Aavishkar Competition
Aavishkar CompetitionSakal

तरुणांच्या शोधकवृत्तीचा ‘आविष्कार’

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय ‘आविष्कार’ नावाची स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतीच घेण्यात आली.
Summary

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय ‘आविष्कार’ नावाची स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतीच घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय ‘आविष्कार’ नावाची स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतीच घेण्यात आली. महाविद्यालय आणि विद्यापीठातील तरुण संशोधकांचे हे पंधरावे संमेलन होते. हा भव्य उत्सव नुकताच पार पडला. आविष्कार स्पर्धा विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरत आहे. कारण या स्पर्धेत त्यांच्या कल्पनाविलासाला संशोधनाची जोड देण्याची संधी मिळते.

आविष्कार या शब्दाचे अनेक अर्थ आहेत! आविष्कार म्हणजे कल्पना, नावीन्यता, विचार, शोध, प्रतिभा, प्रकटीकरण, संशोधन आदी. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी जे प्रकल्प सादर करतात, त्यामध्ये या सर्व गुणांची झलक कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. त्यांची मेहनत, चातुर्य आणि सफाईदारपणा याची पारख जाणकार परीक्षक करतात. यंदा स्पर्धेकरिता २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला. यात ६३६ प्रकल्प सादर करणारे संशोधक तर होतेच, त्या बरोबर विद्यापीठांचे व्यवस्थापक, समन्वयक तसेच भारतातील विविध विषयांमधील जाणकार तज्ज्ञ सहभागी झालेले होते. सुमारे तेराशे विद्यार्थ्यांचा मेळावा सलग चार दिवस विद्यापीठाच्या आवारात होता.

विद्यापीठासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञ स्व. प्रा. एम. आर. भिडे यांचे नाव ‘आविष्कार नगरी’ला दिले होते. स्पर्धेतील सहा विषयांच्या दालनाला विद्यापीठाशी निगडित असणाऱ्या सहा नामवंत प्राध्यापकांचे नाव देण्यात आले होते. त्यामध्ये रसायनशास्त्राचे प्रा. एच. जे. अर्णिकर, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानसाठी बी.जी. शिर्के, कृषी आणि पशुसंवर्धनासाठी डॉ. बी. व्ही. निंबकर, औषधनिर्माण आणि वैद्यकशास्त्रसाठी डॉ. बानू कोयाजी, व्यवस्थापन आणि वाणिज्यसाठी डॉ. प्र. चिं. शेजवलकर तर मानव्य/भाषा/ललितकलासाठी प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांची नावे दिलेली होती. ‘आविष्कार’चे उद्‌घाटन नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सचे (एनसीसीएस) प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मोहन वाणी तर समारोपासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीचे (आयआयटीएम) संचालक डॉ. आर. कृष्णन् उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांमधील विज्ञानाविष्कार प्रज्वलित केला. ही स्पर्धा कमालीची नेट-नेटकेपणा सांभाळून पार पाडली गेली.

संशोधनवृत्तीला प्रोत्साहन

‘आविष्कार’ची संकल्पना २००६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती एस. एम. कृष्णा यांनी मांडलेली होती. आता ही स्पर्धा महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये चांगली रुजली आहे. आपल्या आविष्काराचे प्रकटीकरण करण्यासाठी विद्यार्थी सजग आणि चौकस होत गेले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या बाराशेवर पोहोचली. त्यांच्यामध्ये नावीन्यता आणि कल्पकतेबरोबरच संशोधन वृत्ती वाढली ही स्पर्धेची जमेची बाजू. पोस्टर बनवून त्या सोबत एखादे चालते-बोलते ‘वर्किंग मॉडेल’ करून प्रकल्प सादर करताना त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. व्यक्तिमत्त्व बहू-आयामी होत गेले. त्यांच्या कल्पकतेला वाव देणारे प्राध्यापकही पुढे आले. साहजिकच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या पद्धती समजत गेल्या, प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या कल्पना प्रकल्पाच्या रूपाने पुढे आल्या. स्पर्धेत यशासाठी लागणारी जिद्दही वाढली. त्यातून शिक्षण आणि संशोधन विकास संस्था उद्योग क्षेत्राशी जोडल्या जाव्यात म्हणून संवाद प्रक्रिया सुरू झाली.

