हा जय नावाचा इतिहास नाही!

डॉ. शंतनु अभ्यंकर
Friday, 15 January 2021

प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर विज्ञानाशी थेट संपर्क येतो तो आरोग्य विज्ञानामार्फत. एकवेळ एकाही रसायनतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय किंवा अवकाश शास्त्रज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही सुखाने जगू शकता; पण एकाही डॉक्‍टरच्या मदतीशिवाय तुम्ही मरणं; जरा अवघडच आहे. सॉरी हं. वरच्या वाक्‍यात जरा गफलत झाली बहुतेक. पण भावना पोहोचल्या असतील. असो.

प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर विज्ञानाशी थेट संपर्क येतो तो आरोग्य विज्ञानामार्फत. एकवेळ एकाही रसायनतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय किंवा अवकाश शास्त्रज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही सुखाने जगू शकता; पण एकाही डॉक्‍टरच्या मदतीशिवाय तुम्ही मरणं; जरा अवघडच आहे. सॉरी हं. वरच्या वाक्‍यात जरा गफलत झाली बहुतेक. पण भावना पोहोचल्या असतील. असो. 

कोविडने अनेक रहस्ये सर्वसामान्यांसमोर प्रकट केली. यातून आरोग्यविज्ञानातील अनिश्‍चितता, संशोधनातील वेळखाऊ, किचकट प्रक्रिया; या साऱ्याची जाण नाही तरी जाणीव नक्कीच उत्पन्न झाली. वैद्यकशास्त्र आणि विज्ञान जितकं नित्यनूतन असतं तितकंच ते अनित्यही असतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विज्ञानाकडे ठाम उत्तरे असतातच असं नाही. हेच पहा ना, हा विषाणू नैसर्गिक का मानवनिर्मित? ह्याही कोड्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. साथीचे आजार कसे आणि कितपत पसरतील, याची भाकिते म्हणजे हवामानाच्या किंवा शेअर मार्केटच्या अंदाजाइतकीच बेभरवशाची, हे लोकांना स्पष्ट दिसलं. विज्ञानातल्या लबाड्या चव्हाट्यावर आल्या. ‘लॅन्सेट’ आणि ‘न्यू इंग्लंड जर्नल’ने मे महिन्यात छापलेल्या शोधनिबंधांतील ‘सर्जिस्फियर’ कंपनीने पुरवलेली आकडेवारी धादांत खोटी आढळली.अनेक शोधनिबंधांत सोयीचा तेवढा युक्तिवाद पुढे करुन मांडल्याचं पुढे आलं. म्हणजे मंडळी शास्त्रज्ञ आहेत का विधीज्ञ, असा प्रश्न निर्माण झाला. यातल्या काही चुका, ज्या गतीने संशोधन झालं, किंवा करावं लागलं; त्या वेगाच्या परिणामी होत्या. पण ही गती आवश्‍यकच होती.त्यामुळेच आपण जगलो -वाचलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविडचे बहुरूपी खेळ
डिसेंबरात आजाराची कुणकुण लागताच जानेवारीत विषाणू माहिती झाला. काही आठवड्यातच त्याची जनुकीय कुंडली मांडली गेली. सार्स-१पेक्षा ह्या सार्स२ चं आपल्या ‘एसीइ-२ रिसेप्टर’वर दसपट प्रेम. हे त्याच्या मनुष्य-स्नेहाचं कोडं फेब्रुवारीतच उलगडलं. मार्चमध्ये प्रसाराची रीती सखोल समजली. एप्रिलपर्यंत सुमारे अडीचशे संभाव्य औषधांपैकी वीसच ध्यानाकर्षक ठरली. पेशंटची संख्या प्रचंड वाढली. पण यामुळे आता मायावी कोविडचे विविध बहुरूपी खेळ परिचित झाले. याच दरम्यान, एकीकडे अफवांशी, कारस्थानांच्या आरोपांशी लढता लढता ‘रॅट’ आणि ‘पिसीआर’ तपासण्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या गेल्या. लस तर विद्युतवेगाने आली. नव्या तंत्राचा, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा, चपल संपर्कगतीचा हा सुपरिणाम.

मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यावर लसीची सामर्थ्ये नि मर्यादाही पुढे येतील. तशीच वेळ आली तर लस माघारीही बोलवावी लागेल. आधुनिक वैद्यकीने उपयोगात आणलेली अनेक औषधे कालांतराने बाजारातून मागे घेतली जातात. वापर होत असताना दुष्परिणामांवर नजर ठेवणारी यंत्रणा आधुनिक वैद्यकीने उभारलेली आहे.ती सक्षम आहे याचं हे द्योतक. म्हणजे एखाद्या उपचार पद्धतीसाठी अशी यंत्रणा नसेल तर काय होईल, याचा विचार करा.

