सुविचारांचा कृत्रिम पाऊस (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

अखेर पुढच्या दोन-अडीच महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग अपेक्षेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वांत आधी फुंकून बाजी मारली आहे! देशातील पाच राज्यांत या निवडणुका होत असल्या, तरी केवळ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेशची नवाबी कोण हासिल करतो, याकडे लागले आहे आणि या राज्यांत दारिद्य्ररेषेखाली असलेल्या 29.4 टक्‍के जनतेलाच त्यामुळे पंतप्रधानांनी लक्ष्य केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या दोन दिवस चाललेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यामुळेच त्यांनी या गोरगरीब जनतेच्या भावनांना हात घालत सुविचारांची तुफानी बरसात केली.

अखेर पुढच्या दोन-अडीच महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग अपेक्षेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वांत आधी फुंकून बाजी मारली आहे! देशातील पाच राज्यांत या निवडणुका होत असल्या, तरी केवळ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेशची नवाबी कोण हासिल करतो, याकडे लागले आहे आणि या राज्यांत दारिद्य्ररेषेखाली असलेल्या 29.4 टक्‍के जनतेलाच त्यामुळे पंतप्रधानांनी लक्ष्य केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या दोन दिवस चाललेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यामुळेच त्यांनी या गोरगरीब जनतेच्या भावनांना हात घालत सुविचारांची तुफानी बरसात केली. गतवर्षाच्या अखेरच्या पर्वात मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन मोठे निर्णय सरकारने घेतले होते. एक अर्थातच हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा होता आणि दुसरा पाकिस्तानवर "लक्ष्यभेदी हल्ला' करण्याचा. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइकनंतर संपूर्ण देशात उभे राहिलेले उत्साहाचे वातावरण नोटबंदीच्या निर्णयामुळे पुरते मावळून गेले. मात्र "अनेक हालअपेष्टा सहन करूनही देशातील गोरगरीब जनता ही या निर्णयाच्या पाठीशीच आहे,' असा खणखणीत दावा मोदी यांनी या बैठकीत आपल्या नेहमीच्या शैलीत केला. "नोटबंदी हे एक पवित्र कृत्य आहे!' असा मुलामा या निर्णयाला चढविताना, त्यामुळे देशात "निर्मल अर्थव्यवस्था' उभी राहील, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर "राजकीय पक्षांकडे इतके पैसे कोठून येतात, ते जाणून घेण्याचा जनतेला हक्‍क आहे,' असे सांगून दणदणीत टाळ्याही घेतल्या! तसाच हक्‍क जनतेला, मोदी यांनी 2014 मधील निवडणुकीत आपल्या काही हजार कोटींच्या प्रचारमोहिमेसाठी पैसा कोठून आणला, हे जाणून घेण्याचाही आहे. त्याबाबत मात्र भाजपची मिठाची गुळणी आहे! शिवाय, भाजप नेत्यांनी आपल्या नात्यागोत्यात उमेदवारी मागू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या आवाहनाचे प्रत्यंतर आता तिकिटवाटपात नेमके किती दिसते, हे पाहावे लागेल. देशातील अर्धशिक्षित, तसेच भावनांच्या जाळ्यात सदैव गुंतून पडणारी जनता या अशा सुविचारांमुळे खूश झाली नसेल, तरच नवल! 
मोदी यांची ही सारी भाषा म्हणजे एका अर्थाने 1971च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी वापरलेल्या भाषेची नक्‍कल होतीच, त्याचबरोबर मोदींच्या संधिसाधू वृत्तीचे दर्शनही त्यातून पुरेपूर घडले. श्रीमती गांधींनी 1971 मध्ये गरीब विरुद्ध श्रीमंत अशी दरी "विरोधक कहते है इंदिरा हटाव; मैं कहती हूँ गरिबी हटाव!' या भाषेत उभी केली होती. त्याच उद्‌गारांचा थेट वापर मोदी यांनी गेल्याच आठवड्यात "वो कहते है मोदी हटाव; मैं कहता हूँ काला धन हटाव!' असा केला होता. कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि देशातील गोरगरिबांना आम्ही लक्ष्य केले असले, तरी त्यांचा वापर "मतपेढी' म्हणून आम्ही कधीच करणार नाही, असे स्पष्ट केले! मोदी यांचे कार्यकारिणीतील हे भाषण म्हणजे थेट निवडणूक प्रचारसभेतील भाषणच होते आणि घराघरांत घुसलेल्या शेकडो टीव्ही चॅनेल्समुळे ते आता थेट मतदारांपर्यंत जाऊन पोचू शकते, हे लक्षात आल्यामुळेच पंतप्रधानांनी हा असा एकाच वेळी आक्रमक, तर दुसऱ्या बाजूला जनतेच्या भावनांना हात घालणारा पवित्रा घेतला. मात्र या निमित्ताने मोदी हे नवी मांडणी करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. भाजप हा धर्माच्या आधारावर जनतेत फूट पाडून आजवर मतांची बेगमी करत आलेला पक्ष आहे. मोदी सत्तेवर आल्यावर "राष्ट्रभक्‍त विरुद्ध राष्ट्रदोही' अशी दुही माजविण्यात आली. मोदी यांच्या नव्या मांडणीनुसार आता "गरीब विरुद्ध श्रीमंत' अशी नवी फूट देशात यामुळे पडू शकते. त्याचबरोबर "कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा दुराग्रहही सुरूच आहे आणि नोकरशहांच्या हाती वारेमाप अधिकार आले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी "किमान सरकार; कमाल कारभार!' अशी भाजपची घोषणा होती. सत्तेवर आल्यानंतर मात्र एकीकडे गरिबांचे फक्‍त आपणच कनवाळू असा देखावा उभा करत मोदी यांनी सरकारची भूमिका सतत वाढवित नेलेली दिसते. उदारीकरणाच्या तत्त्वाशी हे सुसंगत आहे काय, असा प्रश्‍न नक्कीच यामुळे निर्माण होतो. 1991 नंतर खुल्या झालेल्या अर्थव्यवस्थेची चाके उलटी फिरविण्याचा हा प्रकार आहे. 
कार्यकारिणीच्या या बैठकीस लालकृष्ण अडवानी यांच्यापासून भाजपचे सारे बडे नेते आणि विद्यमान तसेच या पाच राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेले सारे नेते उपस्थित होते. अडवानी हे दीप-प्रज्वलनानंतर व्यासपीठावर खाली उतरू पाहत होते; पण त्यांना आग्रहाने थांबवून घ्यावे लागले! अर्थात, अडवानी आता प्रचारातही नसणार; पण बाकी सारे नेते आता मोदी यांच्याच सुरांत सूर मिळवत, त्यांच्याच या भाषणाची री ओढणार, यात शंका नाही. एकंदरीत मोदी यांच्या या भाषणामुळे 2017 च्या प्रचारमोहिमेचा अजेंडाच निश्‍चित झाला आहे. आता मोदी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे देणारीच विरोधकांची भाषणे आपल्याला ऐकावी लागतील. मोदी यांचे या भाषणातील अनेक उद्‌गार हे घरातील तुळयांवर लिहून ठेवण्याजोगे आहेतच; पण ते वास्तवात कधी येणार का, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे.  

 
 

Web Title: Editorial