कसरत रुपयाच्या स्थैर्याची

dr atul deshpande
dr atul deshpande

डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तेव्हा दीर्घकाळात रुपया स्थिर राहणे ही तारेवरची कसरत आहे.

आ पले अनेक गोष्टींवर प्रेम असते, तसेच नागरिक आपल्या देशाच्या चलनावरही प्रेम करत असतात आणि म्हणून चलन बळकट असायला हवे, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. पण केवळ मनोदय असणे ही एक गोष्ट आणि चलन बळकट करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे ही अधिक महत्त्वाची गोष्ट. खरे म्हणजे तुमच्या देशाच्या चलनावर अन्य देशांच्या व्यक्तींनी अधिक प्रेम करण्याने तुमच्या देशाच्या चलनाची बळकटी वाढते. उदाहरणार्थ, अमेरिकी डॉलरचे पाहा. प्रत्येकाला डॉलर हवाहवासा वाटतो. यातून डॉलरचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणातला वापर वाढतो. यामुळे त्याची मागणी वाढते. परिणामी डॉलरला बळकटी येऊ लागते. चलनाला बळकटी येणे म्हणजे चलन वधारणे किंवा त्या चलनाचे अन्य चलनांच्या तुलनेत मूल्य वाढणे. याचा दुसरा अर्थ असा, की अन्य देशांचे चलन खरेदी करताना आपल्याला आपल्या देशाचे चलन कमी वापरावे लागणे.

