‘ठिबक सिंचन’ (परिमळ)

डॉ. सिसिलिया कार्व्हालो
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

‘तुझ्यावर सतत रक्त ठिबकत राहील’, असा पृथ्वीला शाप आहे काय? त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे? तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय? मग साऱ्या पृथ्वीतलावर रक्ताच्या चिळकांड्या उडताना का दिसताहेत?
दे

‘तुझ्यावर सतत रक्त ठिबकत राहील’, असा पृथ्वीला शाप आहे काय? त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे? तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय? मग साऱ्या पृथ्वीतलावर रक्ताच्या चिळकांड्या उडताना का दिसताहेत?
दे

शाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर जागता पहारा ठेवणाऱ्या जवानांचा त्याग असीम आहे. जेथे वाणी मुकी व्हावी, अन्‌ डोळ्यांतले अश्रूही सुकून जावेत अशी दृश्‍ये अन्‌ घटना-प्रसंग पाहायला, ऐकायला मिळताहेत. बर्फात गाडले जाणारे जवान पाहून थंडीचा एक टोकदार काटा उरात खुपला होता... तो निघतो की नाही तोच ‘उरी’तील जवानांवर घातलेला घाला उरावर घाव घालून गेला होता. रक्ताची चिळकांडी आपल्याच उरातून बाहेर पडल्याचा भास झाला होता...

‘जालियनवाला बाग’ कवितेत कविवर्य कुसुमाग्रज ख्रिस्ताचे क्रुसावरचे ओघळ ओले असतानाच, इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडासंदर्भात म्हणतात,

पाचोळ्यापरि पडली पाहून प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन्‌ नवीन, येशू तुझ्या काळजात..

क्षमतेचा आणि करुणेचा संदेश ख्रिस्ताने दिला. तरीही इंग्रजांनी जालियनवाला बाग रक्तरंजीत करून टाकली. तेव्हा येशूच्या हाता-पायांत अन्‌ कुशीत तर जखमा झालेल्या/केलेल्या होत्याच. परंतु, जालियनवाला बागेतली एक चिळकांडी ख्रिस्ताच्या शरीरावर उडून त्याच्या काळजात एक नवीन जखम झाली, तर मानवजातीला कलंक फासणारी जखम आहे. 

नौखालीमध्ये हत्याकांड झाले, त्यावर रामानंद सागर यांनी ‘और इन्सान मर गया’ अशी कादंबरी लिहून ‘माणसातली माणुसकी मरण पावलीय आणि त्याच्यातील पशू जागृत झालाय,’ असे म्हटले होते. त्या काळी, त्या स्थळी ही पृथ्वी रक्ताने किती कशी भिजली असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. इतिहासातील ही रक्ताने भिजलेली पाने अजूनही वाळलेली नाहीत. त्यावरील व वास्तवातील घटनांवरील साहित्य वाचताना हृदयाच्या चिंधड्या उडतात आणि उरतात त्याही चिंधड्याच! 

नारायण सुमंत यांची ‘ऊठ माणसा’ नावाची कविता आठवते.

ना राम येथला मेला, ना रहीम येथला मेला
जगताचे पुसुनि डोळे, कबिराचा निथळे शेला
हा पाहुनी नरसंहार, तो प्रेषित झुकवी माथा
या आसवांत ना तरली, तुकयाची अभंगगाथा!

असं वाटतं, की पृथ्वीच्या पाठीवरून वाहणाऱ्या साऱ्या नद्या अन्‌ पृथ्वीच्या पोटात दडलेला समुद्र अन्‌ आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा हे सारे निसर्गाचे अश्रू तर नव्हेत, ही छिन्नभिन्न झालेली मानवता पाहून? हे ‘ठिबक सिंचन’ मानवतेला मानवणारे कसे असेल?

Web Title: drip irrigation