भाष्य : गुजरातेतील ‘महागडी गिफ्ट’

गुजरातेत दारूबंदीचे धोरण सुरुवातीपासून असताना २०२४ मध्ये काही वेगळे घडते आहे. वेगाने वाढणाऱ्या ‘गिफ्ट सिटी’मध्ये गुजरात सरकारने मद्यपानासाठी दरवाजे उघडे केले आहेत.
liquor
liquorsakal

- डॉ. अजित कानिटकर

गुजरातेत दारूबंदीचे धोरण सुरुवातीपासून असताना २०२४ मध्ये काही वेगळे घडते आहे. वेगाने वाढणाऱ्या ‘गिफ्ट सिटी’मध्ये गुजरात सरकारने मद्यपानासाठी दरवाजे उघडे केले आहेत. ही नवी ‘पहाट’ विचार करायला लावणारी आहे. ही ‘गिफ्ट’ दूरगामी विचार करता महागात पडू शकते.

सरत्या वर्षात आपल्या शेजारी गुजरात राज्याने राजधानीच्या शहरातील म्हणजे गांधीनगर मधील वेगाने वाढणाऱ्या ‘गिफ्ट सिटी’मध्ये मद्यपानासाठी दरवाजे उघडे केले. या ‘छोट्या’ वृत्ताकडे फारसे लक्ष द्यावेसे वाटले नाही. तथापि दारूबंदीसंबधी सुरुवातीपासून सातत्याने बंदीचे  धोरण असताना २०२४ ची ही नवी ‘पहाट’ विचार करायला लावणारी आहे. ही गिफ्ट दूरगामी विचार करता महागात पडू शकते.

दुबई-सिंगापूरशी स्पर्धा करणारे आंतरराष्ट्रीय केंद्र अहमदाबाद आणि गांधीनगरपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर वेगाने वाढणारे हे नवे केंद्र म्हणजे जागतिक दर्जाच्या तांत्रिक व आर्थिक उलाढालीचे येत्या काही वर्षातील केंद्र असावे, अशी त्यामागच्या आयोजकांची स्वप्ने आहेत.

‘गिफ्ट’ हे नाव ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी’चे संक्षिप्त रूप आहे. गुजरातमध्ये जागतिक दर्जाचे हे आंतरराष्ट्रीय शहर एका बेटाप्रमाणे असेल. या शहरात सिंगापूर- न्यूयॉर्क- दुबई-लंडन यांना मागे टाकतील, अशा आर्थिक आणि व्यावसायिक सेवा देण्याचे व असे जागतिक केंद्र उभे करण्याचे सरकारचे स्वप्न आहे. या नव्या शहरात जगभरातील अनेक व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना  चुंबकाप्रमाणे आकर्षित करण्याची क्षमता असेल, असे गुजरात सरकारचे अधिकृत धोरण असणार आहे.

अर्थ व तंत्रज्ञान अशा दुहेरी खांबावर बेतलेले हे बेट ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे. सर्व जगभरातून या विशेष शहरात भारतातील व परदेशी उद्योगांनी आपापली कार्यालये उघडावीत, यासाठी अनेक प्रकारच्या सुखसोयी व सवलतींचे गालिचे येथे अंथरले जातील; किंबहुना गेले आहेतच. या सवलती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांमध्ये व इतर अनेक बाबतीत खुलेपणे जगजाहीर केल्या आहेत.

सुमारे ८५० एकरांच्या जागेत २००८मध्ये सुरुवात झालेले हे शहर तसे अजून म्हणावे तसे ‘जागृत’ झालेले नाही, असे काही त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक विशेष सवलतींचा सढळ वापर करुनही येथे म्हणावी तशी आर्थिक उलाढाल होत नाही व त्यामागचे एक कारण म्हणजे संध्याकाळी कामाचा शिणवटा घालवण्यासाठी लागणारे मनोरंजन येथे नाही!

येथे काम करणारे लोक म्हणतात की, या चमकदार नवीन ‘स्मार्ट सिटी’मध्ये आत्मा नाही.  त्या व्यक्तीच्या भाषेत soul, buzz, booz जेथे नाही, अशा नीरस जीवनात काय राम आहे? आजचा नवीन भारतातील तरुण शहरी कामगार त्याच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो इत्यादी इत्यादी.

गुजरात सरकारने २०२३ च्या डिसेंबरात ही उणीव दूर केली व परवाना घेऊन मद्यपान करता येईल, अशी मोकळीक अधिकृतपणे दिली. आता त्या शहरात काम करून संध्याकाळी कंटाळा आला तर काही तरी देशी व परदेशी तळीरामांची सोय झाली!