गेल्या तीन महिन्यांतील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार पाहिले तर भारतीय रुपयाला हळूहळू बळकटी येऊ लागली आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जो रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४ रुपयांच्या घरात गेला होता, तो आता ६८ रुपयांच्या घरात आला म्हणजे व्यवहारात आपल्याला कमी रुपये खर्च करावे लागणार असा त्याचा अर्थ. रुपया वधारू लागलाय, कारण भारतीय अर्थव्यवस्थेला चांगले दिवस येत आहेत. तांत्रिक भाषेत बोलायचे तर ‘जीडीपी’, किंमतवाढ, करसुधारणा, बॅंकिंग सुधारणा, वित्त बाजारातील सुधारणा यासारख्या विधायक बदलांमुळे रुपया वधारू लागलाय, असे काही विश्‍लेषकांचे मत. तर रुपयाच्या मूल्यात होणारी ही वृद्धी तात्कालिक आहे, गेल्या काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात सातत्याने खरेदी केली, त्यामुळे रुपयाला हे अल्पजीवी चांगले दिवस दिसत आहेत, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आणखी असे, की जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाल्या, त्यामुळेही रुपयाला उभारी आल्याचे दिसते, असेही एक कारण दिले जाते. रुपयाचे हे वधारणे अल्पकालीन आहे आणि दीर्घकाळात रुपया पुन्हा घसरून तो प्रतिडॉलरला ७४ ते ७५ रुपयांपर्यंत जाऊन थडकेल, अशी भीती काही जाणकार व्यक्त करीत आहेत. वास्तविक रुपयाच्या किमतीत अन्य चलनांच्या तुलनेत अल्पकाळात सातत्याने कमी-अधिक प्रमाणात चढ-उतार होताना दिसतात आणि ते स्वाभाविकही आहे. या बाबतीत खरा प्रश्‍न आहे, तो दीर्घ कालावधीत रुपयाच्या किमतीत स्थिरता येईल काय? दुसरा प्रश्‍न असा, की रुपया वधारायला लागला तर त्याच्या किमतीत होणारी वाढ कोणत्या मर्यादेपर्यंत चांगली? रुपयाची किंमत कमी होऊ लागली, तर ती कोणत्या पातळीपर्यंत घसरावी? म्हणजे रुपयाची अन्य चलनांच्या दृष्टीने खरी किंमत कोणती? या प्रश्‍नाच्या उत्तरातले अंकगणित फसवे आणि चकवे असू शकते, हा एक भाग. दुसरे असे, की आगामी काळात रुपयाची किंमत काय राहील या संबंधीचा अंदाज तंतोतंत बरोबर येईल, असेही नाही. कारण देशातील आर्थिक परिस्थिती आणि देशाबाहेरील आर्थिक व्यवहार या गोष्टी बदलत असतात. अल्प कालावधीतील बदलांवर तत्काळ नियंत्रण आणता येत नाही आणि दीर्घ कालावधीत होणाऱ्या बदलांना वेळ लागतो. अशा परिस्थितीत अल्पकालावधीतील अनपेक्षित बदलांचा रुपयाच्या किमतीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अपेक्षा अशी, की रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल (कारण निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील.) आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे दीर्घकाळात रुपयाची किंमत स्थिर कशी ठेवायची ही तारेवरची कसरतच असते. ही तारेवरची कसरत करताना देशांतर्गत अर्थव्यवस्थेची बळकटी वाढवायला लागते आणि देशाबाहेर अर्थव्यवस्थांमध्ये जे अनुकूल अथवा प्रतिकूल बदल घडून येत असतात, त्या बदलांना सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत तयार करावी लागते. उदाहरणार्थ आताच्या परिस्थितीत रुपया थोड्या फार फरकाने बळकट होतो आहे, असे वाटते असले, तरी २०२० पर्यंत रुपयाची ही बळकटी टिकून राहील काय, याबाबतीत अनेकांकडून शंका उपस्थित केली जातेय. उदाहरणार्थ, देशांतर्गत आर्थिक विकासदराचा अंदाज (७.५ ते ८.५ टक्के) अनुकूल राहील असे गृहीत धरले, तरीही देशांतर्गत भाववाढीचा भविष्यातील प्रवास आतासारखा आटोक्‍यात राहीलच हे सांगता येत नाही. किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर जी सरकारी पॅकेज आणि आर्थिक लाभ जाहीर केले जातात त्यातून सरकारी खर्च वाढत जाणार आणि अधिकाधिक अनुत्पादक होत राहणार. औद्योगिक उत्पादनानेही मोठ्या प्रमाणात उभारी धरलेली नाही. उदाहरणार्थ, बऱ्याच मोठ्या कालावधीत ‘परचेस मॅनेजर्स इंडेक्‍स’ (पीएमआय, औद्योगिक उत्पादनाची प्रगती दर्शविणारा निर्देशांक) ५० पॉइंटच्या आतच राहिला आहे. आता कुठे त्याने पन्नाशीची मर्यादा ओलांडलेली दिसते (५० पेक्षा जास्त म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा विकासदर समाधानकारक). परदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतही मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसतात. त्यात पुन्हा ‘फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेसमेंट) (भागाच्या खरेदीतून होणारी गुंतवणूक) सेवा क्षेत्रात वाढताना दिसते, मात्र औद्योगिक क्षेत्रातील एकूणच परकी गुंतवणूक कमी झालेली दिसते. या घडीला कृषी क्षेत्रातील उत्पादनाचा अंदाज नीटपणे येणे अवघड आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेनं ‘रेपो रेट’ कमी करून अन्य बॅंकांनीही हे व्याज धोरण राबवावे, जेणेकरून औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कर्जाची मागणी वाढेल, अशी अपेक्षा केली आहे. आताच्या परिस्थितीत एकूणच वित्तपुरवठा वाढवून देशांतर्गत मागणी वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. या घडीला वित्तीय तुटीचे प्रमाण आटोक्‍यात असले (३.३ टक्के ‘जीडीपी’च्या तुलनेने) तरी वाढणाऱ्या सरकारी खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात ते आटोक्‍यात राहील, हे ठामपणे सांगता येत नाही. आता होणाऱ्या आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने (उदाहरणार्थ, ‘जीएसटी’चा भविष्यकालीन प्रवास, प्रभावी बॅंकिंग सुधारणा, ‘सेबी‘चे प्रभावी नियंत्रण, कंपनी कायद्यातील महत्त्वाचे बदल इ.) भविष्यकाळातील प्रगती जोरकस राहिली, तर किमान रुपया स्थिर होण्याच्या दृष्टीने मदत होईल.

कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारात काय राहतील, अमेरिकन फेड रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर वाढवला जाईल काय, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा जागतिक खुल्या व्यापारावर काय परिणाम होईल, ‘ब्रेक्‍झिट’ नंतरच्या परिणामांची दिशा काय असेल, या महत्त्वाच्या जागतिक घडामोडींवर जागतिक चलन बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल. या गोष्टी रुपयाला प्रतिकूल ठरल्या तर रुपया वधारणे कठीण होईल. देशामधील किमती निर्देशांकांच्या फरकाच्या दृष्टीने रुपया वास्तव रुपात (रिअल टर्म्स) अगोदरच वधारला आहे. खरे तर रिझर्व्ह बॅंकेला त्यात घट अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर भविष्यात रिझर्व्ह बॅंक काय कृतिशील योजना आखते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घडीला अल्प कालावधीत रुपया वधारतो, पण भविष्यातील रुपयाच्या किमतीची दिशा अनिश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com