ढिंग टांग  : विभाजन!

ब्रिटिश नंदी
Thursday, 8 August 2019

बेटा : (घुश्‍शात एण्ट्री घेत) ढॅण टढॅण...ढॅण...ढॅण...ढॅण! मी आलोय!!

मम्मामॅडम : (कागद हातावेगळे करताना दचकून) ओह!...ही काय एण्ट्री झाली? केवढी दचकले मी!!

बेटा : (हाताची घडी घालून घुश्‍शात) हल्ली मी आवाज न करता कुठे गेलो, तरी लोक दचकतातच!

बेटा : (घुश्‍शात एण्ट्री घेत) ढॅण टढॅण...ढॅण...ढॅण...ढॅण! मी आलोय!!

मम्मामॅडम : (कागद हातावेगळे करताना दचकून) ओह!...ही काय एण्ट्री झाली? केवढी दचकले मी!!

बेटा : (हाताची घडी घालून घुश्‍शात) हल्ली मी आवाज न करता कुठे गेलो, तरी लोक दचकतातच!

मम्मामॅडम : (चष्मा उतरवून पुसत) हल्ली तुझा मूड नसतो चांगला! काय झालंय इतकं? (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)

बेटा : (कपाळाला आठ्या घालून) छे, हसतोय की छान! हे बघ..हाहाहाहा!! हॅपी?

मम्मामॅडम : (गंभीरपणे) राजकारणात अशी डोक्‍यात राख घालून चालत नाही, बेटा!

बेटा : (उदास होत) पृथ्वीवरल्या स्वर्गाचे असे तुकडे तुकडे होत असताना मी हसू?(भाषणाच्या पवित्र्यात) देखो भय्या, किसीको जेल में डालकर या कर्फ्यू लगाकर कुछ नहीं हो सकता! आखिर देश प्लॉटसे नहीं लोगोंसे बनता है..!

मम्मामॅडम : (कौतुकानं) छान आहे वाक्‍य! गुड!!

बेटा : (विचारात पडत) ‘काश्‍मीरमधली जनता गरीबच राहिली, फक्‍त तीन परिवार मालामाल झाले,’ असं काल सगळे म्हणत होते! कोणते ते तीन परिवार?

मम्मामॅडम : तुला भूक लागली आहे का? 

बेटा : (हट्‌टाने) नोप! काश्‍मीरबद्दल बोल!!

मम्मामॅडम : (हताशेनं)...तो विषयसुद्धा काढू नकोस! माझ्यादृष्टीनं ते सारं काही संपलं आहे!!

बेटा : (अद्वातद्वा बोलत) आपल्या लोकांनीसुद्धा त्या कमळवाल्यांच्या कारस्थानाला पाठिंबा द्यावा? तीनशेसत्तर कलम काढण्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, पण त्यांनी काश्‍मीरचं विभाजन केलं!! वहां विभाजन हुआ, यहां मेरा दिल टुकडे टुकडे हुआ!!

मम्मामॅडम : (मूक संतप्तपणे) तुझं हे नेहमी असंच असतं! बोलायचं तेव्हा बोलत नाहीस!!

बेटा : (रागारागाने) बोललो नाही तरी असं बोलता आणि बोललो तर म्हणता का बोललास!! मी करायचं तरी काय? (अचानक आठवल्यागत) मम्मा, मला एक सांग...काश्‍मीर प्रॉब्लेम आपला अंतर्गत आहे की आंतरराष्ट्रीय?

मम्मामॅडम : हळू बोल! अर्थातच अंतर्गत आहे!

बेटा : (संभ्रमात) पण आपले अधीरबाबू चौधुरी काही वेगळं बोलत होते!

मम्मामॅडम : (घाईघाईने) त्याबद्दल मी त्यांना बरीच तंबी दिली आहे! पण जाऊ दे ते! 

बेटा : (दुर्लक्ष करत) आपल्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी मला सांगितलं की विधेयकाला एकदाचा पाठिंबा देऊन टाकू! काश्‍मीरमध्ये आणखी काय व्हायचं राहिलंय? पण मी ऐकलं नाही!! 

मम्मामॅडम : तसं आपल्या पार्टीत हल्ली अनेकांना वाटतं! तू पक्षाच्या कार्यालयात जाणं सोडल्यापासून आपले लोक कसेही वागू लागले आहेत! काहीतरी कर बेटा!

बेटा : (खांदे उडवत) मी ऑलरेडी सांगून टाकलंय, आपण आता खेळत नाही, आपली टाइमप्लीज आहे!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) डोंबलाची तुझी टाइमप्लीज!! ही काय टाइमप्लीजची वेळ आहे? आणि हा खेळ का आहे? आख्खा देश तुझ्याकडे अपेक्षेने बघतोय आणि-

बेटा : (चुकीची दुरुस्ती करत) बघत होता...होता!

मम्मामॅडम : (भविष्याकडे बघत) पुन्हा एकदा उभारी घे आणि कामाला लाग! हा पक्ष सांभाळला पाहिजे! काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देश सांभाळला पाहिजे! आणि हे काम तुलाच करावं लागेल बेटा! तुझी इच्छा असो वा नसो! विभाजनाच्या वेळी आपण बंधुभावाचा फेविकॉल घेऊन उभं राहायला हवं! रात्र वैऱ्याची आहे, बेटा...जागा हो!!

बेटा : (चेहरा उजळून) तुझ्याकडे आहे फेविकॉल? आपल्या पक्षातली फूट तरी टाळून बघू या! काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article on political