हम को मन की शक्‍ती देना...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

शाळा ही वास्तू आपल्यासाठी कमीत कमी खर्च आणि वेळेत चालवण्यात येणारी प्रयोगशाळा ठरली आहे. प्रयोग करायला काहीच हरकत नाही; पण त्याच्या मुळाशी ठोस शैक्षणिक तत्त्वे आणि उद्दिष्टे हवीत

तब्बल दीड-दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकवार गजबजल्या. नव्या यत्तेत, नव्या वर्गात जायचे ही लहानग्यांच्या आयुष्यातली नि:संशय मोठीच घटना मानायला हवी. नव्या वहीचा वास, नवी पुस्तके, त्यातली अनोखी चित्रे आणि नकाशे आदींचे आकर्षण या काळात मनाचा ठाव मांडते, त्याचवेळी नवा वर्ग, नवे शिक्षक आणि अनोळखी अभ्यासमान याने गोंधळून जायलाही होते. नवाकोरा गणवेष, नवा रेनकोट आणि दप्तर यांचेही नवेपण शाळकरी मन मोहून टाकत असते, त्याचवेळी वाटचाल अधिक कठीण होत चालल्याचा संभ्रमही बावचळून टाकत असतो. हा प्रभाव इतका दांडगा असतो की हा "जून-ज्वर' मुला-मुलींना चढतोच, पण त्याचा अधिक संसर्ग पालकांना होत असतो. बहुतेकदा नोकरदार पालकांच्या करिअरचे वेळापत्रकही मुलांच्या शाळेशी बांधलेले राहाते. शाळा, अभ्यासक्रम, शिकवण्या, अभ्यास या चक्रात मुले गुंतली की रहाटगाडगे खऱ्या अर्थाने सुरू झाले असे समजायचे.

विदर्भ वगळता, महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व शाळा गुरुवारी सुरू झाल्या. विदर्भात शाळेची पहिली घंटा 26 जूनला वाजेल. केंद्रीय विद्यालये तर एक जूनलाच उघडली आहेत. उरता उरलेल्या शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा आता भरल्या. सर्व शाळा एकाच दिवशी सुरू व्हाव्यात, त्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकांतही सुसूत्रता हवी, असे सुविचार आपले शिक्षण खाते अधूनमधून व्यक्‍त करीत असते. पण तसे आजवर कधी घडलेले नाही. मुलांच्या पाठीवरले दप्तराचे ओझे कमी करण्याची कणवयुक्‍त हाकदेखील गेली वर्षानुवर्षे आपण ऐकतो आहोत. तेही अद्याप धडपणी घडलेले नाही. दप्तराचे वजन कमी करण्याच्या नावाखाली काही राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांना टॅब वाटण्याची टामटूम करून घेतली. इंटरनेटच्या माध्यमातून वर्ग घेण्याचे प्रयोगही झाले. पण त्याने दप्तरे घटल्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही.

यंदा तर दरमहा मुलांची दप्तरे तपासून दरमहा 15 तारखेच्या आत त्याचा अहवाल देण्याचे फर्मान निघाले आहे. अर्थात हल्ली मुलांच्या दप्तरात चिंचा-बोरे, चन्यामन्या किंवा आवळे सापडण्याची शक्‍यता कमीच. मोबाईल फोन मात्र सापडू शकतील! पण या चीजवस्तूंना जागाच उरणार नाही, एवढ्या वह्या नि पुस्तके मुलांचे पाठकणे वाकवायला पुरेशी असतात. त्यात चौथी आणि नववीची पुस्तके बदलली असून, त्यांची वेळेत छपाई न झाल्याने नवाच घोळ झाला आहे. ही पुस्तके येत्या आठवडाअखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे सरकारी आश्‍वासन मिळाले असले तरी पालकांची चिंता मात्र वाढीस लागली आहे. आजकाल नववीचे क्‍लासेस नि शिकवण्याही जोरात असतात. भराभरा सिलॅबस संपवून मुलांना नमुना प्रश्‍नपत्रिकांकडे खेचणे हा त्यांचा परिपाठ. पण नवे पुस्तक बाजारातच न आल्याने हे अजून सुरू होऊ शकलेले नाही. मंडळाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने पुस्तकाची वाट बघण्याचे कारण नाही, असे समर्थन शिक्षण विभागाच्या वतीने केले जात असले तरी त्याला मर्यादा आहेत, हेही मान्य करणे भाग आहे.
आम्ही शाळकरी पिढीसाठी किती करतो, हे दाखवण्यात कुठलेही सरकार मागे नसते. पण त्या दाव्यात तथ्य किती, हे आपण सारेच मनोमन जाणतो. यंदाही शिक्षकांच्या मदतीसाठी "मित्रा ऍप' किंवा इंग्रजीच्या समृद्धीकरणासाठी "तेजस' कार्यक्रम, गणिताच्या सुलभीकरणासाठी "भास्कराचार्य' कार्यक्रम अशा चमकदार घोषणा झाल्या आहेत. नावे कितीही गोंडस आणि गोजिरी असली तरी असल्या योजना नि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उडणारा बोजवाराही आपल्या अंगवळणी पडला आहे. कैक पिढ्यांना बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या पोसणारी "बालचित्रवाणी' नुकतीच बंद करण्यात आली. त्याऐवजी पाठ्यपुस्तकात "क्‍यूआर कोड'चा वापर करून "ई-बालभारती' सुरू करण्याची घोषणाही झाली आहे. शालेय शिक्षण डिजिटल तंत्रज्ञानाने सुस्थित होणे, ही काळाची गरज आहे, यात शंका नाही. पण महत्त्व डिजिटल होण्याला आहे, की मुलांच्या बौद्धिक वाढीला हा सवाल आहे.

पुढे अनुभवाला येणाऱ्या अफाट आणि काहीशा निष्ठूर जगाच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे, याचे मूलभूत ज्ञान शाळेत मिळणे अभिप्रेत असते. पुढील ज्ञानाची दालने उघडी व्हावीत, यासाठीची गुरुकिल्ली शाळेतल्या शिक्षणात मिळते. त्याप्रमाणे विद्यार्थ्याचे भलेबुरे व्यक्‍तिमत्त्व मूलत: याच वास्तूत घडत असते. उपलब्ध ज्ञानाचे निव्वळ वाढप एवढेच काम शाळा करणार असतील, या मूळ हेतूलाच आपोआप हरताळ फासला जातो. थोडक्‍यात, शाळा ही वास्तू आपल्यासाठी कमीतकमी खर्च आणि वेळेत चालवण्यात येणारी प्रयोगशाळा ठरली आहे. प्रयोग करायला हरकत नाही; परंतु त्यामागे काही ठोसशैक्षणिक तत्त्वे आणि उद्दिष्टे हवीत. त्यांच्या पूर्ततेचा नियमाने लेखाजोखा घ्यायला हवा. "प्रगती की ओर' जाणारा नवा भारत घडवायचा आहे तो या पिढीकडूनच, हे लक्षात घेऊन या प्रयोगांची आखणी करायला हवी. हे सारे साध्य करण्यासाठी "हम को मन की शक्‍ती देना' अशी प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हाती उरते तरी काय?

Web Title: editorial