ढिंग टांग! आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

ढिंग टांग! आमची(ही) म्यारेथॉन मुलाखत!

प्रश्‍न : सध्या रिलॅक्‍स दिसताय..! 
उत्तर : मी रिलॅक्‍सच असतो! 
प्रश्‍न : महाराष्ट्रात एवढं काय काय घडतंय! तुम्ही इतके रिलॅक्‍स कसे? 
उत्तर : कुठं काय घडतंय? मेघा धाडे बिग बॉस झाली, ह्याच्यापलीकडे एक तरी महत्त्वाची घटना घडली आहे का महाराष्ट्रात? 
प्रश्‍न : तुम्ही खरे महाराष्ट्राचे बिग बॉस आहात!! 
उत्तर : हा प्रश्‍न आहे की उत्तर? 
प्रश्‍न : तूर्त प्रश्‍नच समजा! 
उत्तर : होय, मी बिग बॉस आहे! उगाच दुसऱ्याची चाटुगिरी करण्यापेक्षा स्वत: बॉस झालेलं केव्हाही चांगलं...काय? 
प्रश्‍न : अं...ह...होय तर! 
उत्तर : बिग बॉस होण्यासाठी ह्या महाराष्ट्रात अनेक आले आणि गेले! पण अस्सल, शंभर नंबरी बिग बॉस मीच, हे सगळ्या जगाला माहीत आहे! म्हणूनच माझी म्यारेथॉन मुलाखत घेताय ना? पुढे विचारा! 
प्रश्‍न : तुम्ही नेमबाजी चांगली करता! 
उत्तर : हा टोमणा आहे की कॉम्प्लिमेंट? 
प्रश्‍न : अर्थात कॉम्प्लिमेंट...तुम्हाला बंदुका हाताळताना आम्ही पाहिलंय! तुमचा नेम कधी चुकत नाही म्हणे!! 
उत्तर : वाट्टेल ते बोलू नका!..पोलिस येतील माझ्या घरात!! मला पिस्तुलं घेऊन कुठे गेलेलं पाहिलंय का? दिवाळीत लवंगीपर्यंत ठीक आहे, डांबरी माळ लावली तरी आम्ही कान बंद करतो! बंदुका कसल्या झाडताय? मी शूटिंग करतो, पण क्‍यामेऱ्यानं!! 
प्रश्‍न : तेच तेच...माझा नेम चुकला म्हणा हवं तर! बंदूक नै, क्‍यामेराच म्हणायचं होतं मला!! 
उत्तर : तसं मी वाघालाही शूट केलंय! सिंह, आस्वलं...काळी आणि पांढरी दोन्ही! इन्फ्रारेड क्‍यामेऱ्यानी मी झाडांनाही शूट केलं होतं! गडकिल्ल्यांचे फोटो तर मी विमानातून काढले! आता बोला!! 
प्रश्‍न : तुम्ही भयंकरच शूर आहात बुवा!! 
उत्तर : हा प्रश्‍न आहे? 
प्रश्‍न : नाही..आदरानं म्हणालो! 
उत्तर : मग हसलात का? 
प्रश्‍न : ते सोडा...शिकारीला जाता का कधी? 
उत्तर : गमबूट घालून, खांद्यावर बंदूक बिंदूक घेऊन जंगलात जाताना बघितलंय मला कधी? वेड लागलंय का मला? 
प्रश्‍न : सावज टिपण्यात तुम्ही वाकबगार आहात, असं लोक म्हणतात म्हणून... 
उत्तर : हा आरोप आहे की माहिती? 
प्रश्‍न : पोलिटिकल स्टेटमेंट आहे! 
प्रश्‍न : मग हरकत नाही...सावज बिवज शब्द आले की उगीच घाबरायला होतं! 
उत्तर : सावज टप्प्यात आलं की तुम्ही शिकार साधलीच म्हणून समजा...म्हंजे असं लोक म्हणतात! 
उत्तर : मी मचाणावर बसून थर्मासमधला चहा पीत बसलोय, असं माझं चित्र का निर्माण करता तुम्ही? मी असले हिंस्त्र प्रकार करत नाही होऽऽ...! चांगला बांदऱ्यात बसून तुमच्याशी बोलतोय! शिकारीला कशाला जाईन रानावनात? शिवाय बाहेर पाऊस केवढा पडतोय!! ह्या:!! 
प्रश्‍न : ते सावजाचं सांगा ना... 
उत्तर : पुन्हा तेच...मी मराठी पिक्‍चरचा व्हिलन वाटलो काऽऽऽ? सावज काय, शिकार काय...नेमबाजी काय, बंदूक काय...कॅहीत्तरीच तुमचॅ!! दुसरं काहीतरी विचारा!! 
प्रश्‍न : बरं...बंदूक न चालवता शिकार कशी साधावी? 
उत्तर : ती ट्रिक आहे! ऐका!! जंगलात जावं...मचाणावर मच्छर मारत बसावं. दमून भागून तहान लागल्यावर सावज पाणवठ्यावर येणारच...तोपर्यंत वाट पहावी!! तसं सावज आलं की मोठ्यांदा बोंबाबोंब करुन त्याला पळवून लावावं! काहीही झालं तरी त्याला पाण्यापर्यंत पोचू द्यायचं नाही! आधीच दमलेलं सावज मग तहानेनं मान टाकतं! कळलं? बंदुकीची भानगडच नाय!!- द्या टाळी!! 
प्रश्‍न : तुस्सी ग्रेट हो! तुमची मुलाखत घेऊन आम्हीच दमलो! 
उत्तर : दमलात? मग व्हा तयार! हाहा!! हर हर हर हर महादेऽऽव!! 

-ब्रिटिश नंदी 

Web Title: dhing tang column in sakal