भाष्य : महासत्तेच्या प्रभावाला ओहोटी

अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचा जगात कुठेही प्रभाव जाणवत नाही. त्यांच्या धोरणांमुळे जगात संघर्ष वाढत गेलेले दिसतात.
Joe Biden
Joe BidenSakal

- डॉ. अनंत लाभसेटवार

अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचा जगात कुठेही प्रभाव जाणवत नाही. त्यांच्या धोरणांमुळे जगात संघर्ष वाढत गेलेले दिसतात. अलीकडच्या काळात अमेरिकी दरारा लोप पावत चालला आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे. बायडेन यांच्या कारकीर्दीत तो प्रश्न अधिकच ठळकपणे समोर आला आहे. या ऱ्हासाची कारणे विशद करणारा लेख.

वादळी समुद्रात अमेरिका हे महासत्ताक राष्ट्र दीपस्तंभ समजले जाई. आता ते खरे आहे का, याविषयी प्रश्न उभे राहिले आहेत. एकेकाळचा अमेरिकेचा दरारा आता लोप पावला आहे. एवढा की चौथ्या वर्गातील देशदेखील अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचे ऐकत नाहीत. युक्रेन युद्ध सुरू होऊन आता पावणेदोन वर्षे लोटलीत, तरी त्याची सांगता क्षितिजावर दिसत नाही.

बायडेन यांनी अफगाणिस्तानातून ऑगस्ट २०२१ मध्ये माघार घ्यायचे ठरवले; पण तसे करताना जो विचका झाला ते बघून जग त्यांच्या नेतृत्वाविषयी साशंक झाले. त्या माघारीत १३ जवान दगावले व ८२ अब्ज डॉलरचे लष्करी साहित्य मागे सोडून पळ काढण्यात आला. ही शस्त्रे तालिबानच्या हाती पडली असून काही ‘हमास’ने काळ्या बाजाराने विकत घेतली, अशी बातमी आहे.

बायडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचा पुतीन यांना धाक वाटला नाही. अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला ७० अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदत केली. याशिवाय युरोपीय राष्ट्रांनी २० अब्ज डॉलर दिले. त्यामुळे काय झाले? ‘न्यूयॉर्क टाइम्स’नुसार आता रशियाने युद्धपूर्व काळापेक्षा चारशे चौरस मैलाचा जास्त भूखंड काबीज केला आहे.

क्रमाक्रमाने वाढत्या संहारकशक्तीची शस्त्रे देऊनही युक्रेन रशियाला मागे ढकलू शकला नाही. युक्रेन असो अथवा अफगाणिस्तान, तेथे आर्थिक पुरवठा ‘मानवतावादी मदत’ या गोंडस नावाखाली लपवून ठेवण्यात येतो. कारण तिचं स्वरूप सर्वसामान्यांना कळले तर या देशात बंडच नव्हे तर क्रांती होण्याची शक्यता आहे.

बायडेन यांच्या अपयशाचे दुसरे उदाहरण म्हणजे इस्राईल युद्ध. ‘हमास’ ही दहशतवादी संघटना इजिप्तच्या ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या संस्थेची एक शाखा. तिचे लष्करी बळ सुमारे ४० हजार असून दाता इराण आहे. दरवर्षी तो देश १० कोटी डॉलर देऊन ‘हमास’ला पोसतो व चोरून शस्त्रपुरवठा करतो. ट्रम्प यांनी इराणवर २०१८ मध्ये कठोर बंधने लादल्यावर तेलनिर्यात घटली व तो देश आर्थिक कोंडीत सापडला.

तो ‘हमास’ व ‘हेजबोल्ला’ या लेबनॉनमधील एका दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करू शकला नाही व या दोन्ही धर्मांध दहशतवाद्यांचे दिवाळे निघणार होते. त्यामुळे त्यांचा पहिल्या नंबरचा शत्रू इस्राईलला सुरक्षा लाभली. या मुस्लिम संघटनांचा मूळ हेतू ज्यू देशाला नकाशावरून पुसून तिथे पॅलेस्टाईन राज्य स्थापन करणे. पण नंतर बायडेन मदतीस धावून आले.

इस्राईलचा तीव्र विरोध असूनही प्रथम ओबामा व त्यानंतर बायडेन यांनी इराण अण्वस्त्रधारी होऊ नये म्हणून ‘आयातोल्ला’शी वाटाघाटी केल्या. त्याला खुश करण्यासाठी हळूच काही बंधने ढिली केली. इराणची निर्यात ट्रम्प यांच्या काळात फक्त तीन-चार लाख पिंप असे. ती आता २५ ते ३० लाखांवर गेली. त्यापुढच्या काळात हमास व हेजबोल्ला मुजोर झाले व त्यांनी इस्राईलला लक्ष्य केले.

इराणचे पैसे वापरून २५ मैल लांब, आठ मैल रुंद, १०० फूट खोल व २० कोटी ३० लाख लोकवस्ती असलेल्या गाझा पट्टीत ‘हमास’ने एकूण ३०० मैल लांबीचे भूमिगत बोगदे खोदले. त्यात त्यानं इराणने दिलेली शस्त्रे लपवून ठेवली. इस्राईलची मोसाद, अमेरिकेची सीआयए व ब्रिटनची M-16 या हेरगिरीसंस्था सर्वोत्कृष्ट समजण्यात येतात. जगात कुठल्याच घडामोडी त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.

