अखेर जमलं! की जमवलं?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

विराट कोहलीला हवा तो प्रशिक्षक भले मिळालाही असेल; मात्र यानिमित्ताने भारतीय क्रिकेट जगतातील मातब्बर खेळाडूंमध्ये असलेले मतभेदच चव्हाट्यावर आले. शिवाय, नामुष्कीही टळली नाही

इंग्लंडमध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या "चॅंपियन चषक' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून दारूण पराभव पदरात पाडून घेतल्यानंतर अखेर कर्णधार विराट कोहलीला आपल्या पसंतीचा प्रशिक्षक मिळाला आहे! मात्र, त्यासाठी गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी जाहीरपणे तसेच पडद्याआड झाल्या, त्या बघितल्या की रवी शास्त्री यांची निवड सहजासहजी झालेली नाही, हेच स्पष्ट होते.

भारतीय क्रिकेटविश्‍वातील या प्रतिष्ठेच्या तसेच "अर्थपूर्ण' पदासाठी सोमवारी झालेल्या मुलाखतीनंतर प्रथम सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या समितीने आपला निर्णय यथावकाश जाहीर करण्याचे घोषित केले होते. तेव्हाच श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यावर भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच जाणार, अशी चिन्हे होती. त्यानंतरच्या 24 तासांत पडद्याआड आल्फड हिचकॉक यांनाही लाजवणाऱ्या अशा अनेक रहस्यपूर्ण घडामोडी घडल्या! मंगळवारी दुपारी प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने- बीसीसीआय त्या बातमीचा ठामपणे इन्कार केला आणि नंतरच्या काही तासांतच, अमेरिकेत सुटीवर गेलेल्या विराटशी संपर्क साधून त्याच बातमीवर शिक्‍कामोर्तबही केले. खरे तर इंग्लंडमध्ये "चॅम्पियन चषक' ही प्रतिष्ठेची आणि अटीतटीची स्पर्धा सुरू असताना, प्रथम संघाचे प्रशिक्षक आणि क्रिकेटच्या भाषेतील "सभ्य खेळाडू' अनिल कुंबळे आणि विराट यांच्यातील मतभेदांच्या बातम्या अचानक येऊ लागल्या. त्याच वेळी भारतीय क्रिकेटविश्‍वात "स्टार' खेळाडूंना मिळणारे अवास्तव महत्त्व लक्षात घेता, आता कुंबळे यांची या पदावरून उचलबांगडी होणार, हे स्पष्टच दिसत होते. त्यातच कुंबळे यांची प्रशिक्षकपदाची वर्षभराची मुदतही या स्पर्धेबरोबरच संपणार होती. खरे तर कुंबळे यांच्या कारकिर्दीत आपल्या संघाने जे काही दणदणीत विजय मिळवले होते, ते बघता त्यांना थेट मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र, कुंबळे यांची करडी शिस्त विराट, तसेच अन्य खेळाडूंना जाचक ठरली असणार आणि त्याचीच परिणती अखेर कुंबळे यांनी राजीनामा देण्यात झाली. पुढे जे काही घडले, त्यामुळे विराटला हवा तो प्रशिक्षक भले मिळालाही असेल; मात्र त्यामुळे भारतीय क्रिकेट जगतातील मातब्बर खेळाडूंमध्ये असलेले मतभेदच चव्हाट्यावर आले. शिवाय, नामुष्की जी काही व्हायची तीही झालीच.

अर्थात, या साऱ्याचा अर्थ रवी शास्त्री हे या पदासाठी लायक नाहीत, असा कोणी करून घेण्याचे कारण नाही. शास्त्री हे अष्टपैलू खेळाडू होते आणि संघात कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यात त्यांचा हातखंडा होता. भल्या भल्या परदेशी गोलंदाजांना त्यांनी आपल्या बॅटीचे पाणी पाजलेले आहे. मैदानावरून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी समालोचक म्हणून अत्यंत लाजबाब कामगिरी तर केलीच, शिवाय अवघ्या दोन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचे संचालक म्हणूनही उत्तम काम केलेले आहे. मात्र, या पदाच्या शर्यतीत टॉम मूडीपासून वीरेंद्र सेहवागपर्यंत अनेक खेळाडू असतानाही शास्त्री यांचीच निवड होणे, हा निव्वळ योगायोग नाही आणि निखळ गुणवत्तेवरच ही निवड झाली, असेही म्हणता येणार नाही. प्रशिक्षकपदाचा वाद सुरू झाला, तेव्हा सुनील गावस्कर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सहसा कोणत्या वादात न पडणाऱ्या माजी विक्रमवीराने काढलेले वाद लक्षात घेतले, की ही निवड कोणत्या निकषांवर झाली असावी, याचा किंचित अंदाज येऊ शकतो. "आज नाही ना प्रॅक्‍टिस करायची; मग चला शॉपिंगला जाऊ या!' असे म्हणणारा प्रशिक्षक हवा आहे, की करड्या शिस्तीचा प्रशिक्षक हवा आहे, असा प्रश्‍न गावस्कर यांनी विचारला होता. शास्त्री हेच कुंबळे यांची जागा घेणार, असे वातावरण उभे राहिले असताना गावस्कर यांनी विचारलेला हा सवालच यावर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. त्यातच आता गांगुली-तेंडुलकर-लक्ष्मण या बड्या तिघांची निवड समिती ही सेहवागला झुकते माप देत असतानाच, सर्वोच्च न्यायालयाने "बीसीसीआय'वर नियुक्‍त केलेले प्रशासक विनोद राय मैदानात उतरले आणि त्यांनी निवड समितीचे एकमत झालेले नसल्यामुळे थेट विराटशी संपर्क साधला. खरे तर विराटच्या सुटीत फोन करून अडथळे आणू नयेत, असे गांगुली यांचे म्हणणे होते, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, ते ऐकले गेले नाही आणि नंतर काही तासांतच शास्त्री यांचे नाव जाहीर झाले! यावरून पडद्याआड किती नाट्यपूर्ण घटना घडल्या असतील, याचा अंदाज येऊ शकतो.

आता शास्त्री यांची निवड नेमकी कोणी केली; निवड समितीने की राय आणि विराट यांनी, ही चर्चा प्रदीर्घ काळ सुरू राहील. मात्र, शास्त्री यांच्या दिमतीला "बीसीसीआय'ने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान, तसेच फलंदाज सल्लागार म्हणून राहुल द्रविड यांना दिले आहे. या तिघांची ही निवड 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत आहे. तेव्हा आता मनाजोगता प्रमुख प्रशिक्षक मिळाल्यामुळे विराट आणि त्याचे सहकारी विश्‍वचषक घेऊनच भारतात परततील, अशी आशा करण्यापलीकडे क्रिकेटवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या हातात काय आहे?

Web Title: editorial