ढिंग टांग! : ठग्ज, गॅंग्ज...आणि सोशल मीडिया! 

 ढिंग टांग! : ठग्ज, गॅंग्ज...आणि सोशल मीडिया! 

गोष्टीत असते तसे एक आटपाटनगर होते. तेथील जनता गोष्टीतल्या प्रमाणेच रंजलेली आणि गांजलेली होती. त्यांचा सारा दिवस सोशल मीडियावर जात असे. तेथे (पक्षी : आटपाटनगरात...सोशल मीडियावर नव्हे!!) दोघा ठकसेनांनी धुमाकूळ घातला होता. आम्ही त्या ठकसेनांचे नाव सांगणार नाही, कां की ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघेही खूप लोकप्रिय असे ठकसेन होते. ते लोकांना ठकवतात, हे माहीत असूनही जनलोक त्यांजवर अलोट प्रेम करीत. किंबहुना, त्यांनी ठकविले की लोकांना आनंदच होत असे. त्यांनी न ठकविता सरळसोट व्यवहार केला की जनता खट्टू होई. म्हणे काय हे? थोडेसे ठकवायला काय जाते ह्यांचे? रयतेने सोशल मीडियावर ठकसेनांचे खूप कौतुक केले. 

...कालांतराने लोकांना ठकवणे हे पुण्यकर्म आहे असे त्या ठकसेनांना वाटू लागले. दिवसा गोरगरिबांमध्ये मिसळून त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे आणि रात्र पडली की वेशांतर करून बाहेर पडायचे, असा त्यांचा व्यवसाय होता. अर्थात दिवसाही ते थोडीफार ठगगिरी करत असत. उदाहरणार्थ, गोड बोलून, बाता मारून त्यांच्या खिश्‍यातील उरलासुरला पैकाही लंपास करण्यात त्यांची हातोटी होती. असे सारे काही छान चालले होते. आणि एक दिवस...

फ्लॅश बॅक : आटपाटनगराच्या वेशीजवळ वासेपुर नावाचे एक गाव होते. तेच...तेच सिनेमामधले. आता तुम्ही म्हणाल, वासेपुर हे गावाचे नाव कसे? तर हे गाव वेशीवर होते, हे आम्ही आधी सांगितलेच. स्वच्छता अभियानाच्या आधी वेशीवरील भूभागाला वासेपुर नाव पडणे साहजिकच नाही का? पण ते असो...तर तिथल्या वासेपुरच्या गॅंगने पुन्हा एकवार डोके वर काढले. "गॅंग्ज ऑफ वासेपुर' ह्या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या भयंकर होत्या. एकेकाळी ह्या गॅंगने आटपाटनगरावर राज्य केले होते. धरणे बांधू, कॉलेजे बांधू, साखर कारखाने काढू, सूतगिरण्या काढू अशी कितीतरी प्रलोभने दाखवून गॅंग्ज ऑफ वासेपुरने गोरगरीब रयतेला त्राहि माम करून सोडले. कधी एकदा ही ब्याद जाते, असे नगरवासीयांना झाले होते. नगरवासी नवस बोलू लागले. गंडेदोरे करू लागले. काहीही करा, पण ह्या गॅंगच्या तावडीतून आटपाटनगराचा गळा सोडवा, असे साकडे रयतेने सोशल मीडियाला घातले. आणि चमत्कार की हो झाला! गॅंग्ज ऑफ वासेपुरची वाट लागली. ज्यांनी भर रस्त्यात दिवसाढवळ्या जुलूम केला, ते गॅंगचे मेंबर नाक्‍यावर उधारी मागत फिरताना दिसू लागले. कुठे काही काम भेटते का? ह्याची चौकशी करू लागले. पण चहाने तोंड पोळलेला माणूस तीन दिवस आवळा सुपारीदेखील खाऊ शकत नाही, ह्या सुप्रसिद्ध उक्‍तीनुसार आटपाटनगराच्या लोकांनी त्यांना उभे केले नाही. सोशल मीडियाच्या उग्र शक्‍तीमुळे गॅंग्जचे दिवस फिरले, आणि ठकसेनांच्या टोळक्‍याने जम बसवायला सुरवात केली. (फ्लॅशबॅक समाप्त) 

..आणि एक दिवस "ठग्ज ऑफ महाराष्ट्र'ने आटपाटनगराची वाट लावल्याची बोलवा उठली. जिथे तिथे पोस्टरे लागली. "ठग्ज ऑफ महाराष्ट्र! शेतकऱ्यांशी ठगबाजी, शिक्षणक्षेत्रातील ठगबाजी, आरक्षणातील ठगबाजी...' यंव आणि त्यंव! साहजिकच गोरगरीब रयत हैराण झाली. कां की हे सारे सोशल मीडियावरच घडत होते. वासेपुर गॅंगची मेंबरे नाक्‍या-नाक्‍यावर पोहोचून ठकसेनांच्या विरोधातले मेसेज जाहीर वाचून दाखवत होते. नगरवासीयांनी बुचकळ्यात पडून एकमेकांना सोशल मीडियावरच विचारले : ""हे खरे आहे का?'' उत्तराऐवजी एक स्मायली तेवढी मिळाली!! 

...शेवटी येत्या इलेक्‍शनमध्ये ठग कोण आणि गॅंग कोण, हे ठरवू, असे म्हणून आटपाटनगराच्या रयतेने पुनश्‍च व्हॉट्‌सऍप आणि ट्विटरमध्ये लक्ष घातले. -ब्रिटिश नंदी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com