बौद्ध धर्मांतराची फलश्रुती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी नवबौद्ध झाले आणि परिवर्तनाची लाट उसळली. सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागण्याला आरंभ झाला. जुने टाकून देण्याचे प्रयोग सुरू झाले.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal

- डॉ. सुशांत चिमणकर

धम्मचक्र प्रवर्तनदिनी लाखो अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. ही परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकार केल्यानंतर अव्याहत सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी नवबौद्ध झाले आणि परिवर्तनाची लाट उसळली. सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागण्याला आरंभ झाला. जुने टाकून देण्याचे प्रयोग सुरू झाले. शिक्षणाला महत्त्व मिळाल्याने सरकार दरबारी नोकऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. त्यांच्यातील न्यूनगंडाची व हीनत्वाची भावना नष्ट झाली. सर्व आघाड्यांवर हा समाज पुढे गेला, हेच धर्मांतराचे फलित.

दलित पँथरसारखी संघटना केवळ बौद्ध समाजातील तरुण, विद्वान आणि बंडखोर साहित्यिक-कवींची होती, हे लक्षात घेतले तर बौद्ध समाजातील उन्नती आणि त्यातील नवोन्मेष निदर्शनास येतो. या समाजाला कायद्याचा पाठिंबा असल्याने कुणीही जातिवाचक शिवी दिली किंवा त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याने कडक शिक्षा अवलंबली आहे.

राखीव जागांमुळे हक्क मिळवून घेण्याची प्रवृत्ती या समाजाने स्वीकारल्याने त्यांच्यात आत्मविश्वासाचे तेज झळकत आहे. हा सारा धर्मांतराचा परिणाम. दलितांच्या इतर जातींनाही सवलतीचा फायदा मिळाला. त्यांनाही सवलती उपलब्ध झाल्या; परंतु बौद्धांचा स्वाभिमान आणि इतर दलितांचा स्वाभिमान यात मूलतः फरक आहे. तो धर्मांतराचा परिणाम नव्हे काय? ही गतिमानता निश्चितच धर्मांतराची आहे.

बाबासाहेबांच्या विचारांनी भारावलेली ही धर्मांतरित मंडळी काही अंशी व्यक्तीनिष्ठेच्या आहारी जातही असेल; परंतु त्या व्यक्तिनिष्ठा तपासल्या म्हणजे त्या डोळस आणि स्वाभिमानाची कास धरणाऱ्या आहेत, हे विसरून चालणार नाही. धर्मांतराने बौद्ध समाजाला नव्या चैतन्याची दिशा दिली. त्यांच्यातील स्वाभिमान उंचावला. त्यांना गुलामीत राहून जीवन जगणे नकोसे झाले.

आपण माणसासारखी माणसं आहोत, आपण आपले राजकीय, सामाजिक हक्क झगडून मिळवू, ही आत्मविश्वासाची आणि आत्मतेजाची झळाळी बौद्ध समाजात धर्मांतरानंतर निश्चितच झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तव्याने आणि तत्त्वविचाराने या हीन-दीन समाजाला जाण आली. दगडात पडलेला समाज चैतन्यमय झाला.

बाबासाहेबांनी सांगितलेले विचार तो हृदयातील कप्प्यात साठवू लागला. त्यांनी दिलेले संदेश तो तंतोतंत पाळू लागला. ज्यांच्यासाठी शिक्षणाची दारे बंद होती तोच समाज शिक्षणासाठी विद्यालये-महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या वर्गावर्गातून दिसू लागला. ही आत्मतेजाची चळवळ दलित समाजात प्रभावीपणे पुढे आली. त्याला फार मोठे कारण धर्मांतराचे आहे.

कारण जी संस्कृती आम्हाला दूर ठेवते, जी संस्कृती आम्हाला गुलामगिरीत राहण्याचे सांगते ती संस्कृतीच नाकारली पाहिजे. आमचा नवा धम्म बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. तो धम्म म्हणजे बुद्ध धम्म होय. त्या धम्माचे आम्ही पाईक आहोत. सर्वच पातळ्यांवरून आंबेडकरी विचारांनी भारावलेली ही मंडळी सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहू लागली.