वर्तमानात उद्योजकांना आणि लोकांना समस्या भेडसावत असतात. त्यावर उपाय शोधण्याकरिता कल्पकतेला संशोधनाची जोड देण्यासाठी जो सक्षमपणा आवश्यक असतो तो विद्यार्थ्यांमध्ये वाढत गेला. हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रतिभा/कल्पकता आणि क्षमता ओळखणे व त्यांना ती क्षमता विकसित करण्यासाठी संधी देणे गरजेचे आहे. या करिता चांगल्या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्न करणे, त्यातून काही स्टार्ट-अप सुरू करता येतील का, याबद्दल चाचपणी करणे आदी. तसेच संशोधकांचे योग्य कौतुक तर केले पाहिजेच; पण त्यांना काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून शिष्यवृत्ती देणे योग्य ठरेल.

समाजाभिमुख प्रकल्प

मानवता, भाषा आणि ललितकला या विषयातील प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी महिला सबलीकरण, साक्षरता, कुपोषण, साहित्य- कलाविष्कार, कर्तव्याची जाणीव, भाषाविकास, अभिनव शैक्षणिक उपकरणे आदी विविधांगी समस्यांचा विचार करून त्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांचा प्रकल्प हाती घेतला होता. व्यवस्थापन/वाणिज्य विषयांमध्ये औद्योगिक माहिती, तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता, बाजारपेठेचा अभ्यास, कायद्यातील तरतुदी आदी संदर्भातील प्रकल्प होते. मूलभूत विज्ञान श्रेणीमध्ये मात्र वर्तमान आणि भविष्यातील प्रश्नांचा चांगलाच परामर्श स्पर्धकांनी घेतला. त्यामध्ये ऊर्जा, पाणी, पर्यावरणाचे संरक्षण, अंतराळ, खगोल-विज्ञान, संगणक प्रणाली, अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी), ग्रॅफिन, अणु किरणोत्सर्जन असे काही प्रकल्प परीक्षकांना आकर्षक वाटले. एका विद्यार्थिनीने कृषिक्षेत्रातील कच्च्या मालाद्वारे निसर्गात सहजपणे विघटन होणारे (पर्यावरणपूरक) सॅनिटरी पॅड तयार केले होते.

अंतराळातल्या कृत्रिम उपग्रहांमध्ये वैज्ञानिक उपकरणे असतात. ती चालू राहण्यासाठी ऊर्जा लागते. ती सुरक्षित अशा किरणोत्सर्गी मूलद्रव्यामार्फत कशी मिळवता येईल, या संबंधीचा चांगला प्रकल्प सादर केला होता.

कृषी/पशुसंवर्धन विषयात तंत्रज्ञानाचा उपयोग कुठे आणि कसा करता येईल या संबंधी विचार केल्याचे दिसून आले. अभियांत्रिकी विषयात क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने हवामानाचा अंदाज वर्तवण्यासारखे अभिनव प्रकल्प होते. परीक्षकांनी पहिल्या दिवशी सर्व पोस्टर्स पहिली. स्पर्धकाला तीन ते पाच मिनिटांमध्ये त्यांचा शोध प्रात्यक्षिकामार्फत स्पष्ट करायला सांगितले. साडेसहाशे प्रकल्पांमधील सव्वाशे चांगले प्रकल्प निवडून त्यांना पुन्हा एकदा पारदर्शिकांसह १० मिनिटात सादरीकरणाची संधी दिली. त्यातून सहा विषयातील ४८ प्रकल्पांना प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळाला. ‘आविष्कार-२०२३’मध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक पहिला आला. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दुसरा क्रमांक मिळवला.

प्लास्टिक बाटल्यांपासून पादत्राणे

स्पर्धेतील काही प्रकल्पांचा विशेष उल्लेख करायला हवा. वाया गेलेल्या बॅटरीतील लिथियम मूलद्रव्य परत मिळवायचे कसे, हे दर्शवणारा प्रकल्प होता. प्लास्टिक बाटल्यांपासून चांगली पादत्राणे बनवणारा प्रकल्प आकर्षक होता. एका विद्यार्थ्याने सूक्ष्मदर्शकामधून दिसणारे जंतू थेट लॅपटॉपच्या मॉनिटरवर (पडदा) कसे घेता येतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या जंतूंचा फोटो/प्रिंट सहजपणे घेता येतो. याची किंमतदेखील माफक आहे! औषधनिर्माण/वैद्यकशास्त्र विषयांमध्ये कर्करोगरोधक आणि अन्य व्याधींवरील नैसर्गिक औषधांची माहिती देणारे, ऊहापोह करणारे प्रकल्प होते. पहिल्या ५८ नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रजासत्ताकदिनी राजभवनात आमंत्रित करून निवडक प्रकल्प राज्यपाल, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि काही उद्योजकांसमोर सादर करण्यात आले. ही घटना विद्यार्थ्यांची उमेद वाढवणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com