ढिंग टांग : जगज्जेत्याची स्वप्नभूमी!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 25 September 2019

सप्तसागर, सप्तखंड ओलांडून
झेलम आणि चिनाबच्या तीरावर
राहुटी ठोकून बसलेला
मॅसेडॉनचा महायोद्धा,
वृद्ध झालेल्या आपल्या
अजेय अश्‍वाच्या पाठीवर
दणकट थाप मारत म्हणाला :
‘‘मित्रा ब्युसेफालस, वसुंधरेला
गवसणी घालण्याचं स्वप्न
आता जवळ जवळ पूर्ण झालं!

सप्तसागर, सप्तखंड ओलांडून
झेलम आणि चिनाबच्या तीरावर
राहुटी ठोकून बसलेला
मॅसेडॉनचा महायोद्धा,
वृद्ध झालेल्या आपल्या
अजेय अश्‍वाच्या पाठीवर
दणकट थाप मारत म्हणाला :
‘‘मित्रा ब्युसेफालस, वसुंधरेला
गवसणी घालण्याचं स्वप्न
आता जवळ जवळ पूर्ण झालं!

जग जिंकत जिंकत इथवर
येताना काय नाही पाहिलं?
अंभीराजाची लोचट हाव,
पौरसाचा अजिंक्‍यभाव,
अश्‍वायनाचे तिखट वार,
आश्‍वकायनाचा सुवर्णभार,
सारे काही पोतडीत बांधून
पुढे कूच करायचे आहे.
...तू तयार आहेस ना?’’

 जागच्या जागीच मंद टपटप 
करत ब्युसेफालस म्हणाला :
महान अलेक्‍झांडर, तुझ्या
विजयाला नाहीत सरहद्दी,
आणि माझ्या टापांना नाही उसंत!
जेथे माझी टाप पडते, ती भूमी
माझ्या पाठीवरल्या खोगीराच्या
कप्प्यात सामावते आहे.
तुझ्या कर्तृत्वाला मात्र
सरहद्दींचा अटकाव नाही,
हे जगज्जेत्या अलेक्‍झांडरा!
तुझ्या युद्धतेजापुढे सरहद्दी
संपल्या, धुळीत मिसळल्या. 
उलथली अनेक सिंहासने,
माझ्या हरेक टापेगणिक,
हे राजन! अगणित संपत्ती,
आणि अमर्याद भूमीचा धनी
आहेस तू...तुझा विजय असो!’’

समोर वाहणाऱ्या झेलमच्या
निवळशंख खळाळाकडे
समाधानाने पाहात 
मॅसेडॉनचा महायोद्धा
म्हणाला : हे अश्‍वश्रेष्ठा,
तुझ्याविना जग जिंकणं
केवळ अशक्‍य होतं.
तुझ्या पाठीवरच माझं
रूपांतर झालं आहे,
सर्वांत यशस्वी, सर्वात धनवंत 
आणि सर्वात बळिवंत सम्राटात.
आज मला खऱ्या अर्थाने 
जग जिंकल्यासारखे वाटते आहे.
बघ, मी जिंकलेले जग
किती किती सुंदर आहे!’’

अस्वस्थ टापांची हालचाल करत
ब्युसेफालस मान हलवत म्हणाला : 
‘‘हे चक्रवर्तिन राजा,
सप्तसागर आणि सप्तखंडांच्या
पल्याड राहिलेल्या तुझ्या प्रिय
मातृभूमीतील रयतेचा आक्रोश
तुला ऐकू येतो आहे का?
नसेल...कारण तू त्यापासून
बराच दूर निघून आला आहेस.
...तू जिंकल्यास फक्‍त सरहद्दी!
तुझ्या घरची खपाटीला गेलेली
पोटे तुझ्या सुंदर जगात
समाविष्ट नाहीत...
अजिबात नाहीत!’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article World champion