ऐसे जगज्जेत्याचे धावणे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

उसेन बोल्टने नेहमीच यशाची लखलखीत झुंबरे लावली आणि रसिकांचे डोळे दिपवून टाकले. लंडनमधील स्पर्धेत क्रीडारसिकांना फक्त बोल्टला धावताना पाहायचे होते. त्यांचे बोल्टच्या यशावर नव्हे, तर धावण्यावर प्रेम होते...

कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांत "वन्स मोअर'ची फर्माईश व्हावी म्हणून अनेक कलाकार-क्रीडापटू साधना-सराव करीत असतात. नैसर्गिक क्षमतेला अफाट मानवी प्रयत्नांची जोड देत त्यांनी लौकिक कमावलेला असतो. "वन्स मोअर'ची फर्माईश त्यातूनच होते, पण त्यामुळे कलाकार-खेळाडूवरील जबाबदारी दुपटीने वाढते. कारण दुसरा मुखडा पहिल्यासारखाच कर्णमधुर गावा लागतो. प्रेक्षक श्वास रोखून बसलेले असतात आणि इकडे कलाकाराला क्षणाचीही उसंत मिळालेली नसते....पण त्याचा आलाप सुरू होतो आणि मग प्रेक्षकांच्या हृदयाशी त्याचा मिलाप होतो. क्रीडापटूंचेसुद्धा असेच असते. एकदाच यश मिळवून भागत नाही. यशाचा ट्रॅक न सोडता धावत राहावे लागते. उसेन बोल्ट अथकपणे असाच धावत राहिला आणि पदकांची लयलूट करीत राहिला. "शंभर मीटर'चा हा जणू बादशहाच होता. यशाच्या साऱ्या व्याख्या, समीकरणे त्याने बदलून टाकली. लंडनमध्ये सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत जमैकाच्या या खेळाडूकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या त्यामुळेच. समकालीन प्रतिस्पर्धी जस्टीन गॅटलिन आणि नव्या पिढातील ख्रिस्तीयन कोलमन यांच्याकडून तो हरला. त्याला सोनेरी कारकिर्दीची सांगता लखलखत्या सोनेरी यशाने करता आली नाही. तरीसुद्धा ट्रॅकवरील अँकरने पहिली मुलाखत घेतली ती त्याचीच. प्रेक्षकांसह तज्ज्ञांनादेखील नेमके कोण जिंकले हे क्षणभर कळले नव्हते. बोल्ट जिंकू शकला नव्हता; पण कौतुकभरल्या नजरा वेध घेत होत्या त्या बोल्टच्याच. ज्याने "वन्स मोअर'ची फर्माईश एका नव्हे, तर तीन शर्यतींमध्ये आणि इतकेच नव्हे तर एका नव्हे तर तीन ऑलिंपिकमध्ये पूर्ण केली, त्याच्याकडून आता त्यांना काहीही नको होते. क्रीडारसिकांना फक्त बोल्टला धावताना पाहायचे होते. त्यांचे बोल्टच्या यशावर नव्हे, तर धावण्यावर प्रेम होते-आहे आणि राहील.

