esakal | ढिंग टांग : नवसपत्रे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : नवसपत्रे!

आमचें येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश हे नवसास पावणारे दैवत म्हणून सातासमुद्रापार ख्यात पावलेले आहे. या पेटीतील पत्रे वांचून श्रीगणेश पुढील कार्यवाही करून संबंधित भक्‍ताची इच्छा, स्वप्न, आकांक्षा आदी गोष्टींची पूर्तता करतात असे म्हटले जाते.

ढिंग टांग : नवसपत्रे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आमचें येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश हे नवसास पावणारे दैवत म्हणून सातासमुद्रापार ख्यात पावलेले आहे. या पेटीतील पत्रे वांचून श्रीगणेश पुढील कार्यवाही करून संबंधित भक्‍ताची इच्छा, स्वप्न, आकांक्षा आदी गोष्टींची पूर्तता करतात असे म्हटले जाते. (त्याची प्रचीती खुद्द प्रस्तुत लेखकासदेखील आलेली आहे.) सदरील श्रीगणेशाच्या दर्शनासाठी देशोदेशीचे व्हीआयपी (वेगळ्या रांगेने) येत असतात व ‘त्या’ पेटीत आपापली नवसपत्रे टाकतात. त्यातील काही गोपनीय पत्रे आमच्या हाती लागली आहेत. मजकुराखाली स्वाक्षरी नाही. (मजकुरावरून देव सारे ओळखतो. नाव कशाला हवे? असो.) त्यातील काही पत्रांचा अंश येथे देत आहो.

प्राणप्रिय श्रीगजानना, पत्र आधीच घरून लिहून आणले होते. मंडळ कार्यकर्त्यांची नजर चुकवून अखेर पेटीत टाकले. राज्यावरील महापुराचे संकट टळो, अर्थव्यवस्था रुळावर येवो, अशा छापाच्या मागण्या मी टीव्ही क्‍यामेऱ्यांसमोर केल्या होत्या. त्या डिमांड क्‍यान्सल समजाव्यात. नव्या मागण्यांचे हे पत्र नव्याने पुटप करीत आहे, त्याचा विचार व्हावा ही प्रार्थना.

१. मुख्यमंत्री मीच होणार असे काहीतरी करावे. २. आमची महायुती (खरोखर) होणार असेल तर त्याचे श्रेय मला मिळावे. ३. होणार नसेल तर खापर मात्र माझ्यावर फुटू नये. (खुलासा : क्रमांक दोन व तीनच्या मागण्या पोलिटिकली भिन्न आहेत म्हणून वेगळ्या लिहिल्या आहेत. जमेल तसे करावे.) ४. या निवडणुकीत कांग्रेसचे उरलेसुरले वस्त्रहरण होवो व ते माझ्या हस्तेच घडो ही प्रार्थना.

* * *
विघ्नहर्त्या, माझ्याआधी पत्र टाकून गेलेल्या इसमाचे पत्र तत्काळ फाडून टाकावे. (पिवळ्या सरकारी कागदावरला मजकूर असेल.) त्याची एकही मागणी मान्य करू नये. त्याला मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. परंतु त्यास मुख्यमंत्री न करता माझा होनहार सुपुत्र त्या खुर्चीवर बसावा, अशी इच्छा आहे. ती सुफळ संपूर्ण झाल्यास मी स्वत: पुढल्या वर्षी येऊन तुजचरणी २१ नारळ वाहीन व स्वत:च्या हाताने केलेले (उकडीचे) मोदक प्रसाद म्हणून अर्पण करीन. कळावे. 

ता. क : माझा ॲड्रेस वांदऱ्याचाच आहे. बदललेला नाही, याची नोंद घेणे.
* * *
बाप्पा मोरया... लई दिसांनी तुमच्या दारी आलो देवा! सध्या खूप संकटात आहे. म्हंजे संकट आलेले नाही, पण अंगावर (किंवा अंगलट) येण्याची शक्‍यता आहे. तेव्हा ईडी आणि इनकम ट्याक्‍सच्या इमारतीतील झाडाच्या शोभेच्या कुंड्यांमध्ये (मी पाहून ठेवलेल्या आहेत, म्हणून सांगतोय!) पाणी साचून तेथे डेंगू मच्छरांची उत्पत्ती व्हावी, असे काही तरी करावे, ही प्रार्थना. 

हल्ली रात्र रात्र झोप लागत नाही. फोन वाजला की दचकायला होते. कसेही करून या भानगडीतून सोडवा, देवा! तसे झाले तर दरवर्षी तुमच्या दर्शनाला येईन! आणि (पुढला मजकूर खोडलेला आहे...) तुमचाच. अबक.

* * *
श्री विश्‍वविनायक बाप्पा, तुझ्या चरणी माझे (तीनच) प्रणाम. हल्ली लक्ष किंवा कोटी असले शब्द लिहायलाही भीती वाटते. वाढदिवसाच्या दिवशी होर्डिंगवरही कोटी-लाखाचे आंकडे लिहू नका, असे मी कार्यकर्त्यांना मागेच कळवून टाकले आहे. एका घोटाळ्यात माझे नाव असून मला क्‍लीन चिट मिळावी, ही प्रार्थना. अनेक पक्ष सहकारी सध्या ‘अंदर’ जात असून आपला नंबर कधी लागेल, याचा काही नेम नाही. सदैव आपलाच. एबीसी.

* * * 
प्रिय बाप्पा, नवसपत्रांच्या पेटीची चावी मला मिळो आणि व्हीआयपी पुढाऱ्यांची पत्रे मला वाचायला मिळोत! कळावे. (एकमेव खरी सही करणारा) तुझाच.

loading image
go to top