आभासी दुनियेतील "शिकारी' मासा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कोवळी मुले वास्तवापासून दूर जाऊन आभासी विश्‍वात का गुंग होत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ "ब्ल्यू व्हेल' या जीवघेण्या गेममुळे आली आहे

एकविसाव्या शतकातील "डिजिटल क्रांती'ने हाती आलेल्या खेळण्यांनी उभी केलेली आभासी दुनिया आता कोवळ्या मुलांच्या प्राणांशी कशी खेळू लागली आहे, याची प्रचिती मुंबईत अंधेरी येथे मनप्रीतसिंग सहानी या चौदा वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे आली आहे. हे सारेच भयंकर आहे आणि त्यामुळे आज देशभरातील घर अन्‌ घर हळहळत आहे. मनप्रीत हा गेले काही दिवस सेलफोन, तसेच लॅपटॉप यावरून "ब्ल्यू व्हेल' नावाचा गेम खेळत होता. केवळ मनप्रीतच नव्हे, तर आजमितीला जगभरात अनेक जण या खेळात दंग झालेले आहेत. या गेमने झपाटून टाकण्याआधी "पोकेमॉन गो' हा गेम खेळत वेड्यासारखे रस्त्यांवरून हिंडणारे अनेक जण बघायला मिळाले होते. अर्थात, सेलफोन वा लॅपटॉप यांचा वापर गेम्स खेळण्यासाठी करणाऱ्यांमध्ये तरुणांबरोबरच प्रौढांचाही समावेश असतो, हे नाकारता येत नाही. मात्र, "ब्ल्यू व्हेल' हा गेम भयंकर होता. पन्नास टप्प्यांच्या या खेळात प्रत्येक टप्प्यावर खेळणाऱ्यास एक "चॅलेंज' दिले जाते आणि ते पूर्ण करत, त्याला पुढच्या पायरीवर जायचे असते. मनप्रीत या "ब्ल्यू व्हेल'च्या शेवटच्या टप्प्यावर पोचला होता आणि या टप्प्यात त्याच्यापुढे आव्हान होते, ते आत्महत्या करण्याचे. ते त्याने आपल्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून पूर्ण केले, असे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीवरून दिसते. लहान मुले, विशेषत: तरुण पिढी इंटरनेटच्या माध्यमातून समोर आलेल्या आभासी विश्‍वाच्या किती आहारी गेली आहे, याचेच प्रत्यंतर या दुर्दैवी घटनेमुळे आले आहे.

हे आभासी विश्‍व जसे इंटरनेटच्या माध्यमातून या पिढीपुढे उभे राहिले, तसे तर ते साहित्यातूनही शतकानुशतके उभे केले जात आहे. त्यातील सर्वांत अलीकडचे ठळक उदाहरण हे "हॅरी पॉटर' या कादंबरी मालिकांचे आहे. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून समोर आलेले हे विश्‍व या पिढीशी अधिक जवळीक साधणारे असते आणि त्यामुळेच त्याची नशा चटकन चढू शकते. मनप्रीतच्या बाबतीतही हेच झाले आणि या जीवघेण्या गेमने घेतलेला तो भारतातील पहिला बळी ठरला. यापूर्वी अनेक देशांत या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत आणि त्यामुळे सावध होऊन बऱ्याच देशांनी या गेमवर बंदी घातली आहे. रशियात अलीकडेच क्रिस्टिना के नावाच्या चौदा वर्षांच्या युवतीने याच गेमपायी आत्महत्या केल्यावर अवघा रशिया हादरून गेला; कारण त्या देशाने या गेमच्या विरोधात मोहीमच हाती घेतली आहे. मात्र, तरुण पिढी या अशा गेम्सच्या आहारी का जाते, हा या त्यावर बंदी घालण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या पिढीचा कुटुंबीयांशी संवाद तुटून गेला आहे आणि घराघरांत ही पिढी हातातल्या "स्मार्ट फोन'मुळे आभासी दुनियेत सतत रममाण होताना दिसते. त्यामुळे आता ही अशी खेळणी नेमकी वयाच्या कोणत्या टप्प्यावर त्यांच्या हाती द्यायची, असा प्रश्‍न पालकांपुढे उभा आहे. मात्र, या गेमच्या आहारी न गेलेल्या, मुंबईतील ज्येष्ठ सनदी अधिकारी दांपत्याच्या 18-19 वर्षांच्या मुलाने अलीकडेच आत्महत्या केली आणि मनप्रीतने मृत्यूला कवटाळले, त्याच दिवशी प्रमुग्धा डावर या वीस वर्षांच्या युवतीनेही गोळ्या खाऊन जगाचा निरोप घेतला. ही तिन्ही मुले सधन कुटुंबातील होती. प्रमुग्धाच्या वडिलांचा तर परदेशात मोठा व्यवसाय आहे आणि मनप्रीतच्या हाती या वयातच स्मार्ट फोन, लॅपटॉप देणारे हे कुटुंबही आर्थिकदृष्ट्या सधन असणार. नेमक्‍या याच वर्गातील मुले हे टोकाचे पाऊल का उचलत आहेत, हा मानसोपचारतज्ज्ञांपुढे आव्हान उभे करणारा विषय आहे. त्यामुळेच मनप्रीतच्या मृत्यूबाबत कोणतेही अंदाज व्यक्‍त न करता, त्याच्या पार्थिवाची केवळ "फिजिकल ऑटोप्सी' न करता "सायकॉलॉजिकल ऑटोप्सी'ही व्हायला हवी, असे एका ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञाने व्यक्‍त केलेले मत महत्त्वाचे ठरते.

मनप्रीत "ब्ल्यू व्हेल' गेम खेळत होता आणि "आपण सोमवारपासून शाळेत येणार नाही, तसेच आपण आत्महत्या करणार आहोत,' असे तो आपल्याशी बोलल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे. अर्थात, ही सारी चेष्टामस्करी असेल, असे त्यांना वाटणे शक्‍य आहे. त्याचा स्मार्ट फोन आणि लॅपटॉप, तसेच अन्य गॅजेट्‌स पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. त्यातून त्याच्या मृत्यूवर प्रकाश पडू शकेल. दरम्यान, या जीवघेण्या "गेम'वर बंदी घालण्यासाठी आपण केंद्र सरकारशी संपर्क साधणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितले. मात्र, अशा बंदीमुळे सुटण्याजोगे हे प्रश्‍न नाहीत. ही पिढी एका "गेम'वर बंदी आली तर दुसरा शोधू शकते. त्यामुळेच ही कोवळी मुले वास्तवापासून दूर जाऊन आभासी विश्‍वात का गुंग होत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. "ब्ल्यू व्हेल' या गेममधील आव्हानांपेक्षा समाजधुरीणांपुढील हे आव्हान अधिक मोठे आहे.

Web Title: editorial