भविष्यवेध : ‘ईएसजी’ होणार उद्योगांचा ‘ईसीजी’

हृदयाचे आरोग्य हे कोणाही व्यक्तीच्या स्वास्थ्याचे निदर्शक मानले जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) हा त्याचा दाखला म्हणता येईल.
Environment Social Governance
Environment Social GovernanceSakal
Summary

हृदयाचे आरोग्य हे कोणाही व्यक्तीच्या स्वास्थ्याचे निदर्शक मानले जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) हा त्याचा दाखला म्हणता येईल.

- डॉ. रवींद्र उटगीकर

हृदयाचे आरोग्य हे कोणाही व्यक्तीच्या स्वास्थ्याचे निदर्शक मानले जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) हा त्याचा दाखला म्हणता येईल. भविष्यात पर्यावरण, समाज आणि प्रशासनविषयक (ईएसजी) उद्योगांचा दृष्टिकोन हा त्यांच्या स्वास्थ्याचा दाखला ठरण्याची चिन्हे आहेत. यशाचे परिमाण बदलू शकणाऱ्या या नव्या संकल्पनेविषयी.

व्यवसाय म्हणजे दुसऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची कल्पना. - रिचर्ड ब्रॅन्सन.

कोविडपूर्व जगात कोणालाही अतार्किक वाटली असती आणि कोविडपश्चात बदललेल्या जगाच्या संदर्भामध्ये मात्र तितकीच हवीहवीशी वाटत असेल, अशी उद्योग-व्यवसायाची ही व्याख्या. कोणताही उद्योग आणि त्यांची उत्पादने किंवा सेवा ही पोकळीतून तयार होत नसली, तरी इतरेजनांचे जीवनमान सुधारण्याचा परिणाम त्यांतून साधला जातोच, असे आपण तूर्त तरी छातीठोकपणे सांगू शकत नाही. किंबहुना, त्यामुळेच असे जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासंबंधीच्या प्रतिमानिर्मितीत यशस्वी ठरलेल्या मोजक्या उद्योग संस्थांभोवती सामाजिक भान असण्याचे वलय तयार होते! जगण्याच्या धावपळीला कोविड काळात मिळालेला अल्पविराम मात्र ही परिस्थिती बदलण्याला निमित्त ठरेल, अशी चिन्हे आहेत. त्यात, हवामानबदलाचे दुष्परिणाम प्रत्येकाच्या दाराशी झपाट्याने येत आहेत. त्यामुळे समाजस्वास्थ्य आणि पर्यावरण या दोहोंबाबतचे भान वाढीला लागले आहे.

या पार्श्वभूमीवर, यश कशाला म्हणायचे आणि ध्येय काय ठेवायचे, याचा व्यावसायिक संस्था फेरविचार करत आहेत. भोवतालच्या जगापुढे ठाकलेल्या पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना कसे सामोरे जायचे, याचा साकल्याने विचार करण्याचा आग्रह त्या संस्थांशी हित जोडलेले घटक धरू लागले आहेत. व्यावसायिक संस्थांची पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कामगिरी (एनव्हायरन्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स - ईएसजी) कशी आहे, हा उद्योगांच्या गुणात्मक मूल्यमापनाचा विषय ऐरणीवर आला आहे. उद्योगसंस्थांशी प्रत्येकाचे काही ना काही संबंध असतात. कोणाचे कर्मचारी म्हणून प्रत्यक्ष, तर कोणाचे ग्राहक म्हणून अप्रत्यक्ष. कोणाचे शेअर बाजारातील गुंतवणूकदार म्हणून, तर कोणाचे उद्योगसंस्थांच्या कार्यक्षेत्रातील समाजघटक म्हणून. अशा प्रत्येक नागरिकाची या उद्योगसंस्थांच्या ‘ईएसजी’ आघाडीवरील कामगिरीविषयी जागरुकता वाढत आहे. हा विषय भवितव्याशीही जोडलेला आहे, ही त्यांच्यामधील जाणीव उद्योगसंस्थांवरही नैतिक दबाव निर्माण करणार आहे. सामाजिक दायित्व या संकल्पनेने काही दशकांपूर्वी उद्योग आणि आर्थिक विश्वाला नवी ओळख देण्याला सुरुवात केली. आता ‘ईएसजी’ त्यापुढील पाऊल ठरत आहे. ‘हू केअर्स विन्स’ या नावाने संयुक्त राष्ट्रसंघ आणि स्वित्झर्लंडचे सरकार यांनी २००४मध्ये प्रकाशित अहवालात ‘ईएसजी’चा उल्लेख प्रथम होता. उद्योगांना या ‘ईएसजी’ची दखल कशी घ्यावी लागणार, हे आपण पाहू.

