एक दिवा लावूया!

कोरोनाशी दोन हात करून जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळेच एकमेकांना मदतीचा हात देत, देशातील उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहनपर कृती करूया.
एक दिवा लावूया!
एक दिवा लावूया!sakal

गेले 19 महिने कोविडशी लढा सुरू आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि महत्वाचे म्हणजे नागरिक या सर्वांच्या प्रयत्नातून या लढ्याला आता यश येताना दिसत आहे. संकटकाळात सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली. अनेकांचे रोजगार गेले, काहींचा संसार उघड्यावर आला, कुटुंबातील कर्ती मंडळी या आजाराने हिरावली. असे असताना अनेक मदतीचे हातदेखील समाजातून पुढे आले. कोविडमुळे बरेच व्यवहार थांबल्याने शासनालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील आपल्या पालकत्वाच्या भूमिकेपासून जराही बाजूला न जाता संकटाच्या काळात जनतेला दिलासा देण्याचे काम विविध माध्यमातून करण्यात आले. शिवभोजन थाळी योजनेद्वारे अल्पदरात गरिबांना भोजनाची सुविधा झाली. सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य मोफत वितरीत केले. कामगारांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी सुविधा दिल्या.

प्रशासनानेदेखील युद्धपातळीवर आरोग्य सुविधा उभारल्या. अनेक स्वयंसेवी आणि उद्योगसंस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या. या काळात कोरोना योद्धे 24 तास आपल्यासाठी लढत होते. रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटिलेटर अशा सुविधा अल्पकाळात उभ्या राहिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुखाच्या भावनेतून प्रत्येक घटकाशी संवाद साधून धीर आणि दिलासा देत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा वेगाने उभ्या करण्यासाठी निर्णय घेतले. या काळात घडलेले माणुसकीचे दर्शनही तेवढेच सुखद होते. रिक्षा चालकांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाने कोरोनाबाधितांना मदतीसाठी हात पुढे केला. बाधित नातलगांपासून दूर असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कुटुंबाची उणीव भासू न देता त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. काही संस्था कोरोनाने मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सरसावल्या. खचलेल्या कुटुंबांना विविध माध्यमातून मदतही आली. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पालकत्व शासनाने घेतले आणि त्यांना आर्थिक मदत जाहीर केली. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने विधवा झालेल्या महिलांना मदतीसाठी योजना जाहीर करण्यात आली. लसीकरणाच्या चाचणीसाठी पुढे आलेल्या स्वयंसेवकांच्या धाडसाचे आणि कर्तव्यभावनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटी 21 लाख लसीकरण आणि कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 98 टक्के आहे. या प्रयत्नांमुळेच ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली. सरकारने विचारपूर्वक आणि निर्धाराने निर्णय घेत टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्ववत आणण्याचे प्रयत्न केले. आज धार्मिकस्थळी प्रार्थनेचे स्वर घुमताहेत, शिक्षण संस्थांत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय. बाजार पूर्वीसारखे फुलू लागलेत, उद्योगाचा भोंगा वाजू लागलाय. रंगभूमीवर तिसरी घंटा वाजतेय, रस्ते जणू धावू लागलेत. नव्या उत्साहाने आणि उमेदीने पुढे जात असताना मागच्या कटू आठवणी विसरण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना ऊर्जा देण्यासाठी पालक-शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे. ज्यांचे नुकसान झाले अशांना दिलासा देण्याचे प्रयत्न शासनातर्फे होत आहेत.

छोट्या व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याच्याकडील एखादी वस्तू घेऊन आपण गरजवंताला भेट दिल्यास दोन कुटुंबांना मदत होईल. परिसरातील गरजूंना, आपल्याकडे घरकाम करणाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून गरजेची वस्तू दिल्यास त्यांची दिवाळी गोड होईल, आपल्यालाही त्यातून समाधान मिळेल. फटाक्यांचा जोरदार आवाज करण्यापेक्षा एखाद्याच्या घरात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आपलेही घर उजळून निघेल, फराळाचे दोन पदार्थ जास्त करून गरजूंना दिल्यास सणाचा गोडवाही वाढेल. संकटावर जशी एकदिलाने मात केली तशी पुनरुभारणीतही एकत्रित प्रयत्न केल्यास यापुढची प्रत्येक दिवाळी आनंदाची ठरेल. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी कर्तव्यभावनेने परिश्रम घेतले त्यांच्या विषयी कृतज्ञेतून एक दिवा लावूया! जाणिवेचा, नवनिर्मितीचा, मानवतेचा आणि विश्वासाचा. कोरोना नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी करूया!

( लेखक जिल्हा माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com