ढिंग टांग! : गुरुशिष्यामृत! 

ब्रिटिश नंदी 
Wednesday, 17 July 2019

आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके 1941 आषाढ गुरुपौर्णिमा. 
आजचा वार : मंगळवार... एकप्रकारे गुरुवारच. 
आजचा सुविचार : गुरौरंघ्रीपद्‌मे मनश्‍चेन लग्नं तत: किम तत: किम तत: किम तत: किम! 

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे आहे. पण आज सहस्र पुरा करावा.) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लौकर उठलो. गुरुंच्या तसबिरीसमोर जाऊन उभा राहिलो. हात जोडले. डोळे मिटले. तेवढ्यात आठवले की फुलपुडीवाल्याने फुलपुडी टाकलेली नाही. मिटल्या डोळ्यांनीच ओरडलो : ""फुले कुठायत?'' त्यावर मागल्या बाजूने पीएचा आवाज आला, ""कोण फुले?'' मिटलेले डोळे वटारून मी दातओठ खाल्ले. काही बोललो नाही. 

प्रत्येकाला किमान एक गुरू असतोच हे सत्य आहे. तसे राजकारणात आम्ही कोणालाही सोयीप्रमाणे गुरू करतो किंवा शिष्य म्हणून आपलेसे करतो. लहान भाऊ, मोठा भाऊ ही नाती आहेतच. दत्त महाराजांनी सत्तावीस (की एकवीस?) गुरू केले, असे म्हणतात. राजकारणातही बरेच गुरू करावे लागतात. असे असले तरी आम्हा कमळवाल्यांचे गुरू एक...फार फार तर दोन! आमच्या घरी गुरुद्वयांच्या दोन तसबिरी नाहीत. एकाच तसबिरीत दोन्ही गुरू आशीर्वादाच्या पोझमध्ये बंदिस्त आहेत. (दोघांना मिळून एक हार घालता येतो...त्यांनाही ते आवडते!! असो.) आपल्या गुरूंचे गुरू कोण असतील? असे मात्र कधी कधी मला कोडे पडते. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरे तर गुरुगृही जाऊन गुरुचरणी लीन व्हावे व गुरूंस गुरुदक्षिणा द्यावी, अशी गुरुप्रथा आहे. गेले काही दिवस गुरूंची भेट झाली नाही. मन बेचैन झाले आहे. गुरुचरणांविना कुठे मनच लागत नाही असे का? तत: किम? ह्या प्रश्‍नाला उत्तर नाही. माझे गुरू परदेशी असतात. अधूनमधून दिल्लीला असतात. त्यांचे चरण शोधत हिंडलो तर जगप्रदक्षिणाही होईल. म्हणून मी घरीच गुरूंच्या तसबिरीला नमस्कार करतो. हार घालतो. प्रसाद म्हणून पाव किलो पेढे आणून ते सेवन करतो. माझा नमस्कार त्यांना पोचत असेल का? असेल. त्याशिवाय का मी इथे उभा आहे? 

पेढा तोंडात टाकून आधी दोन्ही गुरूंना मोबाइलवरून संदेश पाठवला. "गुरुबिन कौन बतावें वाट?' हे गाणे स्वत:शीच गुणगुणत असताना आमचे संकटमोचक मंत्री गिरीशभाऊ येऊन उभे राहिले. हातात कमळाचे फूल देऊन म्हणाले, ""गुरु देवो भव...तुम्हीच आमचे गुरु!'' त्यांना एक पेढा दिला. थोड्या वेळाने आमचे कोल्हापूरचे चंदूदादा आले. ते काहीच बोलले नाहीत. फक्‍त चष्मा पुसत बसून राहिले. शेवटी थोडी वाट पाहून त्यांनाही पेढा दिला. त्यांनी तो घेतला आणि खिशात टाकला. नंतर (दुसऱ्या) खिशातून आणखी एक कंदी पेढा काढून माझ्या हातात दिला. म्हणाले, ""घ्या! आज गुरुपौर्णिमा आहे, प्रसाद घ्या!'' मी तो पेढा निमूटपणाने खाल्ला. गुरुद्‌वयाच्या तसबिरींसमोर वांकून त्यांनी नमस्कार केला. 

"मातोश्री'वर पेढे पाठवले का?'' नमस्कार करता करता त्यांनी धोरणीपणाने आठवण केली. अरेच्चा! ते मी विसरलोच होतो. 

""त्यांच्याकडे पाठवायचे, की त्यांच्याकडून घ्यायचे?'' मी विचारले. हा एक यक्षप्रश्‍न होता. आमच्या दोघांमध्ये कोण गुरू? कोण शिष्य? ह्याचे उत्तर कोण देणार? 

""त्यांनाच विचारा!'' एवढी पुडी सोडून कोल्हापूरकरदादा निघून गेले. मी मात्र चक्रावून गेलो. 

..."मातोश्री'वर एक पेढ्याचा पुडा पाठवून दिला आहे. सोबत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि शुभेच्छापत्रावर ठळक अक्षरात लिहिले आहे की, ""गुरुदेव, आपलं ठरलंय...लक्षात आहे ना?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang Article in sakal on Gouripaurnima