esakal | गांधी कधीही नव्हते एवढे आज कालसुसंगत
sakal

बोलून बातमी शोधा

Dr-Ravsaheb-Kasbe

महात्मा गांधी यांच्यावरील चरित्रांपेक्षा वेगळा दृष्टिकोन देणारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. या ग्रंथाचं नाव आहे, ‘गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’.  त्या निमित्ताने डॉ. रावसाहेब कसबे यांची डॉ. राहुल रनाळकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत... 

गांधी कधीही नव्हते एवढे आज कालसुसंगत

sakal_logo
By
डॉ. रावसाहेब कसबे

महात्मा गांधी यांच्यावरील चरित्रांपेक्षा वेगळा दृष्टिकोन देणारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. या ग्रंथाचं नाव आहे, ‘गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’.  त्या निमित्ताने डॉ. रावसाहेब कसबे यांची डॉ. राहुल रनाळकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न - महात्मा गांधी नेते म्हणून पराभूत आहेत, मात्र महात्मा म्हणून विजयी आहेत, हे पुस्तकाच्या नावावरूनच स्पष्ट होतं; नेमकी कशा प्रकारची ‘थॉटलाइन’ घेऊन आपण हा ग्रंथ लिहिला आहे...
डॉ. रावसाहेब कसबे -
महात्मा गांधी यांनी १९२० पासून जे राजकारण केलं, या प्रत्येक राजकारणात आजुबाजूच्या परिस्थितीच्या मर्यादांमुळे आणि त्या-त्या वेळी जो सत्ताधारी वर्ग होता-भांडवलदारांचा आणि संस्थानिकांचा-यांच्यामुळे ज्या मर्यादा निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे गांधींना ज्या प्रकारचं राजकारण करायचं होतं, त्यांच्या मनात जसं ते करायचं होतं, तसं त्यांना करता आलं नाही आणि म्हणून गांधी राजकारणामध्ये अनेक वेळा पराभूत झालेले आहेत. गांधींचा पहिला जो पराभव झाला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावेळी केला. गांधींनी त्याविरुद्ध उपोषण केलं; पण गांधींना स्वतःची भूमिका सोडून द्यावी लागली. हा गांधींचा पहिला राजकीय पराभव होता. पण महात्मा म्हणून ते विजयी झाले. गांधींच्या उपोषणानंतर सगळी मंदिरं अस्पृश्‍यांसाठी खुली होऊन समाजात मानसिक क्रांती झाली. गांधींचा पाकिस्तान निर्मितीला विरोध होता. त्या वेळी हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचा द्विराष्ट्रवादाला पाठिंबाच होता. धर्मभिन्नतेमुळे देशाची फाळणी गांधीजींना अमान्य होती; परंतु फाळणी झाली आणि ते पुन्हा पराभूत झाले. फाळणीवेळी दंग्यांमध्ये ते दोन्ही समुदायांच्या मध्ये ते उभे राहिल्याने महात्म्याचा विजय झाला. गांधींचा मृत्यूही महात्म्याचा मृत्यू आहे आणि राजकारणी गांधींचा पराभव आहे. त्यांना नेहरूंच्या समाजवादी, तर आंबेडकरांच्या अस्पृश्‍यांच्या शक्तीवर स्वार व्हायचं होतं; परंतु त्यांना होता आलं नाही. 

आपलं लेखन हे पारंपरिकता तोडणारं लिखाण आहे... या पुस्तकातही असे धक्के आहेत का...
ज्या पाश्‍चिमात्य चरित्रकारांनी गांधींची चरित्रं लिहिली, त्यांच्या मर्यादा होत्या. त्यांना फक्त इंग्रजी येत होती. गांधी व आंबेडकरांचा मूळ स्रोत मराठीत आहे. मात्र या चरित्रकारांना मराठी येत नव्हतं, त्यामुळे ही चरित्रं अपूर्ण आहेत. त्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधातील मूळ साधन म्हणजे ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ आणि ‘समता’ या तीन पेपरमध्ये आहे. ही नवी माहिती यापूर्वीच्या चरित्रकारांना मिळालेली नव्हती. हा ग्रंथ मराठी, कानडी, हिंदी, इंग्रजी, तमिळमध्ये येतोय. जेव्हा हा ग्रंथ इंग्रजीत जाईल, इंग्रजीत हा ग्रंथ आल्यानंतर मल्याळी, बंगाली आणि तेलुगूत जाण्याचीही शक्‍यता आहे.

गांधीवाद म्हणून अनेकदा उल्लेख अलीकडे होतो, गांधीवादाकडे आपण कशा दृष्टीने पाहता?
गांधीवाद नावाचा कुठला वाद नाही. गांधींनी स्वतः असं म्हटलेलं होतं, की मी जेवढं काही लिखाण केलेलं आहे किंवा जेवढं लिखाण माझ्या संदर्भात छापलेलं आहे, ते सगळं जाळून टाका. काही शिल्लक ठेवू नका. कारण मी जे-जे बोलतो ते अनेक वेळा आत्मविसंगत असतं. काल जे मी बोललो ते आज मी बोलेनच असं नाही आणि आज जे बोललो ते उद्या बोलेनच असं नाही. पण तुम्हाला खरं मानायचं असेल, तर माझं शेवटचं म्हणणं विचारात घ्या. वाद म्हणजे ज्या माध्यमातून जीवनाच्या समग्र अंगांची उत्तरं मिळावीत, त्याला ‘इझम’ अर्थात ‘वाद’ म्हटलं जातं. गांधींचा विचार मानवी असल्यामुळे तो कुठल्याही साच्यात बसूच शकत नाही. त्यामुळे गांधींनाही कुठल्या वादात बसवता येत नाही. म्हणूनच गांधीवादही नाही. 

गांधींचे विचार हे कालसुसंगत आहेत किंवा भविष्यातही ते जगासाठी उपयोगी ठरतील, असं आपल्याला वाटतं?
आज फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला गांधींचीच आवश्‍यकता आहे. याचं कारण असं, की या काळात भांडवलशाहीने दोनशे वर्षांत जी प्रगती केली, असं आपण म्हणत होतो, ते दावे खोटे, नकली ठरले आहेत, हे स्पष्ट झालं आहे. युरोप, अमेरिकेत अनेक लोक फुटपाथवर झोपतात, हे आता उघड झालेलं आहे. भारतात आपल्या घरी जाण्यासाठी हजारो मैल पायी चालत लोक गेले, अनेकांचा त्यात मृत्यू झाला. आपल्या देशात तीस कोटी लोक पूर्णपणे उपयोगशून्य आहेत. या लोकांची मतं सत्ताधारी पक्षाला मिळाली नाहीत, तरी काही फरक पडत नाही. सत्ताधारी या मतांशिवाय निवडून येऊ शकतो. त्यामुळे नेते लोकांना बांधलेले नाहीत. या निरुपयोगी ठरलेल्या लोकांना केवळ गांधींचा विचार सामावून घेऊ शकतो. आत्मसन्मानासाठी प्राणाची बाजी लावून हे लोक लढतील. ते अहिंसक किंवा हिंसक मार्गाने लढतील, हे त्या वेळचा काळ ठरवेल. त्याचं कारण म्हणजे गांधींच्या शरीराचं सांडलेलं रक्त फुकट जाईल, असं मला वाटत नाही. मनुष्यजातीला गांधी आज जेवढे कालसुसंगत आहेत, तितके यापूर्वी कधीही नव्हते.

Edited By - Prashant Patil

loading image