... अपनेही घर में खजाने बहुत हैं!

डॉ. अनिल लचके (विज्ञानाचे अभ्यासक)
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

प्रगत देशांतील संशोधनामुळे आपण प्रभावित होतो; पण आपल्याही देशात उत्तम संशोधन होते, तिकडे मात्र काणाडोळा होतो. विज्ञान प्रदर्शनांतून आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उत्साह व संशोधनासाठी आवश्‍यक असणारे कुतूहल प्रकर्षाने जाणवते.

‘इस्रो’ने एकाच अग्निबाणाच्या साह्याने २२ जून २०१६ रोजी २० उपग्रह अंतराळातील योग्य त्या कक्षेत सोडले. या उपग्रहांमध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘स्वयं’ आणि सत्यभामा युनिव्हर्सिटीचा ‘सत्यभामा-सॅट’ होते. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांची सांघिकवृत्ती, आत्मविश्वास आणि उमेद वाढते. भारत २०१७च्या सुरवातीला ‘पीएसएलव्ही’मार्फत ८३ उपग्रह नियोजित कक्षेत पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यात भारताचे दोन आणि परदेशीयांचे ८१ उपग्रह असतील. हाही एक उच्चांक होईल. सामान्य सुविधा आणि मर्यादित आर्थिक तरतूद असूनही आपले संशोधक कोणतेही आव्हान पेलवू शकतात. परिणामी अंतराळातील बाजारपेठेत भारत बाजी मारू शकेल. भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या स्थितिदर्शक उपग्रह प्रणालीसाठीचे सात उपग्रह अंतराळातील भू-संलग्न आणि भू-स्थिर कक्षांमध्ये सोडलेले आहेत. ग्लोबल पोझिशनिंग (जीपीएस) ही प्रणाली सध्या फक्त अमेरिका, चीन, रशिया आणि युरोपियन युनियनकडेच आहे. युद्धकालीन परिस्थितीत भारताला त्याचा वापर करू दिला जाणार नाही म्हणूनच भारताने अजून दोन राखीव उपग्रह ठेवलेत आणि आपली ‘रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ पक्की केली आहे. मच्छीमारांना त्याचा उपयोग होईल म्हणून त्याला ‘नाविक’ (नॅव्हिगेशन इंडियन कॉन्स्टिलेशन) नाव दिलंय. या वर्षी भारतातील संशोधकांनी जे लोकोपयोगी संशोधन करून शोध-निबंध प्रकाशित केले आहेत, त्यातील काहींवर येथे धावती नजर टाकली आहे.    

पूर्वी परदेशातून महासंगणक किंवा क्रायोजेनिक इंजिन मिळत नव्हते; मग भारताने ती समस्या आपल्या तरुण संशोधकांकडे सोपवून यश मिळवले. आज ‘स्वच्छ भारत अभियाना’त तरुणांनीही वाटा उचललाय. दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने प्लॅस्टिक कचऱ्यापासून ‘चक्क’ फरशा तयार करण्याची प्रोसेस विकसित केली! वाया गेलेल्या प्लॅस्टिकच्या शो-केस, आकर्षक पार्टीशन आणि सार्वजनिक प्रसाधनगृह (टॉयलेट) तयार होऊ शकते. त्यात सूर्यप्रकाशाची (नैसर्गिक) योजना केल्याने त्याला ‘स्मार्ट टॉयलेट’ म्हटलं जातं. दुर्गापूर (पश्‍चिम बंगाल) येथे सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तेथील संशोधकांनी केवळ एक चौरस मीटर जागेत मावणारा कृत्रिम सौरवृक्ष तयार केलाय. त्याच्या फांद्यांवर ३० फोटोव्होल्टेक सौरघट आहेत. तीन लाख रुपयांचा हा ‘वृक्ष’ तीन किलोवॉट ‘इकोफ्रेंडली’ विद्युतनिर्मिती करून पाच कुटुंबांना वीज पुरवतो. भावनगरला सेंट्रल सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी सागरात विना ‘खत-पाणी’ वाढणाऱ्या लाल शेवाळाचे संशोधन करून त्यापासून कॅरॅगिनान तयार केलं. कॅरॅगिनानचा उपयोग सुरुंगाची दारू, टूथपेस्ट किंवा आईस्क्रीम घट्ट करण्यासाठी होतो. या तंत्रामुळे एक हजार तरुणांना रोजगार मिळेल.

