आरुषी, आम्हाला माफ कर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

देशभर गाजलेल्या आरुषी खूनप्रकरणी सबळ पुराव्याअभावी तिच्या आई-वडिलांची मुक्तता झाली आहे; पण हा खून कोणी केला, हा महत्त्वाचा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. तपास यंत्रणेचे ढळढळीत अपयशच या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे

दहा वर्षांपूर्वीच्या त्या 2008 मधील काळरात्री राजधानी दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नोएडा परिसरातील एका अलिशान फ्लॅटमध्ये चौदा वर्षांच्या, उमलू पाहणाऱ्या आरुषी तलवार नामक कळीचा खून झाला आणि सारा देश हादरला. हा खून तिच्या उच्चविद्याविभूषित डेन्टिस्ट डॉक्‍टर मातापित्यांनीच केल्याच्या बातम्या आल्यावर तर बसलेला धक्‍का हा तिच्या खुनाच्या धक्‍क्‍यापेक्षाही मोठा होता. या प्रकरणाचे तपशील समोर येत गेले, तसतसे त्याचे गूढ वाढतच गेले आणि अखेर खुनाच्या आरोपाखाली आरुषीच्या मातापित्यांना 2011 मध्ये शिक्षा झाली. तुरुंगात ते शिक्षा भोगत असतानाच सहा वर्षांनंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी गुरुवारी त्या दोघांना निर्दोष ठरविले; पण आरुषीचा खून कोणी केला, हे गूढ मात्र आजही अनुत्तरीतच राहिले आहे. अर्थात, सुशिक्षित, सधन कुटुंबातील उमलत्या वयातील तरुणींचा खून होणे नवे नाही; तसेच त्यांच्या खुनाचे कोडे कधीही न सुटणे, हेही नवे नाही. 1999 मध्ये सेलिब्रिटी मॉडेल आणि बारवुमन जेसिका लाल हिचा दिल्लीतील एका बारमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. तेव्हाही तिच्या खुनाबद्दल कोणालाही दोषी म्हणून शाबित करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले होते. त्यावरून नंतर "नोबडी किल्ड जेसिका' असे उपरोधिक शीर्षक असलेला चित्रपटही प्रदर्शित झाला होता. गाजलेल्या या खून प्रकरणांबरोबरच दिवसाकाठी होत असलेल्या अनेक निष्पाप युवतींच्या खुनांचा छडा लावण्यात तपास यंत्रणा अपयशी कशा ठरतात, हाच प्रश्‍न यामुळे अजेंड्यावर आला आहे. आरुषी खून प्रकरणाचा छडा लावण्यात तपास यंत्रणेला आलेले ढळढळीत अपयशच निकालातून स्पष्ट झाले आहे.

आरुषीच्या खुनाचे प्रकरण हे सर्वाधिक रहस्यमय होते. राजेश व नूपुर तलवार या दांपत्याच्या या कन्येचा मृतदेह घरातच आढळला होता आणि त्यानंतर दोनच दिवसांनी तलवार यांच्या घरातील नोकर हेमराज याचाही मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर साहजिकच त्या दोघांचे संबंध होते काय, याची चर्चा प्रसारमाध्यमात होणे जितके अश्‍लाघ्य होते, त्यापेक्षाही अश्‍लाघ्य वर्तन प्रसारमाध्यमांना त्यासंबंधातील बातम्या पुरवणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे होते. तरीही प्रसारमाध्यमांनी हा प्रश्‍न लावून धरला आणि त्यामुळेच चौकशीचे काम "सीबीआय'कडे सोपवणे सरकारला भाग पडले. देशातील या प्रतिष्ठेच्या तपास यंत्रणेने वेगवेगळ्या टप्प्यावर आरुषीच्या खुनासंबंधात दोन परस्पर भिन्न अहवाल दिले. त्यामुळेच उच्च न्यायालयाने तलवार दांपत्याला निर्दोष सोडण्याचा निर्णय देताना, "सीबीआय'ने उलगडून दाखवलेले दुवे कच्चे आहेत, असे सांगत संशयाचा फायदा तलवार दांपत्याला दिला आहे. मात्र, या निर्णयामुळे "तलवार तर सुटले, मग आरुषीचा खून केला तर कोणी?' असा सर्वांनाच हताश करून सोडणारा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

आरुषीच्या खुनाची चौकशी सुरू असताना "सीबीआय'चे सहआयुक्‍त म्हणून धुरा सांभाळणारे अरुणकुमार यांचे मत त्यामुळेच या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचे ठरते. "अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता आपल्या देशातील "क्रिमिनल जस्टिस सिस्टिम'चाच फेरविचार व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. अरुणकुमार यांनीच आपल्या अहवालात तलवार दांपत्याला संशयाचा फायदा देत दोषमुक्‍त केले होते. या पार्श्‍वभूमीवर आता तपास यंत्रणा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील काय, हा प्रश्‍न आहेच. मात्र, त्यामुळेच गोल्फ स्टिकच्या फटकाऱ्याने आरुषीला मारण्यात आले काय आणि ते कृत्य राजेश तलवार यांनी केले असेल तर मग त्यांनीच ती गोल्फ स्टिक माळ्यावरून पोलिसांना का काढून दिली? शिवाय, मग आरुषीचा खून कोणी केला, हेही प्रश्‍न उपस्थित होतात. हे गूढ इतके गुंतागुंतीचे आहे की, याच विषयावर आलेल्या मेघना गुलजार यांच्या चित्रपटातही या प्रकरणात नेमके काय घडले असावे, याबाबत तीन शक्‍यता मांडण्यात आल्या होत्या. ते असो. मात्र, आपल्या देशातील साऱ्या तपास यंत्रणा आणि सव्वाशे कोटी जनता यांनी जेसिका लाल असो की आरुषी तलवार, त्यांना न्याय देण्यात आलेल्या अपयशाबद्दल त्यांची माफीच मागायला हवी. तेव्हा शक्‍य असेल तर "आरुषी, आम्हाला माफ कर...'

Web Title: editorial