शाश्‍वत विकासासाठी ‘जल स्थापत्य’

सम्राट कदम
मंगळवार, 30 जून 2020

नेहरूंनी, ‘आधुनिक भारताचा पाया,’ असा उल्लेख केलेल्या भाक्रानानगल प्रकल्पापासून मुंबईतील प्रस्तावित ट्रान्स हार्बर लिंकपर्यंत सर्व जलीय आस्थापनांचे आराखडे तपासले आणि परिपूर्ण केले ते याच संस्थेने.

जलीय स्थापत्य अभियांत्रिकीचे संशोधन करणारी दक्षिण आशियातील एकमेव आणि जगातील जुन्या संस्थांपैकी एक म्हणजे पुण्याजवळील खडकवासलास्थित केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस). नेहरूंनी, ‘आधुनिक भारताचा पाया,’ असा उल्लेख केलेल्या भाक्रानानगल प्रकल्पापासून मुंबईतील प्रस्तावित ट्रान्स हार्बर लिंकपर्यंत सर्व जलीय आस्थापनांचे आराखडे तपासले आणि परिपूर्ण केले ते याच संस्थेने. राष्ट्रनिर्माणात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या संस्थेच्या संचालक डॉ. वर्षा भोसेकर यांच्याशी साधलेला संवाद... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रश्‍न - देशाच्या आवश्‍यकतेनुसार आपल्या संस्थेच्या कामात बदल कसा होत गेला? सध्या कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांवर काम चालू आहे? 
डॉ. भोसेकर - बॉम्बे प्रेसिडेन्सीत १९१६ मध्ये सुरू झालेला ‘विशेष सिंचन कक्ष’ आज केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था या नावाने ओळखला जात आहे. संस्थेच्या नावाबरोबरच तिचे कार्यक्षेत्र आणि संशोधनाची व्याप्तीही वाढत गेली. नदी आणि समुद्राशी निगडित प्रमुख सात विभागांमध्ये संशोधन आणि विकासाची कामे चालतात. सुमारे १०४ वर्षांतील सातत्यपूर्ण संशोधन आणि शास्त्रज्ञांपासून कर्मचाऱ्यांपर्यतच्या समर्पण वृत्तीमुळे आमच्याकडे सुविधांबरोबरच अनुभवांचा आणि माहितीचा खजिना आहे. नदीवरील सिंचन आणि विद्युतनिर्मिती प्रकल्पापासून समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या बंदरांच्या बांधणीपर्यंतच्या कामांत आमचा थेट सहभाग असतो. सध्या ईशान्य भारतातील विविध प्रकल्प, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प (ड्रीप) अशा शाश्‍वत विकासासाठी महत्त्वपूर्ण दिशा देणाऱ्या प्रकल्पांवर आम्ही काम करत आहोत. केंद्रीय नोडल संस्था असल्याने राज्यांना लागणारे प्रशिक्षण, पाहणी आणि उपाययोजनासंबंधी सर्व सहकार्य आम्ही देतो. 

डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला सध्या आहे. शंभर वर्षे जुन्या या संस्थेने हे कौशल्य किती प्रमाणात आत्मसात केले आहे? 
 - देशातील बहुतेक सर्व नद्यांवरील मोठी धरणे आणि समुद्रकिनाऱ्यावरील बंदरांची ती बांधल्यापासूनची सर्व माहिती आमच्याकडे आहे. सुरुवातीच्या काळात उपलब्ध साधनांच्या आधारे प्रत्यक्ष मॉडेल आणि गणितीय सिद्धांताच्या आधारे धरणे, बंदरे आणि तत्सम जलीय आस्थापनांचे अभ्यास येथे करण्यात आला. काळानुसार आम्हीही आधुनिक झालो असून, आता संगणकीय आणि भौतिकी दोन्ही पद्धतीने मॉडेलचा अभ्यास करण्यात येतो. सध्या आम्ही ‘हायब्रीड’ म्हणजेच दोन्ही पद्धतीने अध्ययन आणि निष्कर्ष काढत आहोत. त्यासाठी आवश्‍यक त्या कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पर्यायाने अधिक अचूकपणे आम्ही निष्कर्षापर्यंत पोचतो. भविष्याच्या दृष्टीने आवश्‍यक ते सर्व डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आम्ही सुरू केला आहे. 

 संशोधन संस्था म्हटल्यावर कुशाग्र संशोधक आणि कुशल मनुष्यबळ यांची आवश्‍यकता असते. याबाबत संस्थेची स्थिती काय आहे आणि भविष्यात काय परिस्थिती असेल? 
 - जल संशोधन क्षेत्रातील दिग्गज लोकांचे सान्निध्य संस्थेला लाभले आहे. माझी सुरुवातही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. सातत्याने नवे काही करण्याची जिद्द आणि समर्पणाची भावना यामुळे आम्ही आव्हानात्मक कामे सहजगत्या पूर्ण केली आहेत. एकाच विभागात तीसपेक्षाही जास्त वर्षे काम करणारे शास्त्रज्ञ आणि कर्मचारी येथे आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाबरोबरच त्यांचे कौशल्यही येणारी पिढी आत्मसात करते. इथे प्रत्येकाला पदव्युत्तर आणि पीएच.डी. करण्याचा आग्रह धरला जातो. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह पुण्यातील इतर संस्थांशी आमचा संपर्क आहे. तसेच नवसंशोधकांसाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आवश्‍यक ते ज्ञान आणि कौशल्य मिळविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. 

राष्ट्रनिर्माणामध्ये ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची स्वातंत्र्याच्या आधीपासूनच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शाश्‍वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या आव्हानांकडे तुम्ही कसे पाहता? 
 - देशातील एक नोबल, निरंकुश आणि स्वायत्त संस्था म्हणून आमची ओळख आहे. पर्यावरण संवर्धनाच्या आड येणारे प्रकल्प आणि जीवसृष्टीला कोणताही धोका पोहचेल असा अहवाल कोणत्याही दबावाखाली आम्ही देत नाही. संपूर्णत- शास्त्रीय आधारावर आणि पर्यावरणाचे हित लक्षात घेऊनच वस्तुस्थितीवर आधारित अहवाल दिला जातो. ब्रह्मपुत्रासह इतर नद्यांवरील बांधकामासंदर्भातील मॉडेल आणि सिम्युलेशन, सागरी किनाऱ्यांवर नव्याने होणारी बंदरे, नद्यांमधील वाहतूक, सागरमाला प्रकल्प, जुन्या धरणांची पुनर्बांधणी आदी असंख्य राष्ट्रनिर्माणातील प्रकल्पांसंबंधीच्या कामांची गती, हवामानबदल आणि पर्यावरणासंबंधीची क्‍लिष्टता आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. भविष्यातही आजवरच्या कामगिरीपेक्षा तसूभर जास्तच ठरेल, अशी कामे आमची संस्था करेल, यात शंका नाही. 

सम्राट कदम  namastesamrat@gmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr varsha bhosekar interview