दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी...

डॉ. किरण रणदिवे (बुरशीशास्त्र अभ्यासक)
शनिवार, 20 मे 2017

पर्यावरणात बुरशीचे अनन्यसाधारण स्थान असून, काही बुरशींमुळे दुष्काळ हटविण्यासाठीही मदत होऊ शकते. काही प्रकारच्या बुरशी पाणी धरून ठेवतात आणि भूजलाची पातळी वाढवण्यास हातभार लावतात

दुष्काळ म्हटलं की आपल्या मनात काहूर माजतं, अन्‌ आपण विविध दिशांना स्पर्शून विचारविनिमय करू लागतो. मग दुष्काळ हटविण्यासाठी काय करता येईल, जलयुक्त शिवार योजना, पीक घेण्याच्या पद्धतीत बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध विषयांवर चर्चा होते. दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेवरही भर दिला जातो. परंतु, सर्वांच्याच दृष्टिआड असणारी बुरशी हीदेखील दुष्काळ हटविण्यासाठी उपयुक्त ठरते, याबद्दल समाजात अद्यापही अनभिज्ञता असल्याचे दिसते. होय, निसर्गसृष्टीतील अत्यंत दुर्लक्षित घटक असणारी बुरशी दुष्काळावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावू शकते.

पर्यावरणात बुरशीचे अनन्यसाधारण स्थान असून, काही बुरशींमुळे दुष्काळ हटविण्यासाठीही मदत होऊ शकते. काही प्रकारच्या बुरशी पाणी धरून ठेवतात आणि भूजलाची पातळी वाढवण्यास हातभार लावतात. "अर्मिलारिया बलबोसा' ही बुरशीची प्रजाती 30 एकर क्षेत्रापर्यंत पसरते आणि पाणी धरून ठेवण्यास मदत करते. या प्रकारच्या बुरशीच्या प्रजाती दुष्काळी भागात वाढवल्या, तर भूजल पातळी वाढू शकते. झाडाच्या मुळांना बुरशीच्या जलधारक कवकतंतूंद्वारे पाणी मिळू शकते. इतकेच नव्हे तर पिकांची जोमदार वाढ होण्यासही मदत होते. काही बुरशींचे कवकतंतू झाडांना पोषक खते पुरवतात.

दुष्काळाच्या समस्येचा विचार केल्यास आपण त्याच्या आरंभ बिंदूपाशी येऊन पोचतो आणि तो म्हणजे निसर्ग. निसर्गानं सर्व गोष्टी मुक्त हस्ते दिल्या असल्या, तरी त्या सांभाळण्याची आपली कुवत काही अंशी कमी झाल्याचं मानायला हरकत नाही. याचं कारण म्हणजे आपण निसर्गाला गृहीत धरत आहोत. उन्हाळ्यात अनेकदा गवत किंवा डोंगरात आग लावली जाते, त्यामुळं तेथील निसर्गचक्र बिघडतं आणि यातून बरेच जीव नामशेष होण्याचा धोका निर्माण होतो. या सगळ्यात प्रामुख्याने बळी जातो तो नवीन रुजणाऱ्या बियांचा आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या बुरशीचा. बहुतांश वनस्पतींच्या मुळाशी बऱ्याचदा उपयोगी बुरशींचं कवकजाल असते आणि ते वनस्पतींना बऱ्याच रोगांपासून वाचवते. या वनस्पती पेटवून दिल्यामुळं त्यांच्या मुळाशी असणाऱ्या बुरशी आणि इतर उपयुक्त सूक्ष्मजीवही जळून जातात.

वनस्पतींची राख जमिनीत मिसळल्यावर जमीन जास्त सुपीक होत असली तरी हे कृत्य बऱ्याच अंशी घातक ठरत आहे. हल्ली संपूर्ण महाराष्ट्रात 60 ते 75 टक्के डोंगर हे जाळलेले दिसतात, ही शोकांतिका म्हणावी लागेल. या कृत्याचा दुसरा मोठा तोटा म्हणजे वनस्पती किंवा गवताळ राने जाळल्यानं वाऱ्याबरोबर जमिनीची होणारी प्रचंड धूप सुपीकता कमी करते. गवताची आणि इतर वनस्पतींची मुळं जमिनीची पकड घेऊन मातीची धूप थांबविण्यात मोलाची भर घालतात. काही गवताच्या प्रजातींमध्ये तर मागील वर्षीच्या वाळलेल्या गवतातूनच नवं अंकुर फुटतात. हे गवत किंवा वनस्पती जाळल्यामुळं जमिनीमधील भूजल पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. या सर्व गोष्टी आपल्या आवाक्‍यातील असताना, काही खुळचट कल्पनांमुळे आपण निसर्गाची मोठी हानी करत आहोत. तेव्हा आपण वेळीच सावरायला हवं आणि अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी कायदे कडक करण्याची गरज आहे. बुरशीशास्त्राचा अधिकाधिक अभ्यास झाल्यास दुष्काळाचं सावट दूर करता येईल, यात शंका नाही.

तसे पाहिलं तर बुरशीशास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे. बुरशींची विलक्षण संख्या आणि प्रत्येक बुरशीच्या जीवनचक्रामध्ये माणसासाठी उपयुक्त असणारी रसायनं हे सर्व खरं असलं तरीही संपूर्ण जगभरात माहिती असलेल्या बुरशी किंवा नामकरण केलेल्या बुरशी फक्त 20 टक्के आहेत. डॉ. पॉल कर्क आणि इतर लेखकांनी लिहिलेली बुरशीची डिक्‍शनरी म्हणजे सर्वांत महत्त्वाचा बुरशीग्रंथ आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणं 2008पर्यंत एकूण बुरशींपैकी जगाला केवळ 20 टक्केच माहिती आहेत. "इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर'च्या (आययूसीएन) सर्वेक्षणानुसार जगभरात वीस हजार बुरशी जाती-प्रजाती अतिधोक्‍याच्या यादीत समाविष्ट आहेत. जगाच्या तुलनेत भारतात दुर्दैवानं याबाबतीत काहीही डॉक्‍युमेंटेशन झालेले नाही. भारतात नक्की किती बुरशींची नोंद आहे, याबाबत ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्यानं नक्की किती जातींच्या बुरशी धोक्‍यात आहेत, हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे या सर्व सजीवांकडे यापुढे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक विद्यापीठात बुरशीशास्त्र विषयावर संशोधन करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं किंवा संशोधनासाठी सहकार्य करण्याकरिता केंद्र सरकारने योजना सुरू करणं आवश्‍यक आहे.

Web Title: Editorial