अर्धाच अब्ब! (ढिंग टांग)

british nandy
मंगळवार, 12 जुलै 2016

"विस्तार होणार रे होणार...‘ असा हाकारा सत्तेच्या कुरणातून अनेक दिवसांपासून सुरू होता. मुहूर्त सांगितले जात होते, हिरव्या कंदिलात तेल घातल्याचे बोलले जात होते. काडी लावण्याचेच काय ते बाकी होते! तसे काड्या घालण्याचे उद्योग सुरू होतेच... ते वेगळे!

इसापकालीन "लांडगा आले रे आला...‘सारखेच! तेथे लांडगा येऊन मेंढ्यांचा फन्ना उडवून गेला; धावले कुणीच नाही. युतीकालीन विस्ताराचे मात्र तसे नाही. आठवड्यापासून धावपळ सुरू होती. स्वाभाविकच ते. कुरण म्हणजे चरणे आलेच! चरण्याची संधी मिळण्यासाठी शिंगे उगारावी, थोडेसे डुरकावे.

महाराष्ट्रदेशीची अडचण निराळी. पंगत मांडायची होतीच. वाढायचेही होते. फक्त ताट कोणाला आणि पाट कोणाला, यावरून धुसफुस सुरू. पंक्तिलाभ होणारच; पण कोण खाशा पंगतीला, कोण उपखाशा, कोणाला चांदीचे ताट नि चंदनाचा पाट, कोणाला नुसताच पाट नि कोणाला पत्रावळ, यावर खाशी खलबते सुरू होती.

पंगतीची खात्री असणाऱ्यांचा आग्रह विशिष्ट ताटा-पाटासाठी होता. धाकला बसणार की नेहमीप्रमाणे रुसणार, याचे तर्कवितर्क लढविले जात होते. धाकलाच तो. हट्ट करणारच. त्याला "चूल बंद‘ आवतण हवे होते. पंगतीचे नियोजन करणारे खमके. "दागिन्यांना जेवण‘ ही शुक्रवारची कहाणी, त्यांना तोंडपाठ. जिंकलेल्या जागांचे पुरेसे दागिने अंगा-खांद्यावर नसतील, तर मानाचे ताट-पाट मिळत नाही! करवीरनगरीत निरोप पोचविणाऱ्या दूताने इथे खलिताच धाडला. "याल तर जोडीने खाऊ, न याल तर तुमच्याविना भरपेट जेवू...‘

निर्वाणीच्या फर्मानामुळे धाकल्याच्या घरी गडबड. ही पंगत हुकली, तर पुढे उपाशीच राहावे लागण्याची भीती. त्यामुळे "आमच्यात ठरल्याप्रमाणेच घडत आहे. पंगतीत जेवण्यासाठी आम्ही लाचार नाहीत,‘ अशी मखलाशी करीत मिळतील तेवढ्या पाटांवर बसण्याचे ठरले.

अर्धाच विस्तार, दोनच पदं,
कॅबिनेटच्या तुपाची धार नाही
सत्ता नको गं बाई...
असे एकनाथी भारूड मुंबईतून नाही तरी ठाण्यातून कुणी गाईल, असे वाटले होते. तसे झाले नाही. ताटात पडलेले पोटभरीचे मानून मंडळी "वदनी कवळ‘ घेत बसली.

पंगतीत आडवा हात मारल्यानंतर अनामिक समाधान चेहऱ्यावरून निथळत असते. जिलेबीतून पाक निथळावा तसे. भोजनोत्तर तांबुलादीचे सेवन केल्यानंतर एक सहजक्रिया घडते. पोटावरून हात फिरविताना "अऽऽब्बऽऽ!‘ असे उद्‌गार निघतात. हा किंवा ही ढेकर म्हणजे तृप्तीची पावतीच. (डर्र) अशी ढेकर देणे (एकविसाव्या शतकात) असभ्य मानले जात असले, तरी पट्टीचा भोजनभाऊ ती दिल्याशिवाय राहत नाही. ती कानी पडल्याशिवाय पाकगृहातही समाधानाची "त्सुनामी‘ उसळत नाही.

तथापि (दीर्घ काळ प्रलंबित) पंगत आज आटोपल्यानंतर अशी पावती आल्याचे कानोकानीही नाही. धाकल्याच्या घरातून कोणी "डर्र‘ केले की नाही? डरकाळी तरी? बसवू की नको, वाढू की नको, तुपाची धार सोडू की नको... अशा "हॅम्लेटी‘ अवस्थेत अवघ्या दोघांना मुख्य पंगतीच्या काटकोनात बसवून खाऊ घातले. असा पंक्तिप्रपंच! पावती मिळेल कशी?

दोन वेळा "अब्ब‘ असे ऐकू आले खरे; पण ते अर्धवटच! दोघांनाच सोन्याऐवजी चांदीचे ताट दिल्याचा परिणाम का हा?
पंगत आटोपली. पुढची कधी बसेल, त्यात ताट मिळेल का, याची खात्री नाही; पण आम्हांस गरज नाही. आता आम्ही सत्तेत राहून विरोध करण्याच्या मूळ भूमिकेत परतत आहोत! अब्ब!! 

Web Title: dhing tang british nandy