घसघशीत टक्‍क्‍यांचा सांगावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन करतानाच पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या विद्यार्थ्यांना सक्षम कसे करता येईल, हे पाहायला हवे. ही जबाबदारी सरकार, शिक्षण संस्थांबरोबर पालकांचीही आहे.

जून महिना उजाडला की जसे पावसाचे वेध लागतात, त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाचेही! मात्र, या निकालासाठी होणारी राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थ्यांची उलघाल आता संपली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा दहावीचा निकाल हा 88.74 टक्‍के लागला असून, तब्बल साडेचौदा लाख विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील हा एक महत्त्वाचा टप्पा पार केला. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अलीकडे सातत्याने हे दिसत असून, आपल्या एकूण सामाजिक पर्यावरणाचा विचार करता मुलींच्या या कामगिरीचे विशेष कौतुक करायला हवे.

या परीक्षेत 193 गुणवान विद्यार्थी असे निघाले की त्यांनी चक्‍क शंभर टक्‍के गुण मिळवले. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा, त्यांना शिक्षक व पालकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा यात वाटा आहेच, त्याबद्दल या सगळ्यांची पाठ थोपटतानाच गुणांमधली प्रचंड वाढ ही एकूण गुणवत्तावाढीचे निदर्शक आहे काय, याचेही मोकळेपणाने परीक्षण करायला हवे. घसघशीत टक्केवारीची काही कारणे नियमांतील बदलांमध्येही आहेत. कला, क्रीडा यांतील कामगिरीबद्दल वाढीव गुण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षी होणार होती, ती याच वर्षी केली गेली. याशिवाय अलीकडे बोर्डा-बोर्डांमधील स्पर्धेचे प्रतिबिंबही निकालांवर पडलेले दिसते. त्यामुळेच एकूण शैक्षणिक-सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात या निकालाकडे पहायला हवे. दहावीचा टप्पा पार करून पुढे चाललेले विद्यार्थी सामावून घेण्यासाठी सक्षम अशी व्यवस्था आपल्याकडे आहे काय, हा विचार यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा. अकरावीच्या प्रवेशासाठी उडणारी अकटोविकट झुंबड कमी करण्यात सरकारला अपयश येत आहे. विशिष्ट महाविद्यालयांतच प्रवेश हवा, असा पालकांचा आग्रह असतो. परंतु हे शक्‍य होतेच असे नाही. त्यातून विद्यार्थ्यांवरील ताण वाढतो. ठराविक महाविद्यालयांचे कटऑफ फुगलले असतात. ही महाविद्यालये म्हणजे ऐंशी टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मृगजळ ठरते.

दहावीची परीक्षा हा शिक्षणातील केवळ एक टप्पा आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने वळण मिळते, ते बारावीनंतरच. परंतु दहावीच्या परीक्षेचा ताण नववीपासूनच घराघरांतून तयार होतो. खासगी शिकवण्यांचे प्रस्थ त्यातून इतके वाढत गेले आहे, की ते एक "स्टेटस सिम्बॉल'च बनले आहे. या सगळ्यातून परीक्षा तंत्रावर हुकूमत मिळविण्याचा प्रयत्न होतो खरा; आणि त्याचेही प्रत्यंतर निकालात येते. परंतु जीवनातील पुढची आव्हाने पेलण्यासाठी या तंत्राचा कितपत उपयोग होतो? महाराष्ट्रात 1970च्या दशकात अकरावी आणि त्यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ही पद्धत बदलून "10 + 2 + 3' अशी नवी व्यवस्था अमलात आली, तेव्हा त्यामागील उद्देश हा दहावीनंतरच्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळावे, हाच होता. तो सफल झाला नाही आणि विद्यार्थी बारावी करून पुढे डॉक्‍टर-इंजिनिअर आदी ठराविक साच्यातील अभ्यासक्रमांसाठी झगडत राहिले. अशावेळी अन्य अनेक अभ्यासक्रमांची माहिती मिळवून, त्या अनवट वाटेला विद्यार्थ्यांना वळवायला हवे. विद्यार्थ्यांनी मोठी महत्त्वाकांक्षा बाळगणे हा दोष असू शकत नाही. मात्र, अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्याआधी आपला कल नेमका कोणत्या विषयांकडे आहे, हे जाणून घेण्याची पद्धतच आपल्याकडे नाही. अर्थात त्यास पालकवर्गही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. विद्यार्थ्यांची आवड आणि कल याचबरोबर त्यांनी आपली कुवतही जाणून घ्यायला हवी. त्यामुळेच नवी शैक्षणिक व्यवस्था अमलात आणताना व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल कोर्सचा आग्रह तेव्हा धरला गेला होता. त्यास आता पाच दशके उलटली आणि आता देशातील शिक्षणतज्ज्ञ हे पुन्हा एकवार व्यावसायिक अभ्यासक्रमांचा आग्रह धरत आहेत, याकडे लक्ष वेधणे जरुरीचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चाकोरीबद्ध शिक्षणाचा आग्रह दूर सारला तर खरे म्हणजे ते जीवनात अधिक लवकर स्थिर होऊ शकतात, या दृष्टीने विद्यार्थी, पालक आणि मुख्य म्हणजे त्यांचे शिक्षक यांचे समुपदेशन व्हायला हवे.

देशातील बेरोजगारांची वाढणारी संख्या पाहता मोठ्या संख्येने महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करीत असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या संधी निर्माण करणार आहोत, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सरकारला त्या आघाडीवर बरेच काही करावे लागेल. या विद्यार्थ्यांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांचे विविध आघाड्यांवरील कौशल्यवर्धन आवश्‍यक आहे. त्यासाठी त्यांना केवळ नोकरीच नव्हे, तर चांगल्या जीवनाची शाश्‍वती मिळायला हवी. गुणांच्या स्पर्धेत काहीशा मागे पडलेल्या विद्यार्थ्यांनीही आपली जिद्द, उमेद आणि ईर्षा न सोडता दहावीची परीक्षा हा आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतील केवळ एक टप्पा आहे, हे लक्षात घेऊन दडपणावर मात करायला शिकणे जरुरीचे आहे. त्यासाठी पालकांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial