ओळख

life
life

एका माणसानं पाण्यावर चालू शकणारा एक जगावेगळा शिकारी कुत्रा घेतला आणि आपल्या मित्राला पक्ष्यांच्या शिकारीचं निमंत्रण दिलं. दिवसभर ते तलावाकाठी पक्ष्यांची शिकार करीत आणि पाण्यात पडलेल्या त्या पक्ष्यांना तो कुत्रा पाण्यात धावत जाऊन पकडून आणत होता. परंतु, मित्र काहीच बोलला नाही. शेवटी न राहवून त्यानं मित्राला विचारले, ""तुला माझ्या कुत्र्यामध्ये काही विचित्र नाही वाटत?'' मित्र सहजपणे उत्तरला, ""हो ना, तुझ्या कुत्र्याला पोहताच येत नाही!''
ही एक काल्पनिक गोष्ट आहे, परंतु आपल्या अवतीभवती अशा नकारात्मक व्यक्ती असतात, तेव्हा आपल्या पूर्ण आयुष्याची दिशाच नकारात्मक बनू शकते. कुणी दूरची व्यक्ती जी आपल्याला अधूनमधून भेटते, ती नकारात्मक असेल तर आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. परंतु, अशी नकारामक व्यक्ती आपल्या जितक्‍या जवळची असेल, तितकी आपली जास्त पीछेहाट होते. उदाहरणार्थ, काही घरांत वडीलधारी मंडळी कुठल्याही नवीन किंवा वेगळ्या कामाबाबत निराशावादी असतात. मुलांना थोडं वेगळं करिअर निवडायचं असेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यांना मागं ओढण्यासाठी हे लोक आटापिटा करतात.
तुम्ही नवीन शर्ट घातला, तर लगेच "जिवलग मित्र' म्हणतो - "रंग थोडा हलका असता तर जास्त बरा दिसला असता.' तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी इंग्रजी बोलायचं ठरवलं की लगेच, "खरं बोलू का? तुझ्या भल्यासाठीच म्हणतोय, हे राहू दे, तुला लोक हसतील', असं तो म्हणेल. तुमच्या मनातली मोठं होण्याची किंवा पैसा कमवायची इच्छा बोलून दाखविली, की "हे सगळं आपल्यासारख्यांसाठी नसतं रे बाबा, उगाच जास्त उडू नको, आहे तेही गमावून बसशील...' अशा अनेक रूपांत ही नकारात्मक मंडळी आपल्याभोवती सहजपणे जाळं विणत असतात.

हे लोक वाईट असतात काय? नाही. परंतु, त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित आणि नकारात्मक असतो. या लोकांनी कुठल्याही त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःभोवती "शक्‍य नाही' या नावाचं कवच पांघरून ठेवलेलं असतं. त्यांच्या या संकुचित वृत्तीमुळे एक तर ते तुम्हालाही काल्पनिक त्रासाच्या आणि अपयशाच्या कथित दानवापासून वाचवू इच्छितात, किंवा "जे मी करू शकत नाही ते दुसरे कुणी कसे करू शकते?' या वृत्तीमुळे दुसऱ्यांनाही कुठली मोठी स्वप्नं पाहण्यापासून ते परावृत्त करतात. या व्यक्ती आपल्या इतक्‍या जवळच्या असतात की आपल्याला त्यांच्या सल्ल्याबाबत शंका येत नाही आणि ते आपल्या भल्यासाठीच म्हणत असतील अशा सापळ्यात आपण अडकतो.

आपल्याला काही वेगळं करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या आसपासच्या या "प्रेमळ', परंतु नकारात्मक व्यक्तींना ओळखा आणि त्यांच्याशी कुठल्याही वेगळ्या विषयावर बोलू नका. त्यानंतर योग्य व्यक्ती शोधा, जिनं जग पाहिलं आहे आणि जिचा प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेवर विश्वास आहे. अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेनं वाटचाल करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com