पर्यावरणाचा ‘ई’ हा यातील महत्त्वाचा घटक. त्यामध्ये संबंधित संस्थेसाठीची ऊर्जेची गरज आणि संस्थेमधून बाहेर पडणारा औद्योगिक कचरा व सांडपाणी, त्यामुळे होणारे जलस्रोतांचे प्रदूषण, संस्थेच्या कार्यवहनाच्या कार्बन फूटप्रिंट्स आणि त्याचे हवामान बदलावरील परिणाम यांचा समावेश होतो. समाजाचा ‘एस’ हा दुसरा महत्त्वाचा घटक. त्याची काळजी घेण्यासाठी उद्योगसंस्थांना रोजगारनिर्मिती, रोजगार व प्रगतीच्या समान संधी, आरोग्य व सुरक्षाविषयक नियम व मानके आदी बाबींकडे विशेष लक्ष पुरवावे लागेल. कार्यवहनात परिणामकारक निर्णय घेण्यासाठी, नियम-कायद्याच्या चौकटीचे पालन करण्यासाठी आणि संस्थेशी हित जोडलेल्या बाह्य घटकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाच्या ‘जी’चे मापदंड महत्त्वाचे ठरतात. संचालक मंडळातील प्रतिनिधीत्वापासून जोखीम व्यवस्थापनापर्यंत आणि कार्यवहनातील नैतिकतेपासून पारदर्शकतेपर्यंतचे विविध पैलू यानिमित्ताने बारकाईने पाहिले जात आहेत.

उद्योगसंस्थांचे मूल्यमापन करताना संस्थात्मक गुंतवणूकदार आता ‘ईएसजी’वर भर देताहेत. भागभांडवल वाढवू पाहणाऱ्या शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांची किंवा बाजारात नोंदणी करू पाहणाऱ्या कंपन्यांची ‘ईएसजी’ची कामगिरी गुंतवणूकदार नक्कीच तपासतील. सर्वसामान्य वाचकही गुंतणूकदार, ग्राहक, कर्मचारी किंवा जबाबदार नागरिक म्हणून उद्योगसंस्थांच्या प्रगतीकडे याच सजगतेने पाहणार, हे स्पष्ट आहे. गुणवान मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी उद्योगांना ‘ईएसजी’ आघाडीवरील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. शाश्वत विकासासाठीची १७ उद्दिष्ट्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५मध्ये निश्चित केली. उद्योगजगत आणि गुंतवणूकदार या दोहोंसाठी ‘ईएसजी’चे निकष म्हणूनच आधारभूत ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय मानक संस्थेने (आयएसओ) २०२१मध्ये सुशासनासाठी आयएसओ ३७०००:२०२१ मानक निश्चित केले आहे.