शेवटी विज्ञान म्हणजे कोणत्याही कार्यकारणभावाचा आधी काही अंदाज बांधायचा आणि मग तो अंदाज बरोबर आहे का हे तपासत बसायचं; असा मामला आहे. अंदाज चुकला तर ते कारण बाद करुन पुन्हा नव्यानं अंदाज बांधायचा. हे अंदाज बरेचदा काहीच्या काहीच असतात. निदान ते बरोबर आहेत, हे सिद्ध होईपर्यंत, सुरवातीला तरी ते तसे वाटतात. त्यामुळे विज्ञानामध्ये विक्रमादित्यांइतकाच चक्रमादित्यांचा सुळसुळाट फार. या चक्रमादित्यातलेच काही उद्याचे विज्ञान-आदित्य म्हणून तळपतात हेही खरंच. त्यामुळे नव्यानव्या, (बहुधा चक्रम) कल्पना मांडणाऱ्यांना कितपत गांभीर्याने घ्यायचं हा एक प्रश्नच आहे. विलियम हार्वेची रक्ताभिसरणाची कल्पना, सेमेलवाईसचे पेशंट तपासण्यापूर्वी हात धुवा हे सांगणे वगैरे सुरवातीला चक्रमच ठरवलं गेलं होतं. पण म्हणून प्रत्येक चक्रम काही उद्याचा हार्वे ठरत नाही!! थोडक्‍यात उद्याचे(ही) चक्रम आणि उद्याचे हार्वे यांच्यातला भेद आज ओळखणे अवघड असते. म्हणूनच कोणत्याही नव्या-जुन्या औषध-कल्पनांचे स्वागत करताना त्यामागील शास्त्र-तथ्य नीट तपासून घ्यावं लागतं.

आयते कोलित
तपासण्याची ही क्रिया दमवणारी असते. कल्पना करा, एखादा परग्रहवासी तुमच्या स्वयंपाकघरात आला आहे. तेथील अनेक पदार्थांमधून सर्वात खारट चव कशानी निर्माण होते,हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. तिथल्या सतराशे साठ डबे-बाटल्यांमधून, नेमका सर्वात खारट पदार्थ शोधण्यासाठी, त्याला आधी ते सगळे तपासावे लागतील. मग १७५९ अंदाजांवर काट मारावी लागेल, तेवढे पराभव पचवावे लागतील, तेव्हा कुठे त्याला मिठाचा शोध लागेल. औषध संशोधन म्हणजे असंच काहीसं आहे. अनेक पराभव झेलल्याशिवाय यश म्हणावं असं काही हाती लागत नाही. त्यामुळे अंदाज, मग तो तपासणं आणि मग बहुतेकदा तो चुकणं, हे विज्ञानाला चुकत नाही. बरेचसे अंदाज चुकणं आणि काहीच बरोबर येणं, हे स्वाभाविक आहे.

क्‍लोरोक्वीन, रेमडेसिव्हीर वगैरे बद्दलच्या वैज्ञानिक कोलांट्याउड्या पाहून सामान्य माणसाने दाहीच्या दाही बोटं तोंडात घातली. काही असामान्यांना आधुनिक वैद्यकीला हिणवायला आयतंच कोलीत मिळालं. पण खरं सांगायचं तर हीच विज्ञानाची कार्यपद्धती आहे. अडखळत, ठेचकाळत, विज्ञानाचा प्रवास सुरू असतो. एरवी त्याची जाहीर चर्चा होत नाही, आता झाली, इतकाच फरक. उपचाराबाबतच्या शिफारसी सतत बदलत आहेत, म्हणजे डॉक्‍टर गोंधळलेले आहेत असे नसून, माहितीच्या पूरातून भोवरे, धार आणि खडक टाळत ते नवा मार्ग निर्माण करत आहेत. विज्ञानाबद्दलची सामान्य समज, ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, अशा छापाची असते. एकापाठोपाठ एक शोध लागत गेले. अवैज्ञानिक कल्पनांचा पराभव झाला. अज्ञानी, मूढ, प्रतिभाशून्य पक्ष हरला. ज्ञानवंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत पक्षाचा विजय झाला. एकएक गड सर होत गेला. विज्ञानाचा जरीपटका बुरुजावर डौलाने फडकू लागला! इत्यादी.. इत्यादी.. प्रत्यक्षात हा जय नावाचा इतिहास नाही!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Shantanu Abhyankar Writes about Health