समाजक्रांतीची दिशा

हजारो वर्षांपासून एका विशिष्ट वर्गाने कोंडून ठेवलेले ज्ञान बाबासाहेबांनी मुक्त केले. ही मंडळी शाळा-महाविद्यालयांतून शिकू लागली. त्याचा परिणाम येथील समाजव्यवस्थेवर झाला. धर्मांतरानंतरची ही पिढी बोलकी आणि लिहिती झाली. आज दलित साहित्याच्या रूपाने या मंडळींनी प्रस्थापित ज्ञानी पुरुषांना आव्हान देऊन ज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेतली.

इतर दलितांपेक्षा आज बौद्ध समाजातील तरुण स्वाभिमानाने जयभीम म्हणतो व ठणकावून बौद्ध असल्याचे सांगतो. काही लाचार होऊन किंवा सवलतीपोटी महार म्हणून सांगतही असतील; तेवढा अपवाद वगळावा. परंतु आम्हाला सवलती नसल्या तरी चालतील; पण आम्ही बौद्ध आहोत, असे म्हणणारे कमी नाहीत. बौद्धांमध्ये अस्मितेची जाणीव निर्माण होणे, ही समाजक्रांती नव्हे का?

देश-विदेशातून अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. ठिकठिकाणाहून लहान-मोठ्या असंख्य वाटा दीक्षाभूमीकडे धावतात; पण बाबासाहेबांच्या विचारांमागे जाणारी वाट दीक्षाभूमीतून जन्माला येताना दिसत नाही. सदर बाब बौद्ध तरुणांचे वर्तन स्पष्ट करणारी आहे. कारण बाबासाहेबांविषयीची श्रद्धा डोळस आणि विज्ञाननिष्ठ असायला पाहिजे.अन्यथा त्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.

बाबासाहेबांच्या विचारांशी आणि त्यांना अभिप्रेत असणाऱ्या धम्माशी असा प्रयोग जर होऊ लागला तर तो निंद्य आहे, असेच म्हणावे लागेल. बाबासाहेबांना महापुरुषांना ईश्वरी अवतार मानून त्यांची पूजा करणे मान्य नव्हते. व्यक्तिपूजेतून अंधश्रद्धा व भाबडेपणा जोपासण्याचे अनुकरण होते, ते तरुण पिढीने कटाक्षाने टाळले पाहिजे. अजूनही भारतात धर्मात आणि राजकारणातही मूर्तिपूजा आहे.

म्हणूनच बौद्ध तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे की, आपली भक्ती, श्रद्धा जर डोळस नसेल आणि अंधानुकरणाने होत असेल तर इतर देवदेवतांप्रमाणे बाबासाहेबसुद्धा एक बौद्धातील देव होतील आणि इतर अवतार मालिकेतील तेसुद्धा एक अवतार होतील. म्हणून या गोष्टीचा विचार तरुणांनी केला पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे हा एक नवा मार्ग आपणास मिळाला. आपण त्या स्वतंत्र जीवनाचे धनी झालो.

बौद्ध धम्माच्या खऱ्या श्रद्धा जोपर्यंत उमगणार नाही तोपर्यंत आपण या मानसिकतेतून सुटणार नाही हे निश्चित. ज्या दिवशी बौद्ध धम्माच्या अनुषंगाने बाबासाहेबांना अभिप्रेत मानसिकता आमच्यात येईल त्या दिवशी समाजातील विषमता व पोटजातीभेदाचे निर्मूलन होईल. बौद्ध समाज कुशल, नीतिमान, देवभोळा नसलेला, बुद्धिप्रामाण्यवादी पाहावयास मिळेल त्या दिवशी आंबेडकरांचे खरेखुरे अनुयायी म्हणून घेण्यास आम्ही सिद्ध होऊ.

(लेखक पीडब्ल्यूएस कॉलेज, नागपूर येथे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com