हायड्रोजन वायू इंधन म्हणून खनिज तेलांपेक्षाही अधिक कार्यक्षम आहे. खनिज तेल जळताना प्रदूषण होते. हायड्रोजन ‘जळताना’ फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या संशोधकांनी ‘व्हे’पासून हायड्रोजन तयार करण्यासाठी क्‍लॉस्ट्रिडियम जीवाणू वापरलाय. दही-चीज-चक्का करताना ‘व्हे’ हा पाण्यासारखा बाय-प्रॉडक्‍ट मिळतो. भावी काळात ‘हायड्रोजन-इकॉनॉमी’चं महत्त्व जगभर वाढणार आहे. दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमच्या संशोधकांनी वाया गेलेल्या देवदार वृक्षाच्या भुश्‍शापासून पायरॉलिसिस पद्धतीने बायोगॅस (बायोफ्यूएल) आणि कोळसा तयार केलाय. चामडे कमावणं आणि रंगवणं हा रोजगार निर्माण करणारा कुटिरोद्योग आहे. पण यामुळे खूप प्रदूषण होतं. चेन्नईच्या लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटने नैसर्गिक रसायने आणि रंग वापरून प्रदूषण कमी केलंय. यासाठी त्यांनी एका जेलीफिशचा हिरवा रंग तयार करण्याची जैविक यंत्रणा कॉपी करून एका जिवाणूमध्ये त्याचे ‘रोपण’ केलंय. तो ‘जेनिटकी मॉडिफाइड’ जिवाणू हिरवेगार प्रथिन बनवतो. सोनं उत्तम वीजवाहक असल्याने इलेक्‍ट्रॉनिक सर्किटमध्ये वापरतात. सर्किट खराब झाल्यावर ई-कचऱ्यातून सुलभपणे सोनं बाजूला काढणं अवघड असतं. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी खास ‘आयॉन एक्‍स्चेंजर मेम्ब्रेन’ बनवून सोनं वेगळं काढण्याची पद्धती विकसित केलीय. 

पुढारलेल्या देशातील संशोधनामुळे आपण नेहमीच प्रभावित होतो; पण आपल्याही देशात उत्तम संशोधन होत असते, तिकडे मात्र काणाडोळा होतो. आंतरविद्यापीठीय आविष्कार स्पर्धेत पुणे विद्यापीठातील विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प पाहून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्यातील गुणवत्ता, उत्साह आणि संशोधनासाठी आवश्‍यक असणारे कुतूहल मला जाणवते. वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ दिली जातात. महाराष्ट्रातील पुलगावच्या शाळेतील शंतनू आडोळेने या वर्षी पन्नास हजाराचे पारितोषिक जिंकले. धावणारी रेल्वे गावच्या फाटकाच्या जवळ येण्यापूर्वी फाटक बंद करेल आणि शेवटचा डबा फाटक ओलांडून गेल्यावर फाटक आपोआप उघडेल, अशा यंत्रणेची प्रतिकृती शंतनूने सादर केली होती. विविध विज्ञान प्रदर्शनांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग आणि त्यांच्यातील हुशारी आणि ‘नई उमंगे, नई तरंगे’ पाहिल्यावर आम्हालाही ‘अब है नई जवानी’ची अनुभूती येते. आमच्या आधीच हे एका शायराने ओळखून म्हटलंय- ‘अभी साझे दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है. दरे गैर पर भीक मांगो न फंकी, जब अपनेही घर में खजाने बहुत है!’

Web Title: dr anil lachke article