तुम्ही आज हसलात काय? 

डॉ. सपना शर्मा 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कुठंही जाताना आजूबाजूला एक नजर टाका. गर्दी असो वा नसो, बहुतांश व्यक्ती कुठल्यातरी विवंचनेत असल्यासारख्या वाटतात. चेहऱ्यावर बहुतेकवेळा तणाव आणि कसलीतरी चिंता असते. स्मित तर सोडूनच द्या; पण नजरानजर झाली तरी तुम्हाला तुम्ही असून नसल्यासारखे जाणवेल.

कुठंही जाताना आजूबाजूला एक नजर टाका. गर्दी असो वा नसो, बहुतांश व्यक्ती कुठल्यातरी विवंचनेत असल्यासारख्या वाटतात. चेहऱ्यावर बहुतेकवेळा तणाव आणि कसलीतरी चिंता असते. स्मित तर सोडूनच द्या; पण नजरानजर झाली तरी तुम्हाला तुम्ही असून नसल्यासारखे जाणवेल.

बऱ्याच लोकांशी मी याबद्दल बोलले आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली- आपण आयुष्याला म्हणजे जगण्याला फारच गंभीरपणे घेतो. प्रत्येक छोट्या छोट्या बाबींमध्ये आपण संस्कार, परंपरा घेऊन येतो आणि नको त्या बाबी क्‍लिष्ट करून टाकतो. खरं म्हणजे संस्कार म्हणजे खरोखरच काय हे कदाचित तुमच्या- आमच्यापैकी कुणालाही ठामपणे माहीत नसावं. आपापल्या समजुतीप्रमाणं किंवा सोयीप्रमाणं आपण संस्कार या शब्दाचे अर्थ बदलत राहतो; पण कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला कमी लेखणं किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हेच मूलभूत कारण असतं. काही उदाहरणं इथं देते : 1) नवरा आपल्या मित्रांसोबत दारूच्या पार्टीत पत्नीचा हात धरून नाचतो आणि तिची इच्छा नसल्यास तिच्यावर नाराज होतो. तोच नवरा तिच्या मित्रांच्या घोळक्‍यात मख्ख चेहऱ्यानं बसतो आणि तिची नाचायची इच्छा असली, तर नजरेच्या इशाऱ्यानंच तिला खाली बसवतो. 2) मुलांना आपला वेळ हवा असतो, तेव्हा आपण त्यांना वेळ नाही म्हणून टीव्ही, कॉम्प्युटर सुरू करून देतो. मग तीच मुलं टीव्ही बघण्यात गुंततात, तेव्हा आपण नाराज होतो आणि त्यांनाही दु:खी करतो आणि सांगतो की टीव्ही पाहणं वाईट आहे. 3) सासू आपल्या पसंतीनं आणि इच्छेनुसार मुलाचं धूमधडाक्‍यात लग्न लावून देते; पण लग्नानंतर सुनेनं आपल्या मर्जीनुसारच वागायला हवं असा बऱ्याच सासवांचा प्रयत्न असतो. 4) मैत्रीत किंवा नात्यांमध्ये झालेल्या चुकांना वर्षानुवर्षे आपण चघळत जिवंत ठेवतो. 

या आणि इतर अनेक रोजच्या घटनांमध्ये नियंत्रण ठेवणारा आणि त्याला बळी पडलेला हे दोघेही तणावाखाली जगत असतात. आपल्याला सांगितलेल्या संस्काराच्या व्याख्येप्रमाणे सगळे असंच जगतात म्हणून आपणही असंच जगत असतो, त्यामुळे कुणीच या चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. जबरदस्ती करणारा आणि बळी पडणारा दोघेही कुणाची मदत घेत नाहीत. आपण स्वतःही बदलत नाही आणि परिस्थितीही बदलायचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे जवळपास सगळेच तणावाखाली दिसतात. 

माझ्या मते आयुष्याला आणि जगाबरोबरील आपल्या नात्याला थोडं कमी गंभीरपणं घेतलं तरी चालेल. जगात काहीच कायम नसतं. आपले इथले दिवस मोजकेच असतात. त्यातले बरेच निघून गेलेत. किती दिवस आपण आणि इतर जगणार हे माहीत नाही. तेव्हा प्रेम करा, काळजी घ्या, गरज असल्यास समजावून सांगा; पण त्यांना पटत नसेल तर पाठीवर थाप मारून मस्तपैकी हसा. तुमच्या मनासारखं लोक नाही वागले तरी खूप काही बिघडणार नाही. जगू द्या प्रत्येकाला आणि स्वतःही जगा. दिवसातून किमान दोनदा तरी मनसोक्त हसा आणि बघा... तुमचा सगळा ताण नाहीसा होईल. 

Web Title: Dr. Sapna Sharma article