संस्थांचे जमा-खर्च कसे असावेत, शाश्वत विकासमूल्यांचा अंतर्भाव कसा करावा, यासाठी इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स फाउंडेशन (आयआरएफएस) या न्यासानेही समिती स्थापली आहे. ‘ईएसजी’ गैरव्यवस्थापन हे हवामान बदलांना आणि समाज व देशासाठी होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांनाही कारणीभूत ठरत आहे. स्वार्थी दृष्टिकोनातून पाहायचे, तरी उद्योगसंस्थांनाही त्याचे फटके सोसावे लागणार आहेत. मेक्सिकोच्या आखातात एप्रिल २०१०मध्ये झालेल्या तेलगळतीबद्दल ब्रिटिश पेट्रोलियमला ५४ अब्ज डॉलरचा दंड झाला. वाहनांतून होणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडच्या उत्सर्गचाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करताना बनवेगिरी केल्याचे २०१५मध्ये उघडकीस आल्यानंतर फोक्सवॅगन या जर्मन कंपनीलाही २७ अब्ज युरोचा फटका सोसावा लागला. पर्यावरणाबाबत संवेदनशीलता न पाळल्याची आणि कॉर्पोरेट प्रशासनाच्या नजरेतून ती बाब निसटल्याची ही उदाहरणे आहेत.

या बदलत्या संदर्भात शाश्वत विकासनीती हीच आता उद्योगनीतीचीही व्यापक चौकट गरजेची झाली आहे. उद्योगांचे ग्राहक, समाज आणि पर्यावरण यांसाठी ते महत्त्वाचे आहे. ‘ईएसजी’च्या आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योगसंस्था आपली उत्पादकता, उत्पादनांची नवता, प्रतिमासंवर्धन, बाह्यघटकांच्या प्रतिकूल प्रभावापासून व अनावश्यक बाह्य हस्तक्षेपापासूनही संरक्षण, ग्राहकनिष्ठा आणि समाजाचा विश्वास अधिक सहजतेने कमावतात, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘ईएसजी’ अंगीकारणे या संस्थांची सोयही आहे आणि अनिवार्यताही. या ‘ईएसजी’च्या प्रवाहांची दखल भारतात अद्याप प्राथमिक स्तरावरच घेतली गेली आहे. परंतु त्याकडे भारतीय उद्योगसंस्थांचे लक्ष वेधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केंद्रीय कंपनी कामकाज मंत्रालयाने चालवले आहेत. शेअर बाजारांत नोंदलेल्या, भागभांडवलानुसार पहिल्या एक हजार कंपन्यांनी कॉर्पोरेट जबाबदारीचे पालन कसे केले, हे कळवणारा ‘बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनॅबिलिटी रिपोर्टिंग’ (बीएसबीआर) हा अहवाल सादर करावा, असे परिपत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) जारी केले आहे. २०२१-२२पुरता हा अहवाल ऐच्छिक असला तरी पुढील वर्षापासून सक्तीचा असेल.

महिंद्रा समूहाने व्यावसायिक कार्यप्रणालीत २००७ पासून त्यादृष्टीने बदल चालवले आहेत. ‘राइज फॉर गुड आल्टरनेटिव्ह थिकिंग’ या संकल्पनेतून हा समूह स्वतःलाच नव्हे; तर आपल्या ग्राहकांनाही पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी प्रवृत्त करतोय. रिलायन्स समूहानेही शाश्वत विकासमूल्यांवर आधारित व्यवसाय व्यूहरचनांची आखणी चालवली आहे. आदित्य बिर्ला समूहाने ‘थिंक अबाऊट टुमॉरो, टुडे’ ही संकल्पना तीन टप्प्यांत कशी राबवणार, याची घोषणा केली आहे. ‘ईएसजी’ हा सर्वसामान्य माणसाला उद्योगसंस्थांशी जोडण्याचे आणखी एक निमित्त ठरत आहे. यातील तीनही क्षेत्रांत शिक्षित मनुष्यबळाचा भाग म्हणून करिअर घडू शकते. आज सुरुवातीच्या टप्प्यावर असलो तरी हे क्षेत्र लवकरच उद्योगविश्व व्यापणार आहे. आताच चणचण असलेले ‘ईएसजी’चे निपुण मनुष्यबळ पुढे अमर्याद संधींचे होण्याची चिन्हे आहेत. ईएसजी औद्योगिक स्वास्थ्यासाठीचा इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) ठरेल.

(लेखक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com