गर्भाशयाच्या कर्करोगाला थोपविणे शक्य

गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महिलांमधील भविष्यातील कर्करोगाला थोपविणे शक्य होणार आहे.
HPV Vaccine
HPV Vaccinesakal

- डॉ. संध्या भिडे

गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महिलांमधील भविष्यातील कर्करोगाला थोपविणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सुखी संसाराला लागणारे ग्रहण लसीकरणामुळे टाळता येऊन जगणे आनंददायी करता येईल.

सविता आणि राजेशचा संसार सुखाचा होता. छोटासा ब्लॉक होता. दोघांना नोकऱ्या होत्या. मुलगी खूप हुशार होती. तिला डॉक्टर किंवा इंजिनियर करण्याचे स्वप्न पती-पत्नी पाहात होते. त्यासाठी कष्ट करण्याची दोघांची तयारी होती. अचानक सविता आजारी पडली. तिला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि सुखी संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला. होत्याचे नव्हते झाले!

आज अशी अनेक कुटुंबे या आजाराचा आघातामुळे उद्‍ध्वस्त झालेली दिसतात. पण आता आशेचा किरण दिसत आहे. या भयावह आजारावर मात करण्यासाठी लस उपलब्ध आहे. हाच तो आशेचा किरण. त्याचा वापर करून कर्करोगाला थोपवणे शक्य आहे.

एका जर्मन विषाणूतज्ज्ञाने १९७६ मध्ये शोधून काढले की, गर्भाशयाचा कर्करोग एका विषाणूमुळे होतो. त्यावेळी अनेकांनी त्याला वेड्यात काढले (नेहमीप्रमाणे!). परंतु त्यानंतरच्या अभ्यासातून १९८३ मध्ये हे सिद्ध झाले की, डॉ. हॅरोल्ड झुर हाऊझेनचा सिद्धांत बरोबरच होता.

एचपीव्ही-१६ आणि एचपीव्ही-१८ या दोन विषाणूंमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. त्यानंतर या विषाणूवर प्रतिबंधात्मक लस शोधून काढण्याची धडपड सुरू झाली. सारे शास्त्रज्ञ कंबर कसून कामाला लागले. अखेरीस २००६मध्ये लस शोधून काढण्यात यश आले. जगभरातील सर्व स्त्रियांच्या हाती या प्रकारच्या कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र उपलब्ध झाले. स्त्री जातीला वरदान नव्हे, जीवदान मिळाले.

का होतो गर्भाशयाचा कर्करोग

हा कर्करोगाचा एकच- एकमेव प्रकार आहे की, लस घेतल्यामुळे त्याचा प्रतिबंध करता येतो. म्हणजे लस घेतलेली असली तर गर्भाशयाचा कर्करोग कधीच होणार नाही. हा कर्करोग का होतो आणि कसा पसरतो, हे माहिती असणे गरजेचे आहे.

ह्यूमन पॅपीलोमा व्हायरस हा स्पर्शातून आणि लैंगिक संबंधामधून पसरतो. दुसऱ्याला याची लागण होते. त्यामुळे कोवळ्या वयातील मुलींना (९ ते १४ वर्षे) जर प्रतिबंधात्मक लस आधीच दिली, तर पुढील आयुष्यातील लैंगिक संबंधापासून त्यांना कोणताही धोका नाही. त्यामुळे काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

याचे कारण हा विषाणू ८० टक्के लोकांमध्ये आजाराचे कोणतेही लक्षण न दाखवता शरीराच्या आतील आवरणात आणि आतील कातडी किंवा अस्तर यात वर्षानुवर्षे दबा धरून गप्प राहतो आणि हेच लोक हा विषाणू त्यांना नकळत इतरांमध्ये पसरवत असतात. कोणालाच याची कल्पना किंवा जाणीव नसते; ना घेणाऱ्याला ना देणाऱ्याला! मधल्यामध्ये विषाणूचे फावते!

पुरुषांनादेखील धोका

काही लोकांत मात्र हाता-पायाला बारीक पुरळ येणे, छोटे गोळे येणे, गुप्तांगाला खाज सुटणे, चट्टे पडणे अशांसारखी लक्षणे दिसून येतात. या लक्षणातही २०-२५ वर्षे हा विषाणू निमूटपणे गप्प बसून राहतो आणि एके दिवशी अचानक त्याचे रूपांतर कर्करोगात होते! कुटुंबावर संकट कोसळते.

बरं हा आजार फक्त स्त्रियांनाच होतो, असेही नाही. पुरुषांना गर्भाशय नसते तरीदेखील या विषाणूपासून त्यांनाही धोका असतोच. लिंगाचा, गुदद्वाराचा, घशाचा कर्करोग त्यांनाही होऊ शकतो, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

भारतात या आजाराचे सर्वांत जास्त रुग्ण आढळतात. या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही भारत पहिल्या स्थानावर आहे. कारणं आहेतच म्हणा! आपली प्रचंड लोकसंख्या, गरिबी, गुप्तांगाबद्दलची अस्वच्छता, अनास्था, लैंगिक शिक्षणाची कमतरता, असुरक्षित संबंध, गर्भनिरोधक न वापरणे, जागेची कमतरता ही कारणं आहेतच. त्यामुळेच त्यावर लस हा प्रभावी उपाय आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या शोधमोहिमेतून हे सप्रमाण सिद्ध झाले आहे की, ९ ते १४ या वयातील ज्या मुलींना ही लस दिली त्यांच्यात गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाले. त्याचबरोबर १५ ते २५ या वयातील स्त्रियांना (ज्यांचा लैंगिक संबंध आलेला असण्याची शक्यता असते अशा स्त्रिया) त्यांना देखील या लशीचा फायदा झाला.

याचे कारण असे की जरी एचपी विषाणू त्यांच्या शरीरात गेला असला तरी तो निष्प्रभ झाल्याने त्याच्यापासून रोग होण्याची शक्यता किंवा धोका नसतो. तो धोका टळलेला असतो. फक्त १५ ते २५ या वयोगटातील स्त्रियांना दोनऐवजी तीन डोस द्यावे लागतात एवढेच.

सीरम इन्स्टिट्यूटने या प्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन सुरू केले आहे. आता ही लस परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. गरज आहे या लशींची उपयुक्तता लोकांना पटवून देण्याची. समाजाच्या कल्याणाची तळमळ व आस्था असलेले आणि निरपेक्ष बुद्धीने काम करणारे समाजसेवक व डॉक्टर एकजुटीने कामाला लागले तर हे काम सहजपणे करता येईल.

समुपदेशनाचे महत्त्व

डॉक्टर मंडळींनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला थोडा वेळ खर्च करून या लशीची महती पटवून द्यावी. स्वतः डॉक्टर सांगतात म्हटल्यावर अनेक पालक आपल्या मुलींना ही लस देण्यास तयार होतील. समाजसेवकांनी शाळा-शाळांत जाऊन व्याख्याने देऊन पालकांना या लशीची माहिती व तिची उपयुक्तता, ते घेण्याची आवश्‍यकता पटवून द्यावी म्हणजे अनेक पालक ही लस त्यांच्या मुलींना देतील.

सेवाभावी संस्थांनी लसीकरणाच्या उपक्रमाबाबत पुढाकार घ्यावेत. रास्त दरात अशा शिबिरातून लस उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून अनेक महिलांचे आरोग्य संवर्धन करणे आणि त्यांच्या घरादाराचे सौख्य व आरोग्य सुदृढ राखण्याला मदत होऊ शकेल. चला तर मग एक पाऊल पुढे टाकूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com