!

दादू : (कुतूहलानं) यंदा आहे का तुमचा तो ‘लाव रे तो व्हिडिओ’चा कार्यक्रम?

सदू : (खुशालून) अलबत! यंदा तर मल्टिमीडिया शो आहे! बघशीलच तू!! भरपूर दारुगोळा जमा केलाय! एकेकाची अशी तंतरवणार आहे की ज्याचं नाव ते!! फुल्ल साऊण्ड सिस्टिम, सेवंटी एमेम स्क्रीन, म्युझिक... एकदम दणक्‍यात शो लावणार आहे! 

दादू : (भोळेपणाचा आव आणत) हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे की दिवाळी पहाटेचा?

सदू : (गंभीर होत) कळतात आम्हाला हे टोमणे!

दादू : (आणखी वर्मी घाव घालत) यंदा तरी स्वत:साठी करतोयस कार्यक्रम की आपला स्पॉन्सर्ड?

सदू : (चवताळून) खामोश!

दादू : (थोरल्या भावाच्या आवाजात) कशाला लष्करच्या भाकऱ्या भाजाव्यात आपण सदूराया? लोक हसतात!

सदू : (बेफिकिरीने) हसू देत! हसतील त्याचे दात दिसतील!! 

दादू : यंदा किती जागा लढवणार, ते सांग!

सदू : (गडबडून) ते अजून ठरायचंय!

दादू : (खवचटपणे) ठरायचंय? फू:!! 

सदू : (खर्जात) तुमचं ठरलंय म्हणता ना?

दादू : (फुशारकीने) एकदम फायनल ठरलंय म्हण!. 

सदू : (नेहले पे देहला देत) मग तुमच्या फायनल सीटा सांगा बरं! सांग ना... हलोऽऽ... हलोऽऽ... ठेवलास का फोन? हात्तिच्या!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article MNS