गुजरात राज्याचा दारूबंदीसंबंधीच्या धोरणाचा आलेख जरी सातत्यपूर्ण असला तरी तो दिशाभूल करणाराही आहे! त्यातील पळवाटा जगजाहीर होत्या. १९७०- ८०च्या दशकात अहमदाबाद शहरांमध्ये झालेले अनेक दंगे अनधिकृत दारू व्यवसायातून व त्याच्यावर कोणाची मालकी असावी, या गुन्हेगारांच्या स्पर्धेतून  उद्भवले होते, असेही काहींचे निरीक्षण आहे.

प्रत्यक्ष गुजरातमध्ये गेले अनेक वर्षे दारूबंदी असली तरी गुजरातच्या पोटातच असलेला दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश व सुमारे दीडशे किलोमीटर उत्तरेला गुजरातच्या सीमेपलीकडचा राजस्थान ही गुजरात राज्यातील अनेक लोकांसाठी हक्काची दारू मिळण्याची ठिकाणे होती, हे सर्वश्रुत आहे.

दिवाळी, नाताळ व मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गुजरातेतून शेकडो पर्यटक माउंट अबू, उदयपूर यासारख्या शहरांमध्ये जाऊन सुरापान करतात. मी १९९० पासून गुजरातच्या संपर्कात आहे. १९८९ ते १९९५ सहा वर्षे तिथे राहिलेलो आहे. त्यामुळे ही परिस्थिती जवळून पाहिलेली आहे.

मद्याचे अर्थशास्त्र 

योगायोगाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील एका माजी मुख्यमंत्र्यानी प्रकटपणे सांगितले की त्यांना ते सत्तेत असताना दारूबंदी करायची होती; पण सहकाऱ्यांच्या विरोधामुळे त्याना असे धाडसी पाऊल उचलता आले नाही! गडचिरोली परिसरातील महिलांचे दारूविरुद्ध आंदोलन महाराष्ट्राला नवे नाही.

इतका मोठा महसूल मिळत असताना त्यावर ‘पाणी’ कसे सोडायचे असा प्रश्न तुटीचा मुकाबला करणाऱ्या राज्यांना नेहमीच पडतो! राजधानी दिल्लीतील एक मंत्री असे परवाने देण्यातील गैरव्यवहारांच्या आरोपामुळे अनेक महिने तुरुंगात आहेत. बिहारात नितीश कुमार यांच्या सरकारला तेथील बचत गट समूहांतील लाखो महिलांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करता आले नाही व दारूबद्दलचे धोरण नव्याने विचारात घेणे भाग पडले.

एकीकडे काही मिनिटांच्या अंतरावरील साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या विचारांची शिकवण सतत देण्याचा प्रयत्न होतो. पैसे वापरताना विश्वस्त भूमिकेतून त्याकडे बघा हा त्याचा संदेश किंवा गरज आणि चैन यामधील फरक ओळखा, ही गांधीजींची शिकवणही लोकांना सांगितली जाते.

गांधीजींचे हे तत्त्वज्ञान आणि ‘गिफ्ट सिटी’तील नवीन वातावरण अशी काहीशी गुजरात सरकारची दुभंगलेली मनःस्थिती दिसते. या विरोधाभासातून अमृतकाळात खरे ‘अमृत’ कोणते आणि कोणते बनावट  याचे उत्तर सरकारकडे नसले तरी प्रत्येक नागरिकाला स्वतःलाच द्यावे लागेल! 

त्यामुळेच नव्या वर्षात गांधीनगरच्या ‘गिफ्ट सिटी’चा अपवाद म्हणून सूट देणे म्हणजे एक प्रकारे या छोट्या बनवाबनवीला अधिकृत मान्यता देण्यासारखे आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे एकीकडे कोट्यवधी रुपये पैशाचे, सोने चांदी व अन्य व्यवहार होत असताना त्याचबरोबर दिवसभराचे आर्थिक ताण घालवायला तेथे येणाऱ्या देशी-परदेशी उद्योजकांना ही सोय सरकारने मोठ्या मनाने करून दिली असेच म्हणावे लागेल.

गुजरातची आणखी एक ओळख म्हणजे गेल्या अनेक वर्ष तिथे चालू असलेला ‘व्हायब्रंट गुजरात’ हा उद्योजकांचा मेळावा. ‘व्हायब्रंट’ हा शब्द सकारात्मक आहे. चैतन्य व गतिशील असा त्याचा अर्थ. तो मेळावा तसाच राहावा अशी सर्वांचीच इच्छा असेल.

गांधीनगरच्या या छोट्या पावलातून पुढे मागे मात्र गुजरातचा पंजाबसारखा ‘उडता गुजरात’ मात्र होऊ नये, अशी कळकळीची इच्छा आहे. त्या राज्याने मला अनेक सकारात्मक आठवणी दिल्या, त्या तशाच राहाव्यात, हे एक नागरिक म्हणून मात्र नक्की प्रार्थना आहे.

खरे ‘अमृत’ कोणते आणि कोणते बनावट  याचे उत्तर सरकारकडे नसले तरी प्रत्येक नागरिकाला स्वतःलाच द्यावे लागेल!

लेखक सामाजिक व आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com