कपडे धुवून आपल्या आईचे हात दुखतात, हे पाहून लहानग्या उसेनला वाईट वाटायचे, तर कंपनीत जायला वडिलांकडे बाईक नाही याचेही दुःख व्हायचे. आपण खेळात काहीतरी करून दाखविले तर आईला वॉशिंग मशिन आणि वडिलांना बाईक घेऊन देता येईल, अशा साध्या अपेक्षेने त्याने धावायला सुरवात केली. सुदैवाने या स्प्रिंटरला मग ग्लेन मिल्स याच्या रूपाने गुरू भेटला. बोल्टची उंची आणि वजन हे स्प्रिंटरला नव्हे, तर बॉडीबिल्डरला साजेसे होते. त्याच्या पाठीचे मणकेसुद्धा कमजोर होते. क्रिकेटमधील यष्टिरक्षकाप्रमाणे ऍथलेटिक्‍समधील स्प्रिंटर ताडमाड उंचीचे असून चालत (की धावत) नाही. बोल्टने या समीकरणाला छेद दिला. कारकिर्दीची सुरवात 200 मीटर शर्यतीने केलेला बोल्ट अथेन्स ऑलिंपिकनंतर 100 मीटर शर्यतीचे तंत्र शिकण्यासाठी मिल्स यांच्याकडे गेला. मिल्स यांनी त्याला 400 मीटर धावण्याचा सल्ला दिला. गुरू हे शिष्याला मंत्र देण्यापूर्वी त्याची परीक्षा घेतात, पारख करतात. बोल्टच्या बाबतीत हेच घडले. यशाबरोबर त्याला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण त्याचा ट्रॅक बदलला नाही. "जिंकल्यामुळे किती सुख वाट्याला येते हे मी अनुभवत होतो. सराव करताना माझे मन या सुखाच्या कल्पनेत रमायचे; पण शरीर धावत असायचे', असे बोल्टने एका मुलाखतीत म्हटले होते. त्याच्या यशोगाथेचा हा संदेश त्याचे सर्वश्रेष्ठत्व हा दैवाचा भाग नाही, हेच सिद्ध करतो.

ऍथलेटिक्‍सला खेळाची जननी म्हणतात; पण या खेळाला आधुनिक क्रीडायुगात उत्तेजक द्रव्यांचा विळखा पडला. त्यामुळे वैयक्तिक खेळाडूच नव्हे, तर एका देशावर-रशियावर बंदी घालण्याची वेळ शिखर संघटनेवर आली. अशा वेळी बोल्टच्या रूपाने ऍथलेटिक्‍ससारख्या खेळाच्या जननीला मिळालेला चॅंपियन किती महान आहे हे स्पष्ट होते. असे चॅंपियन पाहायला मिळणे हे मानवजातीचे भाग्य. अमेरिकी बॉक्‍सर महंमद अली अखेरच्या लढतीत ट्रेव्हर बेर्बीक याच्याकडून हरले. अमेरिकी टेनिसपटू आंद्रे अगासीला जर्मनीच्या बेंजामिन बेकरने हरविले. जर्मनीचा "फॉर्म्युला वन' ड्रायव्हर मायकेल शूमाकरला कारकिर्दीची सांगता विजेतेपद नव्हे, तर नुसती शर्यत जिंकूनही करता आली नाही. लोकमान्यता मिळालेल्या अशा चॅंपियनमधील आद्य म्हणून डॉन ब्रॅडमन आणि ताजे उदाहरण म्हणून बोल्ट अशी नावे क्रीडाप्रेमींनी आपल्या हृदयावर कोरली आहेत. विशेष म्हणजे ब्रॅडमन-बोल्टमध्ये अनेक योगायोग जुळून आले आहेत. लंडनमधीलच उपनगर असलेल्या ओव्हलवर ऑगस्ट महिन्यातच ब्रॅडमन यांच्या वैभवशाली कारकिर्दीची सांगता झाली. चौदा ऑगस्ट 1948 रोजी अशेस कसोटीत इंग्लंडच्या एरिक हॉलीसने दुसऱ्याच चेंडूवर त्यांचा त्रिफळा उडविला. ब्रॅडमन भोपळासुद्धा फोडू शकले नाहीत. त्यामुळे 6996 व 99.94 अशा सरासरीला शंभर नंबरी सोनेरी यशाचा मुलामा देण्यासाठी त्यांना केवळ चार धावा कमी पडल्या. यानंतर ते पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना टाळ्याच पडल्या. काही क्षणांपूर्वीच शेवटची इनिंग्ज खेळण्यासाठी त्यांचे खेळपट्टीवर आगमन झाले, तेव्हा पडल्या त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या तेव्हा पडल्या हे सांगणे न लगे. मुक्कामापेक्षा वाटचालच सुंदर असते, अशा आशयाची उक्ती अशा वेळी मनात चमकून गेल्याशिवाय राहत नाही.

Web Title: editorial