मग ‘हमास’चे शस्त्रसंपादन त्यांच्या नजरेतून कसे सुटले, हे एक कोडे आहे. ट्रम्प यांनी आयातोल्ला खोमेनीला लाडका असलेल्या सेनापती सुलेमानचा २०२० मध्ये नायनाट केला. तेव्हापासून तो उट्टे काढण्याची वाट बघत होता. बायडेन यांचे नेतृत्वदौर्बल्य बघून ऑक्टोबरपासून २०२३ च्या पहिल्या आठवड्यात हमास, हेजबोल्ला व इराण यांच्यात बैरुतमध्ये बैठक झाली व ऑक्टोबरच्या पाच तारखेच्या बैठकीत आयातोल्लाने ‘हमास’ला इस्त्राईलवर हल्ला करण्यास हिरवा कंदिल दाखवला, असे खळबळजनक वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले. त्या सात तारखेला त्या मुस्लिम संघटनेने ज्यू देशावर घणाघाती घाव केला आणि दुसरे युद्ध सुरू झाले.

‘हमास’ने १२०० हून अधिक ज्यू लोकांची हत्या केली. याशिवाय लहान मुले, वृद्ध बायका व ११ अमेरिकी अशा सुमारे २०० लोकांना ‘हमास’च्या दहशतवादी सैनिकांनी फरफटत नेऊन आपल्या ३०० मैलांच्या बोगद्यात कुठेतरी लपवून ठेवले. या अपहरणामुळे त्यांचे आप्त टाहो फोडू लागले. ‘हमास’ला या अपहृत व्यक्ती म्हणजे एक खजिना वाटतो. वादळाप्रमाणे युद्धेही काळाच्या ओघात संपुष्टात येतात. त्यावेळी ज्या वाटाघाटी होतील तेव्हा या अपहृतांचा ‘चलन’ म्हणून उपयोग होईल.

बायडेन यांची नरम भूमिका

या युद्धामागे इराणचा हात असला तरी अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्या देशावर व पॅलेस्टाईन लोकांवर टीका करण्याचे निक्षून टाळले. हमास पॅलेस्टाईन लोकांची प्रतिनिधिक संस्था नाही, असे अजब विधान बायडेन यांनी करून मानवतावादी मदत करण्यासाठी त्यांनी लगेच दहा कोटी डॉलरची मदत जाहीर केली. त्याच वेळी खळबळजनक माहिती प्रसिद्ध केली.

इराणच्या हस्तकांनी अमेरिकेच्या सीरिया व इराकमधील लष्करी छावण्यांवर हल्ले करून २३ जवानांना जखमी केले. काही जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. असं करताना आयातोल्लाला बायडेन यांची मुळीच भीती वाटली नाही. ट्रम्प यांच्या काळात तसं करण्याचं इराणला कधी सुचलं नाही.

पॅलेस्टाईन लोकांचे राहणीमान अगदी तळात आहे. गाझा पॅलेस्टाईनचा दरडोई उत्पन्न ३८०० डॉलर तर इस्राईलचा नऊपट जास्त २.३ दशलक्षातले ५०% लोक जागतिक रेषेखाली रहात असून ८०% तरुण बेकार आहेत. जवळजवळ अर्धी लोकसंख्या १८ वर्षापेक्षा लहान वयाची. गाझाचा प्रजनन दर ३.३८ तर इस्त्राईलचा २.८ म्हणजे गाझा झपाट्यानं वाढत असून भौगोलिक जागा सीमित असल्यामुळे लोकसंख्या घनता वाढत आहे.

तैवानचा प्रश्न अनेक वर्षापासून धुमसत असला तरी बायडेन यांच्या कारकीर्दीत त्यासंदर्भात अधिक धूर निघत आहे. त्यामुळे तो केव्हा पेटेल याचा नेम नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नजरेतून बायडेन यांचे दौर्बल्य सुटणे शक्यच नव्हते. तरीही त्यांनीही म्यानातून तलवारी काढून नुसताच खणखणाट केला.

त्या बेटाला नाविक वेढा घातला आणि रोज लढाऊ विमाने पाठवून तिथल्या लोकांना हैराण केले. एवढेच कशाला खुद्द अमेरिकेच्या लष्कराला छळले. पेंटेगॉननं नुकतेच जाहीर केले, की गेल्या दोन वर्षात चिनी लढाऊ वैमानिकांनी अमेरिकेच्या विमानांशी एवढी जवळीक साधली की, अपघात व तज्जन्य युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता वाढली. चीनच्या नौदलानेही तसेच केले. अशी ३०० प्रकरणे घडली. त्यामुळे तणाव वाढला.

बायडेन यांनी नरम भूमिका घेतली तरी त्या लाल देशाचा ताठरपणा कमी झाला नाही. अमेरिका जेव्हा जेव्हा दुर्बल झाली तेव्हा तेव्हा जगात अराजक पसरून अस्थैर्य वाढले. इतिहासात दौर्बल्यातून अनेक युद्धे उद्‌भवली. सध्या त्याची पुनरावृत्ती होत आहे, असे दिसते.

(लेखक अमेरिकेतील ‘फर्स्ट नॅशनल बँक’च्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.)

anantlabh@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com