ढिंग टांग : पाठदुखी!

ढिंग टांग : पाठदुखी!

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत काळजीपोटी पत्र लिहीत आहे. तुमची पाठ धरली असल्याचे नुकतेच कळले. पाठदुखीचा त्रास किती वाईट असतो, हे मला ठाऊक आहे. मागल्या खेपेला माझी पाठ अशीच धरल्यामुळे जेरीला आलो होतो. तेव्हा काही उपाय करून पाहिले होते, ते तुम्हालाही सुचवावेत, म्हणून हा पत्रप्रपंच! हे पत्र घेऊन येणाऱ्या गृहस्थासोबत एक महानारायण तेलाची बाटली पाठवत आहे. त्याचा चांगला परिणाम होतो, असा अनुभव आहे. येणारा गृहस्थ आमच्या संकटमोचक टीमपैकी आहे. (कृपा करून नाव विचारू नका!) सदर गृहस्थ पायाळू असावा!! पायाळू माणसाने दुखऱ्या पाठीवर पाय फिरवला की पाठ सुटते, असे म्हणतात. प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? असो.

आपलं सगळं ठरलंय हे माहीत असूनसुद्धा तुम्ही २८८ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत बसल्यामुळे हे असे झाले. शनिवारी मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुम्हीच असे म्हणालात. पण साहेब, एकदा युती करायची असे ठरले म्हंजे ठरले!! हो की नाही? त्यात हयगय होता उपयोगाची नाही. बरे, समसमान वाटप करायची तुमचीच कल्पना होती. म्हंजे तुम्ही (खरे तर) १४४ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असत्या तर फारतर मान अवटळली असती किंवा अर्धशिशीचा थोडका त्रास झाला असता. (आम्लपित्तही उठले असते. असो!!)  पण तुम्ही टोटल २८८ इच्छुकांना भेटल्यामुळे मान-पाठ एक झाली व हे असे झाले, असा माझा कयास आहे. वास्तविक तुम्ही १४४ इच्छुकांना भेटण्याचीही गरज नाही. किंबहुना, तुमचे काम कमीत कमी करावे, अशी आमची योजना होती. (लक्षात आले ना?) फक्‍त शंभर-सव्वाशे मुलाखती घेतल्या की काम भागले असते. पण तुम्ही आमचे काही ऐक्‍कतच नाही त्याला काय करणार? 

हजार-बाराशे इच्छुक. त्यापैकी प्रत्येकाला किमान दहा मिनिटे भेटायचे. म्हंजे बारा हजार मिनिटे झाली. बारा हजार मिनिटे!! म्हंजे आठ पूर्णाक तेहेत्तीस दिवस!! एवढा वेळ खुर्चीत बसून राहायचे म्हंजे पाठीचा बुकणा निघाला असणार!! काळजी घ्या!! बाकी एक-दोन दिवसात भेटूच. कळावे. आपला. नानासाहेब फ.

* * *
नानासाहेब-
जय महाराष्ट्र. आमची पाठ धरली असे आम्ही जाहीर भाषणात म्हणालो. ते तुम्हाला उद्देशून होते. तुम्ही लोक पाठ सोडायला तयार नाही, त्यावर माझी ती शाब्दिक कोटी होती. ती तुम्हाला न समजल्याने माझा बाण फुकट गेला. 

गेल्या चार-आठ दिवसांत हजार-बाराशे इच्छुकांना भेटल्यामुळे पाठीत उसण भरली, हे मात्र खरे आहे. डॉक्‍टरांनी ‘खुर्चीत बसून मुलाखती बंद करा’ असा वैद्यकीय सल्ला दिल्यामुळे सध्या उभ्या उभ्याच इच्छुकांना भेटतो आहे. (भाषण मी नेहमी उभ्यानेच करतो. असो.) आम्ही सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती का घेतल्या? असा सवाल तुम्ही करता. ते आमचे दबावतंत्र होते. तुमच्या शब्दावर विसंबून १४४ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असत्या, तर तुम्ही केव्हाच आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या.  तेलाची बाटली घेऊन आलेला तुमचा माणूस बराच वेळ थांबला होता. पण मी त्याला मुळी पाठच दाखवली नाही. हाताची घडी घालून समोरा ताठ उभा राहिलो. शेवटी कंटाळून त्याचेच पाय दुखले. जाताना ‘तेलाची बाटली नेऊ का? स्वत:चेच पाय चोळीन म्हणतो!’ असे सांगून तो संकटमोचक निघून गेला. बाकी भेटीअंती काय ते होईलच. उधोजी. 

ता. क. : आपलं ठरलंय!...ठरलंय ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com