ढिंग टांग : आमचीही चांद्रमोहीम

ब्रिटिश नंदी
Tuesday, 16 July 2019

काही अपरिहार्य कारणास्तव चांद्रयान-२ ही भारतीय मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. सारे काही सुरळीत चालू असताना उलटी गिनती थांबवून यानाचे उड्डाण रोखण्यात आले. हा भारतीय अंतराळ विज्ञान मोहिमेला बसलेला एक चांद्रधक्‍का आहे, असे आम्ही समजतो. काही तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयानाचे उड्डाण लांबणीवर टाकण्यात आल्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांनी रात्री दोन वाजता जाहीर केले, तेव्हा आम्ही गाढ झोपेत होतो हे खरे; परंतु झोपेतल्या झोपेतही आम्हाला वाईट वाटले हेही खरेच. तथापि, शास्त्रज्ञ मंडळींनी काहीही काळजी करू नये, अल्पावधीतच आम्ही आमचे खाजगी यान चंद्राकडे धाडत आहो!!

तसे पाहू गेल्यास आमचा स्वभाव अंमळ चंद्रप्रधान आहे, हेदेखील कबूल करावे लागेल. आमच्या (उजव्या) तळहातावरील चंद्राचा उंचवटा चांगला दणकट असून अशी माणसे कविताबिविता करतात, असे म्हणतात. आम्हीही थोडेसे ‘त्यातले’ आहो!! तसेच खगोल आणि अंतराळविज्ञान ह्या विषयातही आम्ही लहानपणापासूनच पारंगत आहो. एक कुशाग्र बुद्धिमतेचा शास्त्रवेत्ता म्हणून आमची नामचीन मंडळात ऊठबस आहे. (ऊठच जास्त, बस कमी...असो.) चंद्रविज्ञान ही जी एक शास्त्रशाखा आहे, त्यात आम्ही एक्‍सपर्ट मानले जातो. हल्ली पौर्णिमेच्या सुमारास आम्हाला डोक्‍यात थोडेसे कलकलते आणि आम्ही थोडे अधिक खेळकर वागू लागतो हे खरे. पण हा चंद्राचा परिणाम सोडल्यास बाकी भावनिक भरती- ओहोटी फारशी होत नाही.

आमच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या ह्या अनोख्या पैलूमुळे चंद्रअभ्यासाला चांगली चालना मिळते. ‘चंद्राचा पृष्ठभाग : एक निरीक्षण’ हा ग्रंथ आम्ही लिहायला घेतला होता. परंतु, काही अपरिहार्य कारणाने तो बेत रहित करावा लागला. ते अपरिहार्य कारण म्हणजे आमच्याच पृष्ठभागाला निव्वळ गैरसमजातून विनाकारण सडकण्यात आले. ‘आंबटशोकी लेकाचा’ असा निरर्गल आरोप करुन आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. शेवटी आम्ही असले काही लिहिणार नाही, असे चंद्राच्या बापास लिहून दिल्यानंतर ते ग्रंथोड्डाण रद्द करण्यात आले. पण ते जाऊ दे.
ह्या चांद्रमोहिमेचे प्राय: तीन भाग पडतात.
चांद्रयान : हे एक रॉकेट टाइप प्रकरण असते. ते पृथ्वीवरुन उडून चंद्राकडे झेपावते.
विक्रम : हे यान चंद्राकडे गेल्यावर तेथील पृष्ठभूमीवर उतरते.  

प्रग्यान : ही एक प्रकारे अंतरिक्षातील आटोरिक्षा आहे. चंद्रावरील मातीचे नमुने, दगड आदी मुरुम गोळा करुन आणणे हे ह्याचे काम आहे. तसेच चंद्रावर आटोरिक्षा चालू शकेल, ह्याबद्दल शास्त्रज्ञांना खात्री आहेच. कारण पुण्या-मुंबईतील खड्डेयुक्‍त रस्त्यात आटोरिक्षा चालू शकत असेल, तर चांद्रभूमीवर अंतरिक्षा का चालणार नाही? असा शास्त्रवेत्त्यांचा (पक्षी : आमचा) युक्‍तिवाद ग्राह्य मानण्यात आला आहे. तसेच चंद्रावर मीटरचा मिनिमम रेट किती ठेवता येईल, ह्याचाही अभ्यास ही रिक्षा करेल.
...वरीलपैकी तिन्ही टप्प्यांमधील कुठल्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला, हे अद्याप इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलेले नाही. परंतु, आमच्यामते ह्यात काळजीचे काही कारण नाही. चांद्रयानात इंधन कमी होते की विक्रमच्या ब्याटरीचा प्रॉब्लेम झाला? प्रग्यान ह्या अंतरिक्षेचे पासिंग झाले होते का? आदी अनेक सवाल अद्यापही अनुत्तरित आहेत, पण ते आम्ही सोडवीत आहो!!
...येत्या ३१ जुलै रोजी आम्ही चंद्रावर मोहीम नेणार म्हणजे नेणारच. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आमचे उड्डाण होणारच. कां विचारता? अहो, त्या दिवशी गटारी अमावस्येचा पवित्र दिवस नाही का?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article write british nandi