esakal | ढिंग टांग! : भवितव्य! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग! : भवितव्य! 

स्थळ : 10, जनपथ, न्यू डेल्ही. 
वेळ : ओढवलेली. 
प्रसंग : बिकट. 
पात्रे : जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले! 

ढिंग टांग! : भवितव्य! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

(साक्षात महामॅडम चिंतामग्न अवस्थेत खुर्चीत बसून आहेत. अस्वस्थपणे अधूनमधून सुस्कारा सोडत आहेत. बाजूच्या खुर्चीत नवभारताचे आशास्थान ऊर्फ चि. बेटा बसलेले आहेत, आणि त्यांच्या पुढ्यात थोर अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनजी...तिघांपुढे गहन प्रश्‍न पडला आहे,- या देशाचे कसे होणार?) 

बेटा : (हात उडवून) मम्मा, डोण्ट वरी! तू उगीच चिंता करतेस! सगळं ठीक होईल...मी आहे ना? मैं हूं ना? 

ॅमहामॅडम : (डोळे मिटून) हो रे...पण- 

बेटा : (मान हालवत) पण नाही नि बिण नाही! माणसानं कसं आशावादी असलं पाहिजे असं तूच सांगायचीस ना? 

ॅमहामॅडम : (खुलासा करत) अरे, ते निवडणुकीपूर्वी! त्याचं आता काय? मनमोहन अंकलना विचार- त्यांना चित्र आशादायक दिसतंय का? सांगा हो! 

डॉ. मनमोहनजी : (आशादायकपणे) हं! 

ॅमहामॅडम : (चिंतित अवस्थेत) ओह गॉड! 

बेटा : (मोबाइल फोनशी चाळा करत) इतका कसला विचार करतेयस मम्मा? 

ॅमहामॅडम : (डोके चोळत) कशाचा म्हंजे, देशाचा! 

बेटा : (मोबाइलमध्ये डोकं घालत) मीसुध्दा बराच वेळ करतो विचार! इन फॅक्‍ट, माझ्याइतका कुणीच देशाचा विचार केलेला नाही!! 

ॅमहामॅडम : (डोकं बोटांनी चेपत) कसं होणार या देशाचं? मला तर बाई भारी काळजी वाटते! लोकांच्या नोकऱ्या जातायत, महागाई वाढतेय! कारखाने बंद पडतायत! रुपया घसरतोय! अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे! लोकांकडे पैसा उरलेला नाही! कसं होणार? 

बेटा : (हळू हळू फोनमध्ये दंग होत) आज मी पीएम असतो, तर ही वेळ आली नसती! 

ॅमहामॅडम : (दुर्लक्ष करत) डॉ. मनमोहनजी, तुम्हीच सांगा, कसा मार्ग काढायचा यातून? आहे का काही उपाय? 

: (विस्तृतपणे विवेचन करत) हं! 
ॅमहामॅडम : (काळजीच्या सुरात) मंदीच्या फेऱ्यानं देशाची अर्थव्यवस्था बुडते आहे! असंच चालू राहिलं तर येत्या काही काळात वाटोळं होईल सगळ्याचं! अपात्र लोकांच्या हातात सत्ता गेली की असं होणारच! तुमचं काय मत डॉ. मनमोहनजी? 

डॉ. मनमोहनजी : (मंदीची कारणं विशद करत) हं! 

बेटा : (मोबाइलमधलं डोकं वर न काढता) मला माहीत आहेत मंदीची कारणं! हे सगळं त्या चोर लोकांमुळे झालंय...हो ना मनमोहन अंकल? 

डॉ. मनमोहनजी : (जोरदार समर्थन करत) हं! 

ॅमहामॅडम : (संयमाने) शांत डोक्‍यानं यातून मार्ग काढायला हवा! यावर राजकारण करून चालणार नाही! मला वाटतं, डॉक्‍टरसाहब, तुम्ही आपल्या परिस्थितीचं नीट विश्‍लेषण करणारा व्हिडिओ मेसेज तयार करून व्हायरल करावा! देशातल्या जनतेला सत्य काय आहे ते कळलं पाहिजे! 

बेटा : (सात्त्विक संतापाने) कमॉन! त्याची काय गरज आहे! गेली चार वर्ष मी हेच बोलतोय ना? देशाची वाट लागलीये, अर्थव्यवस्था बुडते आहे! नोकऱ्या जाताहेत, महागाई वाढते आहे! हे सरकार लूट करतंय...हेच नाही का बोललो मी? पुन्हा नवा व्हिडिओ मेसेज कशाला? 

ॅमहामॅडम : (कोरडेपणाने) तू बोलणं वेगळं आणि डॉक्‍टरसाहेबांनी म्हटलेलं वेगळं! ते अर्थतज्ज्ञ आहेत!  (आदेश सोडत) डॉक्‍टरसाहेब, तुम्ही लागा कामाला! मोदी-शहा जोडीनेच देशावर ही भयंकर वेळ आणल्याचं परखडपणे सांगा तुमच्या संदेशात! ओके? 

डॉ. मनमोहनजी : (अतिशय उत्साहात) हं! 

बेटा : (विचारात पडत) मम्मा, मला एक सांग...ही भयंकर वेळ आपल्या देशावर आली आहे की पक्षावर? 

ब्रिटिश नंदी 
 

loading image
go to top