साधारण की असामान्य?

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

आपण स्वतः ऍव्हरेज होतो, परंतु आपली मुले आघाडीवरच राहायला हवीत हा आपला अट्टहास. या अट्टहासापायी आपण आपल्या मुलांचे छोटे छोटे यश, आनंद या सगळ्यांवर सतत पाणी टाकत असतो. त्यांना ते बनविण्याच्या नादाला लागतो, जे ते मुळात नाहीत

ऍव्हरेज मार्क, ऍव्हरेज रूप, ऍव्हरेज पगार, ऍव्हरेज गाडी... ऍव्हरेज म्हणजे साधारण या शब्दाचा नकारार्थी विशेषण म्हणून आज फारच गाजावाजा होत असलेला दिसतो. इथे "नकारार्थी' हा शब्द महत्त्वाचा आहे. आम्ही साधारण किंवा ऍव्हरेज म्हणूनच मोठे झालो. आमच्या वेळी 90 टक्के गुण मिळविणारे बोटविंवर मोजण्याइतकेच असत. कपडे जवळपास सगळ्यांकडे सारखेच असत. पगार मोजकाच असल्याने घरात एक टीव्ही असला तरी आपण श्रीमंत आहोत असा भास व्हायचा. सर्वच साधारण. त्यामुळे "साधारण' या शब्दाला खूप महत्त्व दिले जात नसे, तर कुणामध्ये विशेष किंवा अलौकिक काही असेल तर त्याबद्दल सकारात्मकतेने बोलले जात असे.

दोन्ही काळांमधील फरक आपण लक्षात घ्यायला हवा. त्या काळात साधारण असणे म्हणजे निकामी किंवा अयशस्वी असे मानले जात नसे. करियरमध्ये खूप पर्याय नसले तरी "काही तरी नक्कीच करेल" अशा भावनेतून सर्वांचा पाठिंबा असायचा. आणि तुम्हाला आठवत असेल तर मेहनत करण्यास तयार असलेला प्रत्येक जण व्यवस्थित आयुष्य जगण्यात यशस्वी झालेला आहे.

परंतु आज पालकांना जगावेगळी विलक्षण अशी सर्व बाबतीत अतियशस्वी अशीच मुले हवीत. त्यापेक्षा काहीही कमी असलेले त्यांना सहन होत नाही. अभ्यासात सामान्य असला तरी पुढे काहीतरी चांगले करेल, असा त्यांना विश्वासही नाही आणि ते पाहण्यासाठी धीर धरण्याचा संयमही नाही. आपल्याला "ऍव्हरेज' या शब्दाची ऍलर्जी आहे असे जाणवते. खूप मार्क मिळविणारे विद्यार्थीच यशस्वी होतात असे नाही या सत्याकडे आपले लक्षच जात नाही. आपण स्वतः ऍव्हरेज होतो, परंतु आपली मुले आघाडीवरच राहायला हवीत हा आपला अट्टहास. या अट्टहासापायी आपण आपल्या मुलांचे छोटे छोटे यश, आनंद या सगळ्यांवर सतत पाणी टाकत असतो. त्यांना ते बनविण्याच्या नादाला लागतो, जे ते मुळात नाहीत. त्यातून त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो. घरात नात्यांची माती होते. हातातले क्षण आपण दुःखात घालवतो आणि कुठल्यातरी दूरच्या दिव्याच्या आगीवर आपल्या स्वप्नांची खिचडी शिजवत बसतो.

ज्या व्यक्तींनी खूप मोठे यश मिळवले आहे, त्या सर्वांनी आपल्या मूळ स्वभावाशी जे जुळते तेच केल्यामुळे त्यांना यश मिळाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या यशांमुळे इतके भाळून जातो की स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी अशक्‍य असे लक्ष्य ठेवतो. दुसऱ्यांच्या ध्येयामागे धावताना आपण स्वतःला विसरतो आणि तिथे पोचू न शकल्याच्या नैराश्‍यात गटांगळ्या खात राहतो.
आपण आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या मुलांनाही शिकवायला हवे. मार्क, पैसा किंवा अतिसुंदर रूप नसले तरी प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने असामान्य आणि अलौकिक असते हे सर्वांनीच जाणून घ्यायला हवे.

Web Title: dr sapna sharma writes about children

टॅग्स