भेट! (ढिंग टांग)

british nandy
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : रात्री दहाचा सुमार.
प्रसंग : खलबतं, खलबतं!
पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज, कडवट सेवक मिलिंदोजी फर्जंद...आणि श्रीमंत नाना फडणवीस.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : रात्री दहाचा सुमार.
प्रसंग : खलबतं, खलबतं!
पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज, कडवट सेवक मिलिंदोजी फर्जंद...आणि श्रीमंत नाना फडणवीस.

उधोजीराजे : (उतावळेपणाने) अरे, कोण आहे तिकडे? कुठे तोंड काळे केलेत?
मिलिंदोजी फर्जंद : (घाईघाईने आत येऊन मुजरा करत) मुजरा म्हाराज! श्रीमंतनाना आपली भेट घेन्यासाठी सदरेवर आल्यात! आपली भेट मागत्यात!
उधोजीराजे : (हात उडवत) ही काय भेटीची वेळ झाली? बारा वाजायला आले!!
मिलिंदोजी : (चाचरत) आपलं घड्याळ समोर गेलंया म्हाराज! आत्ता कुटं धा वाजत्यात!!
उधोजीराजे : (दुर्लक्ष करत)...आमची झोपण्याची वेळ झाली! उदईक या, म्हणावं!
मिलिंदोजी : (चुळबुळत) आर्जंट हाय मंत्यात!
उधोजीराजे : (डोकं खाजवत) ही एक पीडाच झाली आहे! दिवस गेला उटारेटी, आता रात्री कसल्या भेटीगाठी? माणसानं कसं सभ्य माणसासारखं दिवसाढवळ्या भेटावं! काय मनात असेल-नसेल ते बोलून टाकावं! रात्री चोरासारखं कशाला भेटायचं?
मिलिंदोजी : (दुजोरा देत) आजकाल चोर लोकांच्या मीटिंगा पन दिवसाच होत्यात म्हाराज! 
उधोजीराजे : (दाद देत) बाकी वाघाच्या गुहेत रात्री-अपरात्री शिरायलाही काळीज लागतं म्हणा! श्रीमंतनानांच्या हिमतीला दाद द्यायला हवी!!
मिलिंदोजी : (फुकटचा सल्ला देत) ऊं...घ्या, उभ्या उभ्या भेटून!! म्हनावं, रातच्याला वाघाच्या मागावर जाऊ नये! मच्यान बांधून मस मच्छर मारत बसावं!! सकाळ झाली, की पानवठ्यावर पडंलच गाठ...काय?
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) अं.अंअं...काय बरं बोलायचं असेल आमच्या पेशव्यांना? गेल्या काही दिवसांत आम्ही त्यांच्याबद्दल काही बरंवाईट बोललोदेखील नाही!!
मिलिंदोजी : (विचार करुन उत्तर देत) आपली म्यारेथॉन मुलाखत प्रशिद्ध होनार असल्याची खबर हाय!
उधोजीराजे : (काही न कळून) आमच्या म्यारेथॉन मुलाखतीनं असं काय होणाराय?
मिलिंदोजी : (मान डोलावत) वाघ शिकारीला निघाल्याची खबर सर्व्यात आधी माकडास्नी लागती नव्हं!! समद्या रानात बोंबाबोंब होतीये की!
उधोजीराजे : (येरझारा घालत) काहीतरी काम असल्याशिवाय श्रीमंतनाना आमच्या महाली अशा अपरात्री येणार नाहीत!! काय काम असेल बरं? मागल्या टायमाला कधी आले होते? 

मिलिंदोजी : (आठवून) दीड वर्षापूर्वीची गोस्ट आसंल! ते कल्याण-डोंबिवलीच्या जुझाच्या टायमाला-
उधोजीराजे : (हात वर करत) आलं लक्षात!!..साबुदाणेवडे खाऊन गेले होते!!
मिलिंदोजी : (मुजरा घालत) म्हाराजांच्या स्मरनशक्‍तीचा विजय असो! साबुदाना वडा...करेक्‍ट आठवन आहे!!
उधोजीराजे : (चार बोटे दाखवत) सात वडे खाल्ले होते!! आम्ही कसं विसरू? चार प्लेट केले होते, सात त्यांनी खाल्ले, एक आम्ही!!
मिलिंदोजी : (काहीतरी सुचून) मला वाटतं म्हाराज, त्यान्ला दुपारी जेवायलाच बलवा!! म्हनावं, रातच्याला अति जेवनं चांगलं न्हाई, सबब दुपारी येनेचे करावे!!...काय?
उधोजीराजे : (सल्ला ऐकत) असं म्हणतोस? बरं, बोलवा त्यांना! पण म्हणावं, दहा मिनिटांच्या वर वेळ मिळणार नाही!!
मिलिंदोजी : (आज्ञाधारकपणे) जशी आज्ञा म्हाराज! (दालनाबाहेर तोंड नेत शिट्टी वाजवत) या हो, आत या!!
श्रीमंतनाना : (लगबगीने एण्ट्री घेत) महाराजांचा विजय असो! मराठी दौलत चिरायू होवो!!
उधोजीराजे : (हबकून) इतक्‍या अपरात्री हे...हे...हे...सगळं बोलायला आलात?
श्रीमंतनाना : (खुलासा करत) फारा दिवसात खाशांची भेट झाली नव्हती. म्हटलं-
उधोजीराजे : (सावधपणे) काय काम काढलं?
श्रीमंतनाना : (अत्यंत धोरणीपणाने) म्हटलं, सहज चक्‍कर टाकावी!! फारा दिवसात तुमच्याकडले तेलकट बटाटेवडे खाल्ले नव्हते...म्हटलं घेऊन यावी थोडी टेस्ट? काय?
उधोजीराजे : (संशयाने) तुम्ही शिळोप्याच्या गप्पा मारायला कशाला याल आमच्याकडे? काहीतरी मेख असणार!! बोला, काय मसलत आहे?
श्रीमंतनाना : (अत्यंत गंभीर चेहऱ्यानं) त्याचं असं आहे की...की...आमचा सल्ला आहे की...घोडा अडीच घरं मागे घ्या!! काय कळलं?

Web Title: dhing tang british nandy

टॅग्स