15dec16-dhing-tang
15dec16-dhing-tang

गो डिजिटल! (ढिंग टांग)

अट्टल डिजिटल असावे! डिजिटल पैसा हा इलेक्‍ट्रॉनिक आकड्यांच्या स्वरूपात असतो व त्याच्या छपाईस दमडीसुद्धा खर्च होत नाही, हे खरे असले, तरी डिजिटल पैसा वाटेल तेवढा उपलब्ध असून तो फुकट आहे, असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. तो यथावकाश दूर होईलच. पण तत्पूर्वी, आमच्या वाचकांना येत्या ३१ डिसेंबरनंतर पाळावयाची काही पथ्ये आम्ही येथे सांगून ठेवीत आहो. ही पथ्ये पाळली तर(च) आयुष्य सुकर होईल, हे कृपया जाणून असावे. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान श्रीमान रा. नमोजी ह्यांनी पन्नास दिवसांची मुदत मागून घेत नोटबंदी आणली. आपल्या नोटा ब्यांकेत जाऊन पडल्या. देवगडच्या तळ्यातले नाणे आणि ब्यांकेत गेलेला पैका पुन्हा दिसत नाही, ह्याचे प्रत्यंतर आले. तथापि, काहीही काळजी करू नका. हेही दिवस जातील. 

१. संचितं क्रितिषु नोपयुज्यते याचितं गुणवते न दीयते।
तत कदर्य परिक्‍कररक्षितं धनं चौरपार्थिव गृहेषु गच्छति।
...असे नीतिशास्त्रात म्हटले आहे. अर्थ : जमा करून ठेवलेला (काळा) पैसा ना कुणाच्या कामाला येतो, ना दानधर्मात व्यय होतो. तो एकतर जमिनीत पुरलेला राहतो किंवा चोरांच्या घरात सडतो. 
सारांश, द्रव्यसंचय वाईट!! (खुलासा : उपरोक्‍त संस्कृत सुभाषितात ‘परिक्‍कररक्षितं’ हा शब्दप्रयोग असला तरी त्याचा मा. मनोहरबाबा पर्रीकार ह्यांचेशी काहीही संबंध नाही!! कळ्ळे मूं..?)

२. द्रव्यसंचय (आता) विसरा, मुदलात आपण पैशाकरता काम करतो हा विचारदेखील डोक्‍यातून कायमचा हद्दपार करा. माणसाने (बॉसच्या) समाधानासाठी व (मालकाच्या) सुखासाठी निर्ममपणे काम करावे. पगाराच्या तारखेकडे डोळा लावून महिनाभर काम करणे खुळेपणाचे आहे. काम करणे हेच मुळात वाईट आहे, असे आमचे वैयक्‍तिक मत आहे. असो.

३. आपले पंतप्रधान हे एक फकीर आहेत. फकिरी वृत्ती अंगी बाणविली की सारे काही सोप्पे होते. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर’ असा यवनी भाषेत मुहावरा आहे. अर्थ : मेहनत इतरांनी केली (तरच) फकिराला आमलेट खायला भेटते! तेव्हा फकिरी वृत्ती धारण केलीत तर डब्बल भुर्जीसुद्धा मिळेल, हे जाणून असावे.

४. खिशात ज्यास्त पैसा राहू नये, ह्यासाठी सर्वांत सोप्पा मार्ग म्हंजे तो कमवूच नये हा आहे. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी!!

५. कोणी उधार मागितले तर जीभ काढून कानाला खडा लावावा!! असले काळे धंदे आपण करीत नाही, असेही नम्रपणे सांगावे. आपण मात्र बिनदिक्‍कत उधारी मागावी!!

६. पुढील काही वाक्‍ये आयुष्यभरासाठी विसरावीत : अ) ‘कुछ अडजस्ट हो सकता है क्‍या?’ ब) जरा नड होती...क) कीप द चेंज...ड) सुट्टे आहेत का गं? इ) भय्या, कैसा दिया केळा? फ) आज रोख, उद्या उधार. 

७. चिक्‍कार पैसे खिशात असणे आणि अत्यंत कडकीत जगणे ह्यात फारसा फरक नाही. ह्या दोन्ही जमाती एटीएम व ब्यांकांच्या रांगात नव्हत्या, (आपण होतो!) ही वस्तुस्थिती बोलकी आहे.

८. ‘कार्ड घ्यायला विसरलो किंवा विसरले!’ हे वाक्‍य घोकून ठेवावे. मोबाइलची ब्याटरीही दहा टक्‍क्‍याच्या वर कधीही ठेवू नये. (हल्ली ते पेटीएम किंवा फ्रीचार्जवाले फार आगाऊ झाले आहेत.) खिशात दमडी नसेलच!..ह्या तिहेरी बांधकामामुळे वायफळ खर्च होणार नाही. चहा, वडा आदी दुसऱ्याच्या पैशानेच घेण्याची सवय अंगी बाणवावी.

९. पगार नावाची वस्तू ही देवासारखी असते. ती दिसत नाही, परंतु तिचे अस्तित्त्व सर्वांभूती आहे. त्यालाच डिजिटल म्हंटात! काही लोकांच्या मते डिजिटल मनी म्हंजे अंधश्रद्धा आहे. परंतु रोकड्या भक्‍तीने स्वत:चेच निर्मूलन होईल!!

१०. पुढील निवडणुकीत संबंधित व्यक्‍तींना आभासी मत तेवढे द